महिला एकेरीतील भारताची आघाडीची खेळाडू अंकिता रैना हिला उपांत्य फेरीत चीनच्या झांग शुआई हिच्याकडून पराजित व्हावे लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत ३४व्या स्थानावर असलेल्या शुआई हिने १८९व्या स्थानावरील रैनाचा ६-४, ७-६ (६) असा पराभव केला. पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत रोहन बोपण्णा व दिविज शरण यांनी अंतिम फेरी गाठताना सुवर्णपदकाची अपेक्षा जागवली आहे.
बोपण्णा-दिविज जोडीने काल गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीत जपानच्या उगेसुगी कायटो व शिम्बुकू शो यांना ४-६, ६-३, १०- ८ असे पराजित केले. आज सुवर्णपदकासाठी त्यांचा सामना कझाकस्तानच्या बुबलिक आलेक्झांडर व डॅनिस येवसेयेव यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रज्ञेश गुणेश्वरन याने द. कोरियाच्या क्वोन सोनवू याला जवळपास साडेतीन तास चाललेल्या लढतीत ६-७, ६-४, ७-६ (८) असे हरविले. मिश्र दुहेरीत मात्र रोहन- अंकिता जोडीच्या उपांत्यपूर्व फेरीतील पराभवामुळे पदकाची आशा संपली. त्यांना इंडोनेशियाच्या ख्रिस्तोफर रुंगकाट व सुतजियादी अल्तादी यांनी ६-४, १-६, १०-६ असे पराजित केले.