नवी मुंबईमध्ये खारघर येथे प्रख्यात निरूपणकार दत्तात्रेय नारायण ऊर्फ अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात उष्माघाताने किमान तेरा जणांचा झालेला मृत्यू आणि तीनशेहून अधिक जणांना झालेला त्रास ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. राजकारण्यांचा केवळ गर्दी जमवण्याचा आणि भाषणे ठोकण्याचा सोस, आयोजन करताना प्रेक्षकांचा काडीमात्र विचार न करण्याची आणि त्यांच्याकडे केवळ नग म्हणून पाहण्याची बेफिकिर वृत्ती याचेच हिडीस दर्शन या दुर्घटनेतून घडले आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी हे सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रातील मोठे नाव. स्व. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या मागून त्यांच्या विशाल श्रीपरिवाराची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला त्यांना पुरस्कार द्यावासा वाटला वा त्यांनाही तो आपल्या अनुयायांच्या उपस्थितीत स्वीकारावासा वाटला, तर त्यात गैर नाही, परंतु अशा लोकप्रिय व आदरणीय व्यक्तीच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन उघड्यावर करताना त्यासाठी किती गर्दी गोळा होईल, आयोजनाच्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती काय आहे, उपस्थितांना कोणत्या परिस्थितीतून जावे लागेल, त्यातून काही दुर्घटना घडू शकते का, याचा विचारही आयोजकांना, म्हणजे पर्यायाने महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाला करावासा वाटला नाही हे खरोखरच आश्चर्यकारक आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला गेला. अमित शहांची संध्याकाळी गोव्यात लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकणारी सभा व्हायची होती. त्यामुळेच केवळ त्यांची सोय आयोजकांकडून पाहिली गेली आणि नवी मुंबईतील कार्यक्रम भर दुपारी ठेवला गेला होता. दुपारी साडेअकरा ते एक ही या कार्यक्रमाची वेळ होती आणि कार्यक्रम होता झुडुपाचीही सावली नसलेल्या खुल्या मैदानात! टळटळीत दुपारी भर उन्हात दोन भली मोठी मैदाने भरून लाखो श्रीसदस्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याची ही कल्पनाच मुळात भीषण होती. सध्याच्या कोरोना महामारीच्या दिवसांत तर अशा प्रकारचे गर्दीचे कार्यक्रम म्हणजे रोगप्रसारालाच कारण असते. तरीही राजकारण्यांना त्याची फिकीर दिसत नाही. सदर कार्यक्रमाचे आयोजन भरदुपारी उघड्यावर रणरणत्या उन्हात करीत असताना ज्येष्ठ नागरिकांना, स्त्रियांना, मुलाबाळांना त्याचा त्रास होऊ शकतो हे आयोजकांच्या किंवा व्यासपीठ भूषविणाऱ्या राजकीय नेत्यांच्या गावीही नसावे हे आश्चर्यकारक आहे. नेत्यांसाठी व्यासपीठावर सावली होती, वातानुकूलन व्यवस्था होती, परंतु आपल्या समोर उफाळलेला जनसागर भर उन्हात सकाळपासून येऊन बसलेला आहे, प्रचंड वाढलेल्या तापमानात, रणरणत्या उन्हात तो बसलेला आहे याचे भान व्यासपीठावरील मंडळींना, आयोजकांना येऊ नये? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून देवेंद्र फडविसांपर्यंत सर्वांनी या कार्यक्रमात जोरदार भाषणे ठोकली. पण जवळजवळ पाच ते सहा तास हजारोंचा हा जनसमुदाय उन्हात ताटकळलेला होता. धर्माधिकारींची संघटना बांधणी शिस्तीची. त्यामुळे वरकरणी कोठेही गडबड गोंधळ नव्हता, परंतु आध्यात्मिक साधक असले तरी ती शेवटी माणसेच. 38 च्या वर तापमानाचा पारा गेला, तेव्हा त्याचा त्रास होणारच. उपचारासाठी प्रथेनुसार वैद्यकीय कक्षही कार्यक्रमस्थळी तैनात होते. पण उन्हाची काहिलीच अशी होती की उष्माघाताचा त्रास प्रेक्षकांना व्हायला सुरुवात झाली, तेव्हा ही अपुरी व्यवस्था क्षणार्धात कोलमडून पडली.
मुळात या कार्यक्रमासाठी अशा गर्दीची आवश्यकता होती का हा मूलभूत प्रश्न आहे. परंतु आजकाल प्रत्येकाला आपले शक्तिप्रदर्शन करायचे असते व त्यासाठी गोळा झालेली गर्दी हा एक निकष मानला जात असल्यानेच अशा गर्दीचा सोस सगळ्यांनाच दिसतो. वास्तविक, अशा प्रकारचा गर्दीचा कार्यक्रम किमान संध्याकाळच्या वेळेला ठेवणे अपेक्षित होते. परंतु केवळ शहांची सोय आयोजकांनी पाहिली. जी लाखोंची गर्दी कार्यक्रमाला आली होती, तिची सोय पाहण्याची गरज आयोजकांना वाटली नाही. आता हे जे बळी गेले आहेत, ती जबाबदारी कोणाची? मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. लाखो रुपये दिले तरी गेलेली माणसे परत येणार नाहीत. आयोजनातील बेफिकिरी अक्षम्य आहे. हाच प्रकार विरोधकांच्या एखाद्या सभेत झाला असता तर सरकार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवायला झटक्यात पुढे सरसावले असते. पण येथे आयोजकच सत्ताधारी आहेत म्हणून यावर पडदा टाकला जाणार काय?