अंग्रेजोंके जमाने के असरानी

0
1

ज्यांच्या एका संवादाचा असर देखील गेली पन्नास वर्षे टिकून आहे असे असरानी आपल्यातून निघून गेले. ऐन दिवाळीच्या रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. असरानींचे नाव ‘गोवर्धन’ होते हे त्यांच्या मृत्यूपश्चातच सर्वांना कळले, कारण आजवर केवळ ‘असरानी’ ह्या आडनावातूनच त्यांनी आपली मुद्रा चंदेरी पडद्यावर उमटवली होती. “हम अंग्रेजों के जमाने के जेलर है, आ हाऽ” म्हणत हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरचा आव आणणाऱ्या, परंतु चार्ली चॅप्लीनसारख्या दिसणाऱ्या ‘शोले’ मधील त्या जेलरने पन्नास वर्षे लोटली तरी आजही आपली छाप चित्रपटरसिकांच्या मनावर कायम ठेवलेली आहे, हे खरोखरच विशेष आहे. कोण नव्हते त्या चित्रपटात? अमिताभ होता, धर्मेंद्र होता, हेमा मालिनी, संजीवकुमार, अमजद खान.. असा सगळा तगडा संच असूनही असरानींच्या तोंडचे एक दोन संवाद देखील अगदी अजरामर होऊन गेले. ही त्यांच्या संवादफेकीची आणि त्यातील जबरदस्त ‘टायमिंग’ ची ताकद होती. ‘शोले’ ला गेल्या ऑगस्ट महिन्यात पन्नास वर्षे झाली. म्हणजे गेल्या पन्नास वर्षांत ‘शोले’ पन्नास वेळा पाहणाऱ्यांना देखील असरानींच्या त्या ‘आधे इधर जाव, आधे उधर जाव..’ च्या दृश्याने खळखळून हसवले. असरानींचा विनोद हा निखळ विनोद असे. त्यांना विनोदाच्या नावाखाली सर्कस करण्याची गरज भासली नाही किंवा त्यांचा विनोद कधी अश्लीलतेकडेही झुकला नाही वा खालच्या पातळीवर गेला नाही. आपल्या विनोदाची पातळी त्यांनी नेहमीच सांभाळली. त्यामुळेच विनोदी अभिनेता असूनही त्यांच्याप्रती त्यांच्या सहकलाकारांच्या मनात आदराची भावना दिसते. वास्तविक असरानी हे केवळ विनोदी अभिनेते नव्हते. ते अभिनयाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतलेले एक अभिनेते होते. पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे ते एक स्नातक. एफटीआयआयचे प्रमाणपत्र गाठीशी असूनही जेव्हा त्यांनी आणि त्यांच्या सहाध्यायींनी हिंदी चित्रपटसृष्टीची दारे ठोठावली, तेव्हा अभिनय असा शाळेत शिकता येतो का, आजच्या नायक नायिकांनी असे प्रमाणपत्र घेतलेले आहे का असे कुत्सितपणे त्यांना विचारले गेले. त्यांनी घेतलेल्या अभिनयाच्या शास्त्रोक्त शिक्षणाची निर्भर्त्सना केली गेली. शेवटी एफटीआयआयच्या भेटीवर आलेल्या तत्कालीन केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री इंदिरा गांधींकडेच ह्या विद्यार्थ्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले. इंदिरा गांधी पुण्यातून तडक मुंबईत आल्या आणि तत्कालीन चित्रपट दिग्दर्शकांना त्यांनी एफटीआयआयच्या गुणवान विद्यार्थ्यांना संधी देत नसल्याबद्दल खडसावले. त्यातूनच जया भादुरीला ‘गुड्डी’ मिळाला. त्यात तिने आपली कमाल दाखवली आणि एफटीआयआयकडे बघण्याचा हिंदी चित्रपटसृष्टीचा दृष्टिकोन बदलला. मूळ पाकिस्तानातून फाळणीनंतर भारतात आलेल्या सिंधी घराण्यात जन्मलेल्या असरानींच्या वडिलांचा जयपूरमध्ये गालिचांचा व्यवसाय होता. तेथेच रंगभूमीवर असरानींनी अभिनयाची पहिली पावले टाकली आणि मग कारकीर्द घडवण्यासाठी मुंबईत पळून आले. दिग्दर्शक ह्रषिकेश मुखर्जींनी त्यांना अभिनयाचे शास्त्रोक्त शिक्षण घेण्याचा सल्ला दिला त्यामुळे त्यांनी एफटीआयआयमध्ये प्रवेश घेतला. असरानी यांनी गेल्या पाच दशकांच्या आपल्या चित्रपट कारकिर्दीत जवळजवळ साडेतीनशे चित्रपट केले. आता त्यांच्या पश्चात्‌‍ त्यांची भूमिका असलेले ‘भूतबंगला’ आणि ‘हैवान’ हे दोन चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहेत. म्हणजेच चित्रपटक्षेत्रात अखेरपर्यंत कार्यरत असूनही असरानी पुरस्कार सोहळे, इव्हेंटस्‌‍, रिअलिटी शोज्‌‍, बॉलिवूड पार्ट्या यापासून मात्र सदैव कटाक्षाने दूर असायचे. त्यांची पत्नी मंजू बंसल ही देखील एकेकाळी अभिनेत्री होती. अनेक चित्रपटांत तिने त्यावेळी भूमिका केल्या होत्या. परंतु लग्नानंतर तिने करिअरवर पाणी सोडून गृहस्थाश्रम स्वीकारला. व्यवसायातील झगमगाटाची बाधा त्यांनी आपल्या संसाराला होऊ दिली नाही. आपल्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार अगदी साधेपणाने व शांततेत व्हावेत अशी इच्छा असरानी यांनी पत्नीपाशी व्यक्त केली होती. त्यामुळे माध्यमांच्या गराड्यात अंत्यसंस्कारांचा तमाशा होऊ न देता शांतपणे मुंबईत सांताक्रुजच्या स्मशानभूमीत असरानींवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि नंतरच त्यांच्या निधनाची बातमी प्रसृत करण्यात आली. मृत्यूच्या आधी असरानींनी इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. मृत्यू हा असाच अनपेक्षितरीत्या झडप घालत असतो. त्यातही जगाला प्रिय असलेल्या व्यक्ती मृत्यूलाही अधिक प्रिय असाव्यात असेच नेहमी अनुभवास येते. असरानींसारखे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व असेच आज आपल्यातून सर्वांना चटका लावत अकल्पित निघून गेले आहे. मागे राहिला आहे तो त्यांचा खळखळून हसवणारा, प्रेक्षकांना सगळ्या व्यथा विसरायला लावणारा अस्सल विनोदी अभिनय!