अंत्योदय रेशन कार्डधारकांना सिलिंडरवर 275 रुपये अनुदान

0
5

>> नागरी पुरवठा खात्याची एका वर्षासाठी योजना

राज्य सरकारकडून राज्यातील अंत्योदय अन्न योजनेतील (एएवाय) रेशनकार्डधारकांना घरगुती गॅस सिलिंडरसाठी प्रत्येक महिन्याला 275 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
नागरी पुरवठा खात्याने मुख्यमंत्री एलपीजी गॅस सिलिंडर योजना अधिसूचित केली आहे. या योजनेखाली एएवाय रेशनकार्डधारकांना गॅस सिलिंडर अनुदान दिले जाणार आहे. ही अनुदान योजना एक वर्ष कालावधीसाठी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपने मागील विधानसभा निवडणुकीत सत्तेवर आल्यास प्रत्येक कुटुंबाला वर्षासाठी तीन सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली होती. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोफत तीन सिलिंडर देण्याचा ठराव संमत करण्यात आला. तथापि, निधीच्या अभावामुळे कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना मोफत तीन सिलिंडर देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला होता. तथापि, ही योजना मार्गी लागू शकली नाही. आता, नागरी पुरवठा खात्याच्या माध्यमातून केवळ अंत्योदय अन्न योजनेतील कार्डधारकांना गॅस सिलिंडरसाठी महिना 275 रुपये अनुदान देण्याच्या निर्णयाची कार्यवाही करण्यात आली आहे.

अंत्योदय अन्न योजनेखालील रेशनकार्ड असलेल्या कुटुंबाला प्रत्येक महिन्याला गॅस सिलिंडरसाठी 275 रुपये दिले जाणार आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार गॅस अनुदान ‘एएवाय’ रेशनकार्ड असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, असे नागरी पुरवठा खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर यांनी अधिसूचनेत म्हटले आहे.

राज्यात अंत्योदय अन्न योजनेतील कार्डधारकांची संख्या अकरा हजारांच्या आसपास आहे. या कार्डधारकांना गॅस सिलिंडर अनुदानामुळे थोडासा दिलासा मिळणार आहे. या कार्डधारकांना वार्षिक 3300 रुपये अनुदान प्राप्त होणार आहे.