केरळमध्ये 31 पर्यंत पोहोचण्याचा हवामान खात्याचा अंदाज
अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल झाला असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. आता मान्सून दि. 31 मेपर्यंत केरळमध्ये दाखल होईल. गेल्या वर्षीही अंदमान निकोबार बेटांवर 19 मे रोजी मान्सून दाखल झाला होता, मात्र त्यानंतर केरळमध्ये 9 दिवस उशिराने 8 जूनला पोहोचला
होता. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख 1 जून आहे. मात्र जाहीर केलेल्या तारखेत 4 दिवस कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 28 मे ते 3 जून दरम्यान कधीही मान्सून दाखल होऊ शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून गोव्यात 5 जूनपर्यंत, 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात आणि राजस्थानमध्ये, 25 जून ते 6 जुलैपर्यंत मध्य प्रदेशात पोहोचण्याची शक्यता आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये 18 ते 25 जूनपर्यंत आणि बिहार-झारखंडमध्ये 18 जूनपर्यंत पोहोचेल.
अनेक राज्यांत उष्णतेची लाट
दरम्यान, देशातील अनेक राज्ये सध्या तीव्र उष्णतेच्या विळख्यात आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये शिवाय उत्तराखंड, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. या राज्यांमध्ये पाच दिवस तीव्र उष्णता राहणार आहे. त्याचवेळी दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव 23 मेपर्यंत राहील असे हवामान खात्याने म्हटले आहे. दिल्ली आणि राजस्थानमध्ये शनिवारी तापमान 46 अंशांवर पोहोचले असून येत्या काही दिवसांत येथे तापमानात घट होण्याची शक्यता नाही. तसेच दक्षिण भारतातील राज्यांमध्ये भीषण उष्मा कायम आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. शनिवारीच तामिळनाडूतील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती दिसून आली.
यंदा 106% पावसाचा अंदाज
गेल्या महिन्यात गहवामान खात्याने, देशात यंदा सामान्य मान्सूनपेक्षा चांगला पाऊस पडेल अशी शक्यता व्यक्त केली होती. हवामान विभागाने यंदा 106 पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. खात्याने, 2024 मध्ये 106% म्हणजेच 87 सेमी पाऊस पडू शकतो. 4 महिन्यांच्या पावसाळी हंगामासाठी दीर्घ कालावधीची सरासरी 868.6 मिलीमीटर म्हणजेच 86.86 सेंटीमीटर आहे. म्हणजे पावसाळ्यात इतका एकूण पाऊस पडला पाहिजे असे म्हटले आहे.