अंतराळात भारत लिहितोय नवा इतिहास

0
16
  • प्रा. नंदकुमार गोरे

बहुचर्चित चांद्रयान-3 मिशन मोहिमेद्वारे भारताला आपली अंतराळ शक्ती जगाला दाखवायची आहे. मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे करणारा भारत हा चौथा देश ठरेल. 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि 14 दिवस चंद्रावर प्रयोग करतील, तर प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल.

प्रत्येक वैज्ञानिक मोहिमेला यश येतेच असे नाही. काही वेळा अपयश आले तरी चुकांमधून शिकून पुढची मोहीम हाती घ्यायची असते. अंतराळातील संशोधन तर अधिक अवघड असते. भुताखेतांचा देश असे हिणवल्या गेलेल्या भारताने आता परदेशातील उपग्रह प्रक्षेपित करण्यापर्यंत मजल गाठली आहे. अनेक उपग्रह एकदाच अंतराळात पाठवण्याचा विक्रमही भारताने केला आहे.

चंद्र हा तर आपला भावनिक विषय. चंद्रावर 1969 मध्ये अमेरिकेने पहिले पाऊल टाकले. भारतानेही त्याच्या अगोदर (नाव नंतर पडले) सहा वर्षे ‘इस्रो’च्या अंतराळ संशोधनाचा पाया घालायला सुरुवात केली होती. आता ‘चांद्रयान-3’चे यशस्वी प्रक्षेपण करून भारताने अंतराळ प्रक्षेपणाचा एक नवा अध्याय लिहिला आहे. ‘चांद्रयान-2′ मोहिमेला अपयश आले; परंतु त्यानंतर नाउमेद न होता आपण पुढच्या मोहिमेची तयारी केली. तीन वर्षे 11 महिने आणि 23 दिवसांनी शुक्रवारी भारताने ‘चांद्रयान-3′ मिशन लाँच केले. आंध्र प्रदेशामधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2.35 वाजता बाहुबली रॉकेट ‘एलव्हीएम3-एम4’द्वारे ते अवकाशात पाठवले. 16 मिनिटांनंतर चांद्रयान रॉकेटद्वारे कक्षेत स्थापित करण्यात आले.
या मोहिमेद्वारे भारताला आपली अंतराळ शक्ती जगाला दाखवायची आहे. मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे करणारा भारत हा चौथा देश ठरेल. ‘चांद्रयान-3′ अंतराळ-यानामध्ये तीन लँडर/रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहेत. सुमारे 40 दिवसांनंतर म्हणजेच 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील. हे दोघेही 14 दिवस चंद्रावर प्रयोग करतील, तर प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल.

या मिशनच्या माध्यमातून ‘इस्रो’ चंद्राच्या पृष्ठभागाचा वेध घेण्याचा प्रयत्न करेल. माती आणि धूळ यांचा अभ्यास करेल. ‘चांद्रयान-3’चे बजेट सुमारे 615 कोटी रुपये आहे. अलीकडील ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे बजेट 700 कोटी रुपये होते. याचा अर्थ अन्य देशांपेक्षा आपण किती खर्चाची चांद्र मोहीम हाती घेतली आहे, हे लक्षात येते. चार वर्षांपूर्वी पाठवलेल्या ‘चांद्रयान-2’चा खर्च 603 कोटी रुपये होता. या मिशनद्वारे भारत जगाला सांगू इच्छितो की, आपली चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याची आणि तेथे रोव्हर चालवण्याची क्षमता आहे. त्यामुळे भारतावरील जगाचा विश्वास वाढेल. त्याचा उपयोग भारताला जगातील इतर देशांमधून अंतराळ व्यवसायवाढीसाठी होईल. भारताने आपल्या ‘हेवी लिफ्ट लाँच व्हेहिकल एलव्हीएम3-एम4’वरून चांद्रयान प्रक्षेपित करण्यात आले. त्यातून या वाहनाची क्षमता जगाला दाखवून दिली गेली. यापूर्वी ‘ॲमेझॉन’चे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ कंपनीने ‘इस्रो’चे ‘एलव्हीएम 3′ रॉकेट वापरण्यात रस दाखवला होता. ‘ब्लू ओरिजिन’ला ‘एलव्हीएम 3′ व्यावसायिक आणि पर्यटन हेतूंसाठी वापरायचे आहे. ‘एलव्हीएम 3’द्वारे ‘ब्लू ओरिजिन’ आपल्या क्रू कॅप्सूलला नियोजित ‘लो अर्थ ऑर्बिट (एलईओ) स्पेस स्टेशन’वर घेऊन जाईल. चंद्राचे ध्रुवीय प्रदेश इतर प्रदेशांपेक्षा बरेच वेगळे आहेत.

चंद्रावर अनेक भाग असे आहेत, जिथे सूर्यप्रकाश कधीच पोहोचत नाही आणि तापमान 200 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते. अशा परिस्थितीत बर्फाच्या रूपात अजूनही पाणी असू शकते, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. भारताच्या 2008 ‘चांद्रयान-1′ मोहिमेने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याची उपस्थिती दर्शवली होती. या मोहिमेची लँडिंग साइट ‘चांद्रयान-2’सारखीच आहे; मात्र यावेळी क्षेत्रफळ वाढवण्यात आले आहे. ‘चांद्रयान-2’मधील लँडिंग साइट 500 मीटर बाय 500 मीटर इतकी होती. आता, लँडिंग साइट चार किलोमीटर बाय 2.5 किलोमीटर आहे. सर्वकाही ठीक राहिल्यास ‘चांद्रयान-3′ चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँड होणारे जगातील पहिले अंतराळयान बनेल. पूर्वीची सर्व अंतराळयाने चंद्राच्या विषुववृत्ताच्या उत्तरेला किंवा दक्षिणेला काही अंश अक्षांशांवर उतरली आहेत. यावेळी लँडरच्या चार कोपऱ्यांवर चार इंजिने आहेत; पण गेल्यावेळी मध्यभागी असलेले पाचवे इंजिन काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय फायनल लँडिंग दोन इंजिनांच्या मदतीने केले जाईल. त्यामुळे दोन इंजिने आपत्कालीन परिस्थितीत काम करू शकतील. अधिक इंधन सोबत वाहून नेण्यासाठी पाचवे इंजिन काढून टाकण्यात आले.

चंद्रावर 14 दिवस रात्र आणि 14 दिवस प्रकाश असतो. रात्रीच्या वेळी तापमान 100 अंश सेल्सिअसच्या खाली जाते. चांद्रयानचे लँडर आणि रोव्हर सोलर पॅनलमधून ऊर्जा निर्माण करतील. त्यामुळे ते 14 दिवस वीजनिर्मिती करतील; पण रात्रीच्या वेळी वीजनिर्मिती प्रक्रिया बंद होईल. वीजनिर्मिती न झाल्यास इलेक्ट्रॉनिक उपकरणे कडाक्याची थंडी सहन करू शकणार नाहीत आणि खराब होतील.

‘चांद्रयान-3’ने अवकाशात यशस्वी झेप घेतली आणि एकच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आता पुढील 42 दिवस ‘इस्रो’तील शास्त्रज्ञांचे लक्ष या यानाकडे असणार आहे. या मोहिमेच्या यशस्वी उड्डाणाचा आनंद ‘इस्रो’तील अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरही दिसून आला. चंद्रावर सुरक्षित पोहोचणे, तिथे वैज्ञानिक उपकरणे काही काळ सुसज्ज ठेवणे आणि काही वैज्ञानिक प्रयोग करणे ही या मोहिमेची मुख्य उद्दिष्टे आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर अपघात होऊ न देता यशस्वीपणे यान उतरवण्याची अवघड कामगिरी आजवर फक्त रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनीच करून दाखवली आहे. ही कामगिरी करून दाखवणारा चौथा देश म्हणून आपली ओळख निर्माण करण्याची भारताची धडपड सुरू आहे. ‘चांद्रयान-2′ मोहिमेदरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण होऊन भारताच्या पदरी अपयश आले होते. अलीकडेच भारताने ‘नासा’बरोबर अंतराळ संशोधनासंबंधीचा शांतता करार केला आहे. म्हणजेच या संशोधनाचा उपयोग फक्त उपकारक कामांसाठीच केला जाईल. ‘चांद्रयान-3’मुळे भारताला चंद्रासंबंधीच्या अनेक गोष्टी समजतील; तसेच पुढच्या चंद्र मोहिमांसाठीसुद्धा याची बरीच मदत होईल. चंद्राच्या पृष्ठभागाच्या साधारण 100 किलोमीटर परिसरात पोहोचल्यानंतर चांद्रयानामधले दोन भाग सुटे होतील आणि चंद्रावरच राहणारा भाग अलगद उतरण्यासाठी सज्ज होईल.

‘इस्रो’च्या म्हणण्यानुसार यासाठी अत्यंत आधुनिक प्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामध्ये चंद्रावर अलगद उतरण्याची व्यवस्था आहे. तसेच वाटेत येणारे अडथळे टाळणे आणि त्यापासून आपल्याला इजा होऊ न देणे अशी व्यवस्था या यानामध्ये आहे. चंद्रावर नेमकी कशी परिस्थिती असेल यासाठीच्या अनेक चाचण्या ‘इस्रो’ने घेतल्या आहेत. उदाहरणार्थ, चंद्रावरच्या अतिशीतल वातावरणासारखे वातावरण कृत्रिमरीत्या निर्माण करणे, तसेच चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवल्यानंतर नेमके काय होईल यासंबंधीचे प्रयोग, अशा गोष्टी ‘इस्रो’ने तपासल्या आहेत. ‘चंद्रयान-3′ यंत्रणेचे तीन मुख्य भाग म्हणजे रोव्हर, लँडर आणि प्रपोल्शन इंजिन. रोव्हर यंत्रणा चंद्राच्या पृष्ठभागाचा अंदाज घेणे, त्याची वैज्ञानिक मोजमापे करणे, पृष्ठभाग तपासणे अशी कामे करेल. पृथ्वीकडे ही माहिती पाठवण्यासाठी लँडरचा वापर होईल. प्रपोल्शन यानाला गती देण्यासाठी वापरले जाईल. योगायोगाची बाब म्हणजे 20 जुलै रोजी जग ‘आंतरराष्ट्रीय चंद्रमा दिवस’ साजरा करण्याच्या तयारीत असताना चंद्राचा अभ्यास करण्यासाठी भारताने त्याच्या दिशेने घेतलेली मोठी उडी दुधात साखरेसारखी ठरेल!
‘चांद्रयान-3’मध्ये ‘स्पेक्ट्रो-पोलारोमेट्री ऑफ व्हिजिबल प्लॅनेट अर्थ’देखील आहे, जे आपल्या शास्त्रज्ञांना चंद्राभोवती फिरणाऱ्या किरकोळ ग्रहांची आणि आपल्या सौरमालेबाहेरील इतर ग्रहांची माहिती गोळा करण्यास सक्षम करेल. म्हणूनच आपली ही मोहीम केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगाच्या वैज्ञानिक समुदायासाठी महत्त्वाची आहे, असे म्हटले जात आहे. या मोहिमेबाबतची दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हे लँडर अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नसलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर जाणार आहे. म्हणूनच या मोहिमेमुळे आपल्या पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असणाऱ्या चंद्राच्या माहितीत आणखी वाढ होणार हे निश्चित आहे. या कारणाने भविष्यातील अंतराळ संशोधनाची क्षमता चंद्रावरच नाही तर इतर ग्रहांबाबतही विकसित होईल. याला ‘भारतीय चंद्र अन्वेषण कार्यक्रम’ असेही संबोधले जाते. भारताने 2008 मध्ये आपली पहिली चंद्र मोहीम ‘चांद्रयान-1′ प्रक्षेपित केली. त्यावर ऑर्बिटर आणि इम्पॅक्ट प्रोबदेखील होते, परंतु ते शॅकलेटॉन क्रेटरजवळ क्रॅश झाले. पुढे या जागेला ‘जवाहर पॉइंट’ असे नाव देण्यात आले. भविष्यातील आर्टेमिस मिशनअंतर्गत ‘नासा’ 2025 पर्यंत पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर उतरवण्याच्या योजनेवर काम करत आहे. जपान, दक्षिण कोरिया, चीन आणि रशिया हे देशदेखील आपापल्या चंद्र मोहिमांवर काम करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडेच पार पडलेल्या अमेरिका दौऱ्यात भारत या आर्टेमिस करारात अधिकृतपणे सामील झाला. अशा प्रकारे भारतासह बरेचसे देश चांद्रमोहिमेवर मोठा खर्च करत असल्यामुळे काहीजण याला नव्या युगाची ‘स्पेस रेस’ म्हणत आहेत तर काहीजण ही आपली तांत्रिक क्षमता दाखवण्याची संधी असल्याचे सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचा विचार केल्यास चीनशी आपली स्पर्धा नाकारता येत नाही. भारताच्या या शेजारी देशाने ‘चांग-ए-6′, ‘चांग-ए-7′ आणि ‘चांग-ए-8′ मोहिमांना मान्यता दिली असून रशियासोबत चंद्रावर संशोधन केंद्र बांधण्याचीही त्यांची योजना आहे. पण अंतराळ शर्यतीव्यतिरिक्तही अशा सर्व मोहिमा भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मंगळ मोहिमेसंदर्भातही या मोहिमांना विशेष महत्त्व आहे. पृथ्वीपासून दूर अंतराळात जाण्यापेक्षा चंद्रावर जाण्यासाठी कमी इंधन लागते. खेरीज भविष्यातील काही मोहिमांमध्ये अशा महत्त्वाच्या गोष्टीही चंद्रावर पाठवल्या जातील, जेणेकरून या दशकात मानव तेथे दीर्घकाळ राहू शकतील. त्यादृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरते.