>> कर्नाटक उच्च न्यायालयाचे निर्देश; पुढील सुनावणी सोमवारी होणार
कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब वादाप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. या प्रकरणी न्यायालय अंतिम निर्णय देईपर्यंत विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे धार्मिक पोषाख परिधान करण्यासाठी आग्रही राहू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार दि. १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
काल न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर दोन्ही बाजूच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने ही सूचना केली. तसेच विद्यार्थ्यांनी शांतता राखण्याचे आवाहनही न्यायालयाने केले. ऍड. संजय हेगडे आणि देवदत्त कामत या दोहोंची बाजू न्यायालयाने ऐकली.
हिजाब परिधान करणे हा मौलिक अधिकार आहे वा नाही ते आम्ही तपासून पाहू. तसेच या प्रकरणी न्यायालयाच्या कोणत्याही मौखिक कार्यवाहीचे वार्तांकन न करण्याचे निर्देशही न्यायालयाने माध्यमांना दिले आहेत.
दरम्यान, चार विद्यार्थिनींना कर्नाटक राज्यातील उडुपी जिल्ह्यातील महाविद्यालयात हिजाब परिधान करण्यापासून रोखण्यात आले. विद्यार्थिनींना हिजाब घालू द्यावा, या मागणीसाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच राज्यात हे प्रकरण चिघळल्यानंतर शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना जमण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.
तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
हे प्रकरण गुरुवारी सर्वोच्च न्यायालयापर्यंतही पोहोचले; मात्र या प्रकरणी आधी कर्नाटक उच्च न्यायालयाला सुनावणी पूर्ण करून निर्णय घेऊ दे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी लक्ष घालेल, असे सरन्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान सांगितले. या प्रकरणी तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. हे प्रकरण उच्च न्यायालयात सुनावणीसाठी येत आहे. या टप्प्यावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप का करावा, असा सवालही सरन्यायाधीशांनी उपस्थित केला.