अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे –

0
1338

– डॉ. सचिन कांदोळकर
गोमंतकातील थोर संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांचे हे त्रिशताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने सरकारी पातळीवरून राज्यात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जिथे ज्ञान आहे तिथे अज्ञान असूच शकत नाही, असे म्हणणार्‍या पेडण्यातील या थोर संतकवीचे पेडण्याच्याच महाविद्यालयाला नाव देऊन या कार्यक्रमाची सुरवात होत आहे.
पालये गावच्या या संतकवीचा १७१४ मध्ये जन्म झाला. बांदा येथेही त्यांचे वास्तव्य होते. ‘अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे….’ असा संदेश देणार्‍या सोहिरोबानाथांनी ‘सिद्धान्तसंहिता’,‘अद्वयानंद’, ‘पूर्णाक्षरी’, ‘अक्षयबोध’ व ‘महदनुभवेश्‍वरी’ असे ग्रंथ लिहिले. ‘सिद्धान्तसंहिता’ या ग्रंथात सुमारे पाच हजार, तर ‘महदनुभवेश्‍वरी’ या ग्रंथात नऊ हजारांहून जास्त ओव्या आहेत. इतर तीन ग्रंथांमध्ये प्रत्येकी पाचशे ओव्या आहेत. या सर्व ग्रंथांचा लेखनकाळ १७४८ ते १७५० असा आहे. ग्रंथलेखनाव्यतिरिक्त सुमारे पाच हजार पदे त्यांनी लिहिली, असे म्हणतात. त्यात अभंग, श्‍लोक, सवाया, कटिबंध, आरत्या इत्यादींचा समावेश आहे. वयाची चाळीशी पूर्ण व्हायच्या आधीच ते ग्रंथलेखन कार्यातून निवृत्त झाले आणि गावोगावच्या भजन मेळ्यांमध्ये सहभागी होऊ लागले. त्यांनी हिंदीमध्येही काव्यनिर्मिती केली आहे. ‘संतश्रेष्ठ नामदेवांनंतर उदंड हिंदी भक्तीकाव्य रचना करून उत्तरेस स्वतःच्या पंथाची ध्वजा लावणारा सोहिरोबांएवढा तोलामोलाचा सत्पुरुष महाराष्ट्र संतमंडळात दुसरा कुणी दिसत नाही,’ असे त्यांच्या चरित्राचे आणि त्यांच्या काव्याचे अभ्यासक बा. भ. बोरकर यांनी म्हटले आहे.
सोहिरोबांचे नाव एखाद्या रस्त्याला वा पुलाला दिले नाही हे एका अर्थी योग्यच झाले. त्यांचे नाव ज्ञानज्योत जिथे सदैव तेवत राहील अशा एखाद्या महाविद्यालयालाच शोभून दिसेल. पेडण्यातील विद्यार्थ्यांनी सोहिरोबांकडून घेण्यासारखे खूप काही आहे. सोहिरोबांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत ज्ञानसाधना केली. त्यांना कविता लिहिण्यास कागद मिळत नव्हते. स्फूर्ती येताच त्यांच्या तोंडून कविता बाहेर येई. लोक ती उतरून घेत असत. त्यांच्या घरी मात्र कागद नव्हते. अशावेळी सोहिरोबांची बहीण फणसाच्या पानांवर सारे काही लिहून ठेवीत असे. त्यांच्या घरात सुकलेल्या पानांच्या राशी पडलेल्या होत्या. एकदा घरात कोणी नसताना पाचोळा समजून कवितेची ती पाने आईने जाळून टाकली. परंतु सोहिरोबांची कविता अस्सल होती. म्हणून आजही ती टिकून राहिलेली आहे.
सोहिरोबांच्या काळात आजच्यासारखी शाळा – महाविद्यालये नव्हती. ज्ञानप्राप्तीसाठी केवळ पुस्तकी पांडित्य उपयोगाचे नाही, भोवतालचे जग आधी पाहून घेतले पाहिजे; असेही जणू हा संतकवी विद्यार्थ्यांना उपदेश करतो. सोहिरोबांनी मराठी संतवाङ्‌मयाचा अभ्यास केला होता. संस्कृत वाङ्‌मयाचेही त्यांनी सखोल वाचन केले होते. औषधी वनस्पती, रसशास्त्र इत्यादी विषयांचे ज्ञानही त्यांनी संपादन केले होते. जमाबंदीच्या कामात ते पारंगत होते. म्हणूनच तर त्यांना सावंतवाडीचे कुळकर्णीपद मिळाले होते.
‘आम्ही नव्हे हो पाचांतले, नव्हे पंचविसांतले’ असे म्हणणारे सोहिरोबा इतर संतकवींहून वेगळे आहेत. ते स्वतःच सांगतात- ‘एवढ्यालाही वळखोनिया, वेगळे आम्ही आतले’. ‘भजनाचे रंगी नाचणारा आणि विवेकनिष्ठ भक्तीचे शतदीप लावणारा ‘आतला’ सोहिरोबा विद्यार्थ्यांनी ओळखला पाहिजे. एकदा ते उज्जैनला गेलो होते. तेथे जिवबादादा केरकर या गोमंतकीय सरदारांनी त्यांची महादजी शिंद्यांशी गाठ घालून दिली. शिंदेही त्यावेळी कविता करीत होते. त्यांनी आपल्या काव्याची वही सोहिरोबांकडे दिली. काही कवितांवर नजर फिरवल्यानंतर ते म्हणाले,‘ज्या काव्यात प्रसाद नाही, साक्षात्कार नाही, ती कविता कसली?’ आपल्या काव्यावरील प्रतिकूल मतप्रदर्शनामुळे संतप्त झालेल्या शिंद्यांनी सोहिरोबांना खडसावले. त्यावेळी सोहिरोबांनी तिथल्या तिथेच त्यांना कवितेतून उत्तर दिले. त्यानंतर प्रभावित झालेल्या शिंद्यांनी देऊ केलेला पुरस्कारही त्यांनी नाकारला. सोहिरोबांच्या आयुष्यातील ही घटना आणि त्यावेळी स्फुरलेले काव्य आजही प्रेरणादायी ठरेल. सोहिरोबांचा हा निर्भिडपणा आजच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्यासारखा आहे.
सोहिरोबांनी भक्ती, ज्ञान व वैराग्य या विषयांवर कविता लिहिली. ज्ञानेश्‍वरांनी मानवतावादावर आधारलेली भक्तीची व्याख्या केली. त्यांनी यज्ञकर्म करणार्‍यांची आणि क्षुद्र दैवते पुजणार्‍यांची निंदा केली आहे आणि त्याचबरोबर परमेश्‍वराच्या शोधात भटकणार्‍यांची संभावना केली आहे. जे अहंकाराचा त्याग करतात आणि ‘जे जगा धाकुटे’ होतात तेच कुठेतरी परमेश्‍वराशी जवळ जातात. सोहिरोबाही याच भक्तीचा पुरस्कार आपल्या काव्यातून करतात.
सोहिरोबांच्या कवितेतील भक्ती विवेकनिष्ठ आहे. ‘चंद्र तेथे चंद्रिका| शंभु तेथे अंबिका| संत तेथे विवेका असणे जी ॥ हा ज्ञानेश्‍वरांनी सांगितलेला विवेक सोहिरोबांच्या ठायी होता. भवसागर तरून जाण्यासाठी विवेक हाच मार्ग आहे, असे ‘हरिभजनावीण काळ’ या अभंगात सोहिरोबा म्हणतात. दुसर्‍या एका अभंगात ते सांगतात, ‘नित्यानित्य विवेके निवडा, जेवि हंस सलिल पया रे| याहुनि आणिक तीर्थे न लागति तुम्हां/हे काशि गया रे’ विवेकाचे महत्त्व ते विशद करतात- ‘विवेकाची ठरेल ओल| ऐसे बोलावे की बोल| आपुल्या मते उगाच चिखल कालवू नको रे’| सोहिरोबांनी कुठलेही चमत्कार न करता विवेकाच्या बळावर हजारो लोकांना सन्मार्गी लावले. त्या काळात त्यांनाही धमक्या मिळत होत्या. उज्जैनीला तर त्यांना एका पंडिताने विहिरीत ढकलून दिले होते. सुमारे अडिचशे वर्षांपूर्वी सोहिरोबांनी समाजात केलेला विवेकजागर आजच्या विद्यार्थ्यांनी समजून घेतला पाहिजे.
सोहिरोबांनी आयुष्यभर ज्ञान संपादन केले आणि आपण मिळविलेले ज्ञान लोकांना दिले. उत्तर भारतातही ते गेले. तिथेही लोकांना उपदेश केला. या कार्यात भाषेची अडचण त्यांना भासली नाही. जिथे गेले तेथे त्यांनी पदे रचली. त्यांचे एकेक पद म्हणजे एकेक गीतबद्ध विचार आहेत, असे म्हणतात ते खरे आहे. अठराव्या शतकात मराठी कवींकडून अध्यात्मपर जे बरेच स्वतंत्र लेखन झाले त्यात सोहिरोबांच्या लेखानास प्रथम स्थान द्यावे लागेल, असे त्यांच्या संदर्भात मराठी वाङ्‌मयकोशाच्या पहिल्या खंडात म्हटले आहे.
अविवेकाची काजळी फेडणारा हा ज्ञानदिवा पेडण्याच्या सरकारी महाविद्यालयात ‘दिवसराती’ तेवत राहणारा आहे. खंत एकाच गोष्टीची वाटते की, त्यांच्या ग्रंथपंचकाचा व इतर साहित्याचा चिकित्सक अभ्यास झालेला नाही. न. र. फाटक यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, गोमंतकातील लेखकांच्या संतांवरील लेखानात भाविकता अधिक असते, चिकित्सकपणाचा मात्र अभाव असतो. सोहिरोबांनीच एका अभंगात ‘मी कोण कोठूनी आलो, या शरीरी स्मरण धरा रे’ असे सांगून फिरून आपुल्या मुळाशी यावे’ असा उपदेश केला आहे. त्याप्रमाणे आजच्या पिढीनेही आपल्या मुळांचा चिकित्सकपणे शोध घेण्याची आवश्यकता आहे, असे या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने म्हणावेसे वाटते.