- प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट
ग्लेन तिकलो हे उत्कृष्ट क्रीडापटू असून त्यांनी फुटबॉल आणि हॉकी या क्रीडाप्रकारांत अनेकवेळा गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. आंतिनिओ स्पोर्टस् क्लबतर्फे ते सिनिअर डिव्हीजन फुटबॉल खेळायचे. भारतीय संघाचा दुसरा गोलरक्षक म्हणूनही त्यांची निवड झाली होती.
गोवा राज्य विधिमंडळातील हळदोणा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विद्यमान आमदार आणि गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष ग्लेन जॉन विजय आंब्रोज इ सौझा तिकलो यांचा जन्म दि. 12 मार्च 1962 रोजी मध्य-पूर्व राष्ट्रातील सौदी अरेबियाचा भाग असलेल्या ‘एडन’ येथे झाला. त्यांचे वडील व्हितो जुआंव सौझा तिकलो हे इ.स. 1955 ते 1965 पर्यंत दहा वर्षे तेथील एका कंपनीत कामाला होते. त्यांचे आपली पत्नी श्रीमती हेलेना मास्कारेन्हास सौझा इ तिकलो यांच्यासह ‘एडन’ला वास्तव्य होते. दोघेही पती-पत्नी अत्यंत देखणी असल्याने त्यांचा देखणेपणा श्री. ग्लेन या त्यांच्या पुत्रामध्ये उतरला असल्याने ग्लेन यांचे व्यक्तिमत्त्वही त्यांच्याप्रमाणेच देखणे आहे.
श्री. व्हितो तिकलो हे आसगाव कोमुनिदादीचे गावकार होते. म्हापसा पालिका उद्यान (सध्याचे राम मनोहर लोहिया उद्यान) व टॅक्सी स्टँड यांमधील भागात उद्यानाला लागूनच पेट्रोल पंप चालवायचे. सध्या हा पेट्रोल पंप ‘तिकलो पेट्रोल पंप’ या नावाने ग्नेन हेच चालवतात. शिवाय म्हापसा-पणजी या महामार्गावरील पणजीला जाताना पर्वरी येथे शेतातील डाव्या बाजूला त्यांच्या मालकीचा डिझेल पंप आहे. श्री. ग्लेन यांचे कळंगुट-बागा रस्त्यावर ‘तिकलो रिसॉर्ट’ हे हॉटेल आहे. या हॉटेलचे व्यवस्थापन त्यांचे बंधू पाहतात. याशिवाय बांधकाम व जमीन खरेदी-विक्री व्यवहारात ते रस घेतात.
श्री. ग्लेन हे सप्टेंबर 2011 मध्ये भाजपाचे सदस्य बनले आणि सर्वप्रथम त्यांनी हळदोणा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून गोवा राज्य विधिमंडळाच्या दि. 3 मार्च 2012 रोजी झालेल्या सहाव्या विधिमंडळ निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आणि ते या निवडणुकीत निवडून येऊन प्रथमच गोवा राज्य विधिमंडळाचे सदस्य बनले. या निवडणुकीत त्यांनी 10,315 मते मिळवत आपले नजीकचे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार व यापूर्वी अनेक वेळा या मतदारसंघाचे राज्य विधिमंडळात प्रतिनिधित्व करणारे अॅड. दयानंद नार्वेकर (7,839 मते), तृणमूल काँग्रेस पक्षाचे तत्कालीन गोवा प्रदेशाध्यक्ष व उमेदवार डॉ. विल्फ्रेड डिसौझा (643), अपक्ष रवींद्र पणजीकर (256 मते), गोवा सुराज पक्षाचे ज्युलिएस परेरा (236 मते) यांना पराभूत केले होते.
विधिमंडळ सदस्यत्वाच्या आपल्या या कार्यकाळात गोवा गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. शिवाय विधिमंडळाच्या शासकीय आश्वासन समितीचे अध्यक्ष (इ.स. 2012), लेखा समिती सदस्य (इ.स. 2012), शासकीय विधेयक छाननी समिती सदस्य (इ.स. 2012), गोवा भूवापर दुरुस्ती कायदा छाननी समिती सदस्य (इ.स. 2012) आदी गोवा विधिमंडळ समित्यांवर ते कार्यरत होते.
सहाव्या गोवा राज्य विधिमंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर दि. 5 फेब्रुवारी 2017 रोजी गोवा राज्यासाठी झालेल्या सातव्या विधिमंडळ निवडणुकीत त्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली आणि पुन्हा हळदोणे मतदारसंघाचे प्रतिनिधि म्हणून गोवा राज्य विधिमंडळात प्रवेश केला. या निवडणुकीत त्यांना 9,450 मते मिळाली होती. त्यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. रवींद्र उपाख्य अमरनाथ वासुदेव पणजीकर (अंदाजे 5,000 मते), आप पक्षाचे वर्सुला डिसौझा (अंदाजे 3000 मते) व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे श्री. महेश साटेलकर (अंदाजे 2600 मते) यांना पराभूत केले होते.
आज श्री. ग्लेन हे गोवा औद्योगिक महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ज्ञानप्रसारक उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्राचार्य या नात्याने श्री. ग्लेन तिकलो अस्मादिकांचे विद्यार्थी होते. अस्मादिकांच्या शिक्षणसंस्थेत त्यांनी वाणिज्य शाखेचे बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले होते.
काम्र म्युनिसिपाल द बार्देसच्या (म्हापसा नगरपालिकेची जुनी इमारत) उतरंडीवर डाव्या बाजूला कै. जनार्दन भोबे यांचे शालेय पुस्तके व स्टेशनरी विक्रीचे दुकान असलेल्या इमारतीला लागूनच तिकलो कुटुंबीयांच्या मालकीचे दोन माळ्या असलेले जुन्या वळणाचे घर होते. या इमारतीच्या तळमजल्यावर कॉस्मे मातियश मिनेझिस व ख्रि. जुझे फर्नांडिस यांची औषधालये होती. शिवाय बंदुका व बंदुकांसाठी लागणारा दारूगोळा विक्रीचे त्यांचे दुकान होते.
सदर इमारतीच्या पहिल्या माळ्यावर ‘साल्ढाणा इन्स्टिट्यूट ऑफ टाईपरायटिंग अॅण्ड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट’ होते. हे इन्स्टिट्यूट पर्रा-बार्देस येथील ख्रि. साल्ढाणा हे चालवायचे आणि इच्छुकांना टंकलेखनाचे व लघुलिपीचे प्रशिक्षण द्यायचे. दुसर्या माळीवर तिकलो कुटुंबीयांचे वास्तव्य असायचे.
येथून जवळच असलेल्या तळीवाड्यावर बालपण गेलेले असल्याने अस्मादिकांनी स्वतःच्या डोळ्यांनी ही इमारत व औषधालये पाहिली होती. ही इमारत 1992 मध्ये मोडून त्या ठिकाणी सध्या एक ‘आंब्रोसिओ सेंटर’ ही चारमजली इमारत उभी राहिली आहे. तळमजल्यावर ‘क्रेमेक्स’ हे बेकरीचे पदार्थ विकणारे आस्थापन व एक क्रिस्टल नावाचे हार्डवेअर दुकान व इमारतीच्या अंतर्गत सजावटीचे सामान विक्रीचे ‘क्रिस्टल’ नावाचे दुकान आहे. या चारमजली इमारतीत ‘हॉटेल व्हिलेना’ हे तिकलो कुटुंबीयांचे निवासी हॉटेल आहे.
वास्तविक पाहता तिकलो कुटुंबीयांचे मूळ घर कारे, सुकूर- पर्वरी येथे आहे. मुलांच्या शिक्षणाच्या व व्यवसायाच्या निमित्ताने म्हापशातील निवासस्थानी राहायचे आणि आठवड्याच्या शेवटी आपल्या वाडे-सुकूर येथील घरी जायचे. सध्या श्री. ग्लेन तिकलो यांचे वास्तव्य कारे-सुकूर येथील घरात आहे.
श्री. ग्लेन तिकलो हे उत्कृष्ट क्रीडापटू असून त्यांनी फुटबॉल आणि हॉकी या क्रीडाप्रकारांत अनेकवेळा गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. आंतिनिओ स्पोर्टस् क्लबतर्फे ते सिनिअर डिव्हीजन फुटबॉल खेळायचे. शाळा, महाविद्यालय व विद्यापीठाच्या हॉकी व फुटबॉलमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलेले असून भारतीय संघाचा दुसरा गोलरक्षक म्हणूनही त्यांची निवड झाली होती.
श्री. ग्लेन हे व्यावसायिक असले तरी ते चांगले क्रीडापटू आहेत. फुटबॉल, हॉकी, मार्शल आर्ट, क्रिकेट या खेळांत ते सहभागी होत असतात. इतरांना या खेळांत मार्गदर्शन करतात. करमणुकीच्या कार्यक्रमातही ते सहभागी होतात.
आजवर त्यांनी ऑस्ट्रेलिया, थायलंड, सिंगापूर, मलेशिया आदी देशांना भेटी दिल्या आहेत. कौतुकास्पद बाब म्हणजे आपले एक पक्षातील सहकारी फ्रेंकी कार्व्हालो यांच्या सहकार्याने ते आपल्या हळदोणा मतदारसंघात गरजू, दीन-दुबळ्या समाजासाठी अनेक सामाजिक योजना राबवत आहेत. एकेकाळी असलेला शेट्येवाडा, करासवाडा, कामरखाजन, आकय, बस्तोडा, उसकई, मयडे, नास्नोळा हा म्हापसा मतदारसंघाचा भाग आता हळदोणे मतदारसंघात समाविष्ट असल्याने त्यांनी आपले कार्य या भागात जोरदारपणे सुरू केले असून त्यांना मतदारांचाही योग्य तो प्रतिसाद मिळत आहे.