>> गोव्यात प्रवाशांचे हाल, काँग्रेसची टीका
अंकोला कर्नाटक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचारसभेसाठी लोकांना नेण्यासाठी कदंबच्या शंभरहून अधिक बस कर्नाटकात नेल्याने गोव्यातील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
मडगाव तसेच पणजी व इतर भागात वाहतूक करणाऱ्या कदंब बसची संख्या कमी दिसून येत होती. प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळत राहावे लागले. मंगळवारी रात्री उशिरा, बुधवारी पहाटेकदंबाच्या शेकडो बस कर्नाटक राज्यात नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
कदंब महामंडळाच्या अपुऱ्या बसगाड्यांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात मडगाव येथील कदंबाच्या संबंधित अधिकाऱ्याने नकार दिला. कदंबाच्या पणजीतील मुख्यालयाशी संपर्क साधा, असे अधिकाऱ्याकडून सांगितले जात होते. प्रवाशांची गैरसोय केल्याने काँग्रेस पक्षाकडून टीका केली जात आहे.