इतिहास हा माझा आवडता विषय. लहानपणी महाभारत, रामायण, शिवराय, ब्रिटिश व क्रांतिकारक यांच्या कथा वाचण्यात आल्या. त्यानंतर भारतातील प्रत्येक स्थळाला स्पर्श करणे, त्याबद्दल खूप वाचणे, पाहणे झाले. अयोध्या, कुरुक्षेत्र, द्वारका, गंगोत्री, गड, किल्ले, जालियनवाला बाग, पोरबंदर, शांतिनिकेतन, साबरमती, जोरासोका, लो. टिळक, सुभाषचंद्र बोस ते स्वा. सावरकरांनी लिहिलेले ‘माझी जन्मठेप’ आत्मवृत्तातील प्रसिद्ध अंदमान बेटावरील सेल्युलर जेल पाहिले व धन्य झालो.
गोवा ते चेन्नई व चेन्नई ते पोर्टब्लेअर हे अडीच तासांचे सुमारे अठराशे कि.मी. समुद्रावरचे अंतर इंडियन एअरलाईन्सने प्रवास करून दुपारी दीड वाजता आम्ही वीर सावरकर एअरपोर्टवर पोहचलो. प्रथमच हवाईप्रवास करणारे माझे वयस्कर सहचारी खूपच आनंदी होते. समुद्राने वेढलेली छोटी-मोठी अनेक बेटे होती. वीर सावरकर हवाई अड्डा ते शहर फक्त सहा रुपये बस तिकीट, वीस रुपये रिक्षा किंवा शंभर रुपये टॅक्सी भाडे, एवढे जवळ आहे. मध्यवर्ती असलेल्या ‘अंदमान रेसिडेन्सी’ येथे आमचे वास्तव्य व तेथून सर्व आकर्षक प्रमुख स्थळे केवळ तीन ते चार कि.मी. अंतरावर. अंदमान, निकोबार हे सत्तावन छोट्या-मोठ्या बेटांचे, पोर्टब्लेअर हे मुख्य राजधानीचे शहर- छोटेसे, स्वच्छ.- गोव्यातील आल्तिनो टेकडी, मिरामार, दोनापावला, बेती, वेरे, चोडण अशा विभागांशी साम्य दाखवणारे, हवामान व समुद्र किनारे. येथून जवळच दीड कि.मी. अंतरावर प्रसिद्ध सेल्युलर जेल बघायला आम्ही सकाळी ९ वा. गेलो. भव्य, तीन मजली, सहाशे अरुंद कोठड्या असलेले जेल आणि ‘फाशीघर’. सर्व परिसर खडानखडा पाहिला. सेल्यूलर जेलच्या माथ्यावर जाऊन चोहोबाजूंनी नजर स्थिरावेल एवढा समुद्र न्याहाळून पाहिला. सावरकरांचे संग्रहालय पाहिले. जवळचे मत्स्यालय व अंदमान म्युझियम पाहून सायं. ५ वा. लाईट-साउंड शोसाठी महत्प्रयासाने तिकिटे मिळवलीत. दोनशे वर्षांपूर्वीची पिंपळाच्या झाडाची कल्पना ठेऊन भारदस्त आवाजात सेल्युलर जेल बांधकाम, त्याचा खर्च, पुढे ब्रिटीश बोटीने पाठवणारे जयहिंद नार्याचे स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे उठाव, सावरकर व त्यांचे बंधू व जेलरची जरब दाखवणारे फटके, घोड्यांचे आवाज, कैद्यांचे जगणे, घाण्याचे तेल काढणे वगैरे इतिहास मोठ्या खुबीने यात दाखवला जातो. हे ऐकताना मन सुन्न होते. अंगावर रोमांच येतात. स्वा. सावरकरांची ‘‘ने मजसी ने परत मातृभूमीला’’ ही आर्त साद घातलेलं गाणे आणि बरीच स्फूर्तीदायक हिंदी गाणी ऐकविली जातात. आम्ही धन्य झालो.
दुसर्या दिवशी सकाळी आम्ही आशियातील प्रथम ‘चाथम’ सॉ मिल पाहिली. या बेटावर सॉ मिलव्यतिरिक्त कुठलंही घर नाही. सर्व परिसरात मोठ-मोठी झाडे, ओंडके, फळ्या व लाकडाच्या वस्तू यांनी व्यापलेला आहे. येथे महान क्रांतिकारी नेते सुभाषचंद्र बोस यांनी प्रथम झेंडावंदन केले. पुढे जपानी सरकारने या सॉ-मिलवर टाकलेला निकामी बॉंबही जतन करून ठेवलेला आहे. त्यानंतर आम्ही साहित्य अकादमी – दिल्ली आयोजित ‘इंडियन रायटर्स सेमिनार’ या अंदमान क्लबमध्ये झालेले कथाकथनाचे संमेलन अनुभवले. गोव्यातील कोकणी लेखिका डॉ. जयंती नायक व महाराष्ट्रातील रेखा बैजल यांच्या कथा आम्ही ऐकल्या. तामिळ, कन्नड साहित्य कथा ऐकल्या. संध्याकाळी कारबीन बीच, समुद्रकिनारी सनसेट, निळाभोर समुद्र व छोटी मंदिरेही पाहिली.
तिसर्या दिवशी आम्ही सकाळी वीस-पंचवीस कि.मी. समुद्रात खोलवर निळे, काळे पाणी पाहात छोट्या बोटीवरून फिरलो. नंतर ‘कोरल सफारी’ पाहण्यास नेले. समुद्रात तीन फूट खाली ते वीस-पंचवीस फूटापर्यंत वर-खाली फिरणारे तर्हेतर्हेचे लहान-मोठे मासे – वेगवेगळे कोरल पाहण्यात खूप मजा आली. सकाळी सकाळी रखरखत्या सूर्यप्रकाशात हे आकर्षक चित्र खूपच आनंदी बनवते. वेळ भुर्रकन निघून जातो. येथून ४० कि.मी. अंतरावर असलेल्या हॅवलोक आयलँडवरही जाता आले नाही. त्यानंतर आम्ही रॉस आयलँड हे आणखी १५ कि.मी. समुद्रसफारी दुरीवरील बेट पाहिले. ‘टूरिस्ट मिनी’ रिक्षाने संपूर्ण रॉस गार्डन, नॉर्थ बे बीच बेट, हरणाच्या ताफा व पक्षी, भग्न चर्च, ढासळलेली ब्रिटीश दफ्तरे पाहिली व संध्याकाळी पाच वाजता -शेकडो पक्षी परत घरट्याकडे फिरतात व सूर्यास्त ही होतो अशा चिडीयाटापू भागात मी गेलो. पण माघारी फिरावे लागले. कारण परतीसाठी बस नव्हती. अंदमान-निकोबारच्या अथांग समुद्रातील शांत, सुंदर बेेटे पर्यटकांना बोलावतात. ‘अतिथी देवो भव’ अशाच वृत्तीने क्षणोक्षणी माणसे, कर्मचारी आम्हाला भेटले. असा संपला आमचा प्रवास पुन्हा नव्या शोधासाठी.