– प्रकाश आचरेकर, मुंडवेल, वास्को
मनुष्य हा सामाजिक व सुसंस्कृत प्राणी आहे. त्याला संततीसाठी विवाह करावा लागतो. या विवाहासाठी अनेक सामाजिक बंधने आहेत. त्यानुसार या जगात माणसाची प्रामुख्याने धर्मानुसार विभागणी झालेली आहे. त्यानंतर देश व वंशावरून विभागणी झाली आहे. म्हणजे समाजामध्ये आंतरधर्मिय विवाहांवर बंधन आहे.
आता आपण हिंदूधर्मियांच्या विवाहाविषयी विचार करू. हिंदू धर्मातील वर त्याला आवडत असलेल्या कुठल्याही हिंदू वधूला मागणी घालू शकत नाही. आपण म्हणणार आजचा माणूस सुशिक्षित आहे. प्रत्येकजण आपल्या शिक्षण व कुवतीनुसार काम करतो. सर्व समाजाचे लोक एकाच हॉटेलात व एकाच टेबलावर खाणे – पिणे करतात आणि एक – दुसर्याच्या घरी जाऊन ऊठबस आणि जेवणखाण करतात. मग त्या विवाहाला विरोध का?
कारण, हिंदू धर्म जातींमध्ये विभागलेला आहे. त्या जातींत पोटजातींची विभागणी झालेली आहे. मग एका जातीतील एका पोटजातीत असलेला ‘वर’ त्याच जातीतील दुसर्या पोटजातीतील असलेल्या वधूशी विवाह करू शकत नाही. तेव्हा प्रत्येक हिंदू माणसाला पोटजातीतील जोडीदाराशी विवाह करावा लागतो. ही नोंद आपल्या विवाह मंडळातही वधू वरांच्या वेगवेगळ्या जातींच्या विभागणीनुसार केलेल्या फायलींवरून दिसून येते. नंतर पुढे आर्थिक विभागणीही आहे. श्रीमंत माणूस गरीबाशी विवाह संबंध आणत नाहीत. पुढे शिक्षण व व्यवसायातही विभागणी आहे. उदाहरणार्थ, डॉक्टर डॉक्टरशी, इंजिनियर इंजिनियरशी, शिक्षक शिक्षिकेशी अथवा सरकारी नोकरीच्या हुद्यावरून लग्न जुळवली जातात. म्हणजे उच्च शिक्षण घेतलेला कमी शिक्षण घेतलेल्याशी विवाह करीत नाही.
जन्मपत्रिका जुळणी आज समाजात आवश्यक झालेली आहे. जुळणीत सर्वप्रथम मंगळाचे स्थान पाहिले जाते. त्यात प्रथम, चतुर्थ, सातवा, आठवा अथवा बाराव्या स्थानी मंगळ असल्यास मंगळाची कुंडली समजली जाते. असा सदोष मंगळ असल्यास जोडीदाराच्या कुंडलीतही त्यातील कुठल्याही स्थानी मंगळ असणे गरजेचे आहे. त्यात वधूच्या कुंडलीत आठव्या स्थानी मंगळ असणे दुर्भाग्यच मानले जाते. त्या स्थानी मंगळ असणे म्हणजे नवर्याचे ताबडतोब मरण होय असे मानले जाते. म्हणजे अशा मंगळावरून बारापैकी पाच मंगळाच्या पत्रिका बाजूला सारल्या जातात. नंतर पत्रिकेत नाडीदोष पाहतात. त्यात बारापैकी चार कुंडल्या एक नाडीदोष मानून बाजूला करतात. नंतर वधूवराच्या कुंडली जुळणीत गुण मीलन पाहिले जाते. इथे १८ पेक्षा कमी गुण मिळाल्यास विवाह वर्ज्य मानला जातो. इथे अनेक कुंडल्या बाजूला काढल्या जातात. बारा राशींपैकी मीलनात एक रास मृत्यू षडाष्टक योगदोषी असल्याने एक रास मीलनातून बाहेर पडते. पुढे दोघांची रास व चरण एक असल्यास लग्न जुळत नाही. तसेच मीलनात मनुष्य राक्षस दोष असल्यास नवरा – बायकोचे पटत नाही असे समजले जाते. म्हणजे बारातल्या चार कुंडल्या होतात. मग आश्लेषा, मघा, विशाखा, ज्येष्ठा व मूळ यांना जन्मनक्षत्र दोषी म्हणून मानले जाते. ह्या नक्षत्राच्या वधूघराचा उद्धार करीत नाहीत व घरच्या माणसांना मारक आहे असे मानले जाते. तसेच कृष्ण चतुर्दशी व अमावस्या या तिथी, वैघ्रती व भद्रा सारखे योगही दोषी आहेत. अशा या जन्मपत्रिका मीलनातून दहापैकी एक सुद्धा पत्रिका उत्तीर्ण होईल की नाही यात शंका आहे.
या झंझटाची ‘वर’ पक्ष सांभाळतो. तो वधूची पत्रिका मागतो, तेव्हा वधूला व तिच्या घरच्यांना आशेचे किरण दिसते आणि जर समजा या दिव्यातून मुलगी उत्तीर्ण झाली आणि कुठे एकट्याला नापसंत असल्यास शेवटी वरपक्ष या विवाहास कुलदेवतेचा प्रसाद होत नाही असे सांगून सोयरिक मोडली जाते. तेव्हा वधुपित्याला वाढलेल्या मुलीचे लग्न होईपर्यंत शांत झोप येत नसते. त्यासाठी त्याला आपल्या चपला झिजवाव्या लागतात असे म्हटले जाते. परंतु आज गाड्यांचे टायर झिजवावे लागतात. त्यासाठी फार काय, तर नको असलेल्या माणसाकडे जाऊन आपल्या मुलीच्या सोयरिकीला अमूक माणसाकडे जाण्याची भीक मागणे भाग पडते.
पूर्वी उच्चभ्रू जातीमध्येच जन्मपत्रिका व प्रसादाची पद्धत होती. पण इतर जातींमध्ये ही पद्धत नव्हती. तरी त्यांचे काही वाईट न होता संसार सुरळीत चालत होता. तेव्हा शिक्षण, पैसा, मान व प्रतिष्ठा नसल्याने आपल्या जातीतील मुलामुलींशी वेळीच लग्न करून सुखी होत असत.
सारांश हिंदू पंडितांनी जातीभेदाबरोबरच आता इतर जातींत वधूवरांची जन्मकुंडली, गुणमीलनाची अंधश्रद्धा पसरवलेली आहे. आज मुले उच्च शिक्षण घेत आहेत. त्यातील काही मैत्री करून प्रेमविवाह करतात व आपला संसार थाटतात आणि वधू वर शोधकाच्या बाजारातून मुक्त होतात. परंतु कर्तबगार मुले आई-वडिलांच्या आज्ञेला मान देणारी व शब्दाला मानणारी मुले आई-वडीलांबरोबर जातीवाद व जन्मपत्रिकेच्या अंधश्रद्धेच्या वेडाच्या आहारी जाऊन त्यांनी जीवनाचे मातेरे केलेले आहे. कारण पुष्कळशा तरूण तरूणींचे वय वाढले. त्यात कित्येकजण विवाहापासून वंचितही झालेले आहेत.
घाबरलेली जोडपी आपल्या मुलाच्या कुंडलीत कसलाच दोष असू नये म्हणून डॉक्टरांकडून डिलिव्हरीची तारीख घेतात व ज्योतिषाकडे जाऊन बाळंतपणाला शुभमुहूर्त शोधतात. त्यात मंगळ व कुंडलीत कुठलाच दोष नसलेली वेळ शोधून काढून त्याचवेळी ‘सिझेरियन’चे ऑपरेशन करून घेतात. अशा पद्धतीने आपले मूल शुभमुहूर्तावर जन्माला घालण्याचेही खूळ बळावले आहे.
संगणक येण्यापूर्वी मी स्वतः हजारो मुलांच्या व इतरांच्या जन्मपत्रिका केल्या आहेत व त्यांची फलितेही पाहिलेली आहेत. त्यातील काही योगाने खरी ठरली, तर बहुतेक खोटीच ठरलेली आहेत. मी काही कुंडल्यांतील दोष व अपवाद वगैरे गृहीत धरून गुणमीलन काही लोकांना करून दिले. त्यातील बहुतेकांनी पास झालेल्या कुंडल्या न स्वीकारता वर्ज्य कुंडल्या स्वीकारून आपल्या मुलांची लग्ने केली. पुढे माझ्या पाहण्यात व सांगण्यावरून त्या जोडप्यांची लग्ने सफल झाली आहेत व संसारीक जीवन चांगले चालते. उलट जन्मपत्रिका बघून दोषमुक्त पत्रिकेप्रमाणे विवाह झाले अशा काही जणांनी मला सांगितले, जन्मपत्रिका बघून काय मिळविले? शेवटी घटस्फोट! आज इतर धर्मियांच्या तुलनेत भारतामध्ये हिंदूंमध्ये घटस्फोटाची संख्या खूप आहे. हे प्रमाण आपणास वर्तमानपत्रातल्या विवाहविषयक जाहिरातींतून पाहायला मिळते. शेवटी तरुणांची लग्ने होत नाहीत याला रीतीरिवाज, धर्मकांडे दोषी समजून ते धर्मांतराकडे वळताना दिसत आहेत. आज छोट्याशा गोव्यात जवळजवळ ४० हजार लोक बिलिव्हर्स झालेले आहेत, ही एक मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यासाठी आपण जातपात, जन्मपत्रिका व प्रसाद ही अंधश्रद्धा बाजूला सारून विशेषतः मुलींना आशेचा किरण दाखवला पाहिजे.