अंगणवाडी धान्यपुरवठा; फेडरेशनचे कंत्राट रद्द

0
197

गोवा राज्य सहकारी मार्केटिंग ऍण्ड सप्लाय फेडरेशन लिमिटेडकडून महिला आणि बाल काल्याण खात्याने राज्यातील विविध अंगणवाडींना धान्य पुरवठा करण्यासाठीच्या एकात्मिक बाल विकास कल्याण योजनेचे कंत्राट काढून घेतल्याने मार्केटिंग फेडरेशनचे कोट्यवधी रु.चे नुकसान होण्याची भीती फेडरेशनमधील सूत्रांनी व्यक्त केली आहे.
वरील योजनेखाली फेडरेशन राज्यातील सर्व अंगणवाडींना मुग, वाटाणे, नाचणे, चवळी, तुरडाळ, चणाडाळ, काबुली चणा आदी धान्य पुरवत असे. वरील योजना ही फेडरेशनच्या आर्थिक उलाढालीचे मुख्य पाठबळ ठरली होती. मात्र, आता ती फेडरेशनकडून काढून घेतल्याने संस्था भीषण आर्थिक संकटात सापडणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
महिला आणि बाल कल्याण खात्यामार्फत राबवण्यात येणार्‍या एकात्मिक बाल विकास योजनेसाठी राज्यातील ११ तालुक्यांच्या आयसीडीएस केंद्राना फेडरेशनतर्फेच १९८१ सालापासून धान्य पुरवठा करण्यात येत असे. धान्याचे पॅकिंग तथा पुरवठा करण्याच्या कामासाठी फेडरेशनकडे सुमारे दोनशे रोजंदारी कामगार काम करतात. ही योजनाच रद्द झाल्याने या कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळणार आहे. २०१३-१४ या काळात आय्‌सीडीएस् योजनेसाठी फेडरेशनची वार्षिक उलाढाल १३ कोटी २७ लाख ६६ हजार रु. एवढी झाली होती. यावर्षी आतापर्यंत ५ कोटी ६८ लाख २९ हजार रु. उलाढाल झाली. या योजनेची फेडरेशनला सरकारकडून येणे असलेली थकबाकीच सुमारे ११ कोटी रु. एवढी आहे. तात्कालीन वित्त खात्याचे अवर सचिव एस. एम. पोळे यांनी २४ सप्टेंबर २००८ रोजी एक परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकानुसार सरकारी खाती, इस्पितळे, तुरुंग प्रशासन, महामंडळे, अनुदानित शैक्षणिक संस्था आदीनी खाद्यान्न, कडधान्य हे फक्त मार्केटिंग फेडरेशनकडून खरेदी करावे, असे म्हटले होते.
दरम्यान, महिला आणि बाल कल्याण खात्याने निवडलेला हुबळी येथील व्यापारी हा फेडरेशनचाच मुख्य पुरवठादार आहे. तो मुख्य पुरवठादार असल्याने त्याच्याकडे कमी दरात धान्य मिळते म्हणून थेट त्याच्याकडून खरेदी करण्याचे धोरण खात्याने अवलंबिले आहे. या योजनेसाठी आज फेडरेशनच्या शेकडो कामगारांचे हात राबत आहेत. अशावेळी या कामगारांना देशोधडीला लावून केवळ एका व्यापार्‍याचे हीत जपणे कितपत योग्य आहे, असा प्रश्‍न फेडरेशनमधील सूत्रांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व खात्याचे मंत्री दिलीप परूळेकर यांनी यात लक्ष घालून या निविदेचा फेरविचार करावा, अशी मागणी फेडरेशनच्या सूत्रांनी केली आहे.