विषय आज कामकाजात घेण्याचे सभापतींचे आश्वासन
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या माध्यान्न आहाराचे कंत्राट अक्षयपात्र या संस्थेला दिल्यामुळे विरोधकांनी काल गोंधळ घातला. या संबंधीच्या प्रश्नी विरोधकांनी गोवा विधानसभेत मांडलेली लक्षवेधी सूचना सभापती रमेश तवडकर यांनी कामकाजात घेतली नाही. त्यामुळे काल काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या आमदारांनी सभापती रमेश तवडकर यांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेऊन एकच गोंधळ घातला. हे कंत्राट अक्षयापात्रला देण्यात आल्याने आतापर्यंत हा आहार शाळांना पुरवणाऱ्या महिला स्वयंसेवी गटांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे आम्हाला या विषयावर बोलायला हवे असे सभापतींना सांगत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्टा, कार्लुस फेरेरा, व्हेंन्झी व्हिएगस व क्रुझ सिल्वा तसेच विजय सरदेसाई यांनी आपल्या आसनावरून उठून सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेतली. रेव्हुलेशनरी गोवन्स पक्षाचे आमदार वीरेश बोरकर हे मात्र आपल्या आसनावरच बसून राहिले.
चित्रकार मारियो मिरांडा यांच्या सन्मानार्थ वस्तुसंग्रहालय स्थापन करण्यासंबंधीची लक्षवेधी सूचना तुम्हाला महत्त्वाची वाटली काय, असा प्रश्नही यावेळी विरोधकांनी सभापतींना केला. मात्र, ही लक्षवेधी सूचना आज दि. 26 रोजी कामकाजात घेण्याचे आश्वासन सभापतींनी दिल्यानंतर विरोधक शांत झाले.