- डॉ. जयंती नायक
तिला कसला दुर्धर आजार मात्र नव्हता. एके दिवशी मृत्यू तिला घेऊन गेला, पण कधी हे कुणाला समजलच नाही. चार-पाच दिवस तिच्या घराकडे कोणी फिरकलाही नव्हता. तिचा लाडका पुतण्या कामासाठी आठ दिवस मुंबईला गेला होता. तो आला तेव्हा ती घरात मरून पडलेली दिसली.
सर्वसामान्यपणे असा समज असतो की ज्या बाईला मूल असतं, त्याचं बाईचं काळीज आईच असतं, तिलाच मुलांच्या भावना चांगल्या समजतात. पण ही गोष्ट मला लहानपणापासूनच खोटी वाटत होती आणि याला कारण होतं कृष्णीकाकी. कृष्णीकाकीला मूलबाळ नव्हतं, परंतु ती वात्सल्याची मूर्ती होती. लहान मुलांसाठी तिच्या काळजात ओतप्रोत माया होती. शेजारपाजारच्या, नात्यातल्या कुणाही मुलाला काही झालं, जरा कुठं अंग तापलं किंवा कुठं पडून थोडं खरचटलं तरीसुध्दा ती कळवळायची, तिला चैन पडायची नाही. मग ती आपल्याला माहीत असलेली कुठली कुठली औषधं, जडीबुटी उगाळून, लेप-काढा बनवून त्याच्या घरी जायची. स्वतः आपल्या हाताने ते लावायची, पाजायची. बाळ जास्तच आजारी असलं तर मग तिची पावलं आपल्या घरात थांबायचीच नाहीत. ती त्या घरात बस्तान मांडून बसायची. तिचा हातगुणही असा की तिनं लेप लावला किंवा काढा बनवून दिला की दुख अथवा आजार कुठच्या कुठे पळून जायचा.
मुलांशी ती अतिशय मायाभरल्या भाषेत बोलायची, त्यांना छान छान गोष्टी सांगायची, खाऊ द्यायची, त्यामुळे कुटुंबातील, शेजारची वगेरे मुले तिच्याकडे जास्त रमायची. काही तोडलं-फोडलं तर ती कधीच त्यांच्यावर रागावयाची नाही. मुलांच्या आई-आजींना पण ती म्हणायची, ‘अगं मुलंच ती. ती दंगा-मस्ती करणार नाहीत तर मग आम्ही-तुम्ही करणार का?.. त्यांनी ते आताच करायचं… त्यांचं लहानपण त्यांना मुक्तपणे जगू द्या ना…! उत्तर देत नव्हत्या. शिवाय त्यांना कृष्णीकाकूची मदत पण व्हायची. त्यांना कुठं जायचं असेल अथवा घरात जास्त काम असेल तेव्हा ती कृष्णीकाकूकडे मुलांना नेऊन सोडायची. कृष्णीकाकी त्यांना न कंटाळता सांभाळायची. अन् घरी चारही प्रहर दंगामस्ती करून आईला नको पुरं करून सोडणारी मुलं कृष्णीकाकूकडे गेली म्हणजे एकदम मंत्रवल्यासारखी वागायची. तिनं बस म्हटलं की बसायची, खेळ म्हटलं की खेळायची. बायका मस्करीनं म्हणायच्या, कृष्णीकाकूकडे जादू आहे मुलांना वश करायची! पण खरं सत्य असं होतं की तिला मुलांची मनं खूप छान समजत होती. त्यांना काय भावतं, काय आवडतं हे तिला समजत होतं, त्यामुळे ती त्यांच्याशी कलेनं वागत होती, आणि त्यामुळेच मुलं तिच्याकडे रमत होती.
कृष्णीकाकू मला आठवते तेव्हा तिने वयाची साठी ओलांडलेली होती. थोडीशी बुटकी, परंतु पुष्ट अंगाची होती. केस काळे, व्यवस्थित तेल-फणी केलेले. त्या केसांचा मानेवर हाताच्या पंजात मावणार नाही एवढा बुचडा. वाटोळ्या अंगासारखा तोंडाचा मुखवळासुध्दा वाटोळा. रंग सावळा. कदाचित तिच्या या रंगामुळेच तिला सासरी कृष्णी हे नाव ठेवलं असावं. तिच्या तोंडावर सदासर्वदा हसू उमटलेलं असायचं….
कृष्णीकाकूचं घर एकाच खोलीचं, परंतु कौलारू होतं. त्या खोलीत एका कोनाड्यात तिची चूल-भांडी होती, तर दुसर्या कोनाड्यात एका पिशवी, ज्यात तिचे कपडे- लुगडी अन् बिस्तर, शिवाय एक ट्रंक होता. त्या ट्रंकात तिचे ठेवणीतले कपडे अन् काही पैसाअडका, अन् लोक सांगत होते त्याप्रमाणे एक अंगठी, सोनसाखळी वगैरे असायची. हे दागिने तिच्याजवळ होते, अन् ती कधी जत्रेला जाताना, लग्नकार्याला जाताना ते अंगावर घालायची. एरव्ही ती गळा उगडा ठेवायची. हातांत मात्र काचेच्या बांगड्या अन् कानांत सोन्याच्या कुड्या असायच्या. तिचं कुटुंब तसं खूप मोठं होतं. शेतकर्याचं घराणं. परंतु लग्न होऊन काहीं वर्षांतच तिचा नवरा वारला. तिला मूलबाळ नव्हतं. दिराने कमावलेलं फुकट अन्न खाणे तिच्या स्वाभिमानी स्वभावाला पटलं नाही, शिवाय जावा-जावांत पुढे मी-तू होण्यापेक्षा वेळीच बाजूला होणं जास्त योग्य असा वचार करून तिनं दिराच्या संमतीने कुटंबाच्याच जागेत लहानसं घर बांधलं अन् ती राहू लगाली म्हणे.
शेतीच्या हंगामात शेतकामाला ती जायची, डोंगरावर जाऊन चार फळसाची पानं तोडून आणायची, त्याच्या पत्रावळी-द्रोण करून विकायची, नारळाच्या चुडताच्या विराच्या केरसुण्या बनवायची, अशा तर्हेने ती आपला उदरनिर्वाह करायची. घराकडे संबंध चांगले असल्यामुळे दीर पण तिला हात उचलून नारळ-तांदूळ द्यायचा… तिचं जीवन शिस्तबद्द रीतीने चालत होतं. दिरा-नणदांच्या सार्या मुलांवर तिचा जीव होता. त्याच्यावरच कशाला ती शेजारच्या इतरांच्या मुलांवरसुध्दा माया करायची. गावभर लोक तिच्याशी मायेने वागायचे, अन् तीसुध्दा सार्यांशी आपुलकीनं बोलायची. मला आठवतं, तिला प्रोव्हेदोरीयाचं सरकारी पेन्शन मिळायचं. महिन्यातून ती एकदा ते आणण्यासाठी इतरांच्या बरोबरीनं तालुक्याला जायची. जाताना ती वाटेवरच्या घरातील सगळ्यांना हाक मारीत, त्यांची विचारपूस करीत जायची.
सणा-सुदीला आई मला तिच्याकडे पत्रावळी आणायला पाठवायची, त्यामुळे माझा तिला लळा होता. मी शिकायला हुशार होते म्हणून तिला माझं कौतुक होतं. मी आमोणे गावावर पुस्तक लिहिते हे ऐकून तिला माझं कोण कौतुक वाटलं! त्यावेळी तिचं बरंच वय झालं होतं. परंतु तिला कसला दुर्धर आजार मात्र नव्हता. एके दिवशी मृत्यू तिला घेऊन गेला, पण कधी हे कुणाला समजलच नाही. चार-पाच दिवस तिच्या घराकडे कोणी फिरकलाही नव्हता. तिचा लाडका पुतण्या कामासाठी आठ दिवस मुंबईला गेला होता. तो आला तेव्हा ती घरात मरून पडलेली त्याला दिसली.
मी तिला बघायला गेले होते. काळीज द्रवणारे ते दृष्य होते. ती अंथरुणावर मेलेल्या अवस्थेत होती अन् तिच्या सर्वांगाला लाल मुंग्या भरल्या होत्या.