-ः बंध रेशमाचे ः- दीपज्योतिर्नमोऽस्तुते!

0
304
  • मीना समुद्र

मानवी जीवनज्योतीचे अखंडत्व राखण्यासाठी, ती सुरक्षित राखण्यासाठी दीपज्योतीलाच प्रार्थना करूया- ‘शुभंकरोतु कल्याणं आरोग्यं धनसंपदा, शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते।’

 

य जीवनाचं अविभाज्य अंग. अगदी बारशाच्या (नामकरणविधी) तबकातल्या निरांजनापासून तो माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या बाराव्यासाठी ठेवण्यात येणार्‍या पणतीपर्यंत माणसाला दिव्याची संगतसोबत असते. किंबहुना मातेच्या गर्भात नवजन्माचं बीज अंकुरू लागतं ते ईश्वरी कृपेच्या प्राणज्योतीमुळेच! अशी आपली धारणा आणि श्रद्धा आहे. त्यामुळेच घरात बाळ जन्माला आलं की आपण प्रथम देवाजवळ दिवा लावतो. दिवा म्हणजे कृतज्ञतेची ओंजळच जणू. मग पुढे प्रत्येकाच्याच मनात त्या बाळाबद्दल ममतेची स्नेहज्योत तेवत राहते.

माणसाच्या जीवनात या ना त्या कारणाने दीपप्रज्वलन वा दीपपूजन होत राहते. आपला संस्कारच ‘तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहै’ असा- दिव्य! अंधारातून तेजाकडे, प्रकाशाकडे, ऊर्जेकडे नेणारा. त्यामुळेच कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना; रक्षाबंधन, भाऊबीजेच्या औक्षणाला, कोणत्याही पूजाविधीत दिवा हा महत्त्वाचा! आपला सर्वात मोठा सण दिवाळी ही तर प्रकाशपर्वणीच! ज्योतीने ज्योत लागते आणि दीपावली सजते. देवापुढचे निरांजन असो, समई असो, पणती, लामणदिवा, ठाणवई, कंदील, सुंद्री, चिमणी, बत्ती अगदी कोणताही दिवा घ्या त्याचे काम एकच नव्हे तर अनंत. त्यातले महत्त्वाचे म्हणजे स्वतः जळून दुसर्‍याला प्रकाश देणे. भोवतालचा सारा अंधार हटविणे. ऊब, उष्णता, चैतन्य देणे आणि निद्रिस्त मनाला जागृत करणे. कातर मनाला धीर देणे. निर्भय-तेजस्वी बनविणे. सगळ्यातली मृतवत् अवस्था काढून टाकणे आणि चेतना जागविणे; जडता, मूढता आणि आलस्य यांचा संपूर्ण नायनाट करणे. दीपज्योतीचे अग्र जसे उंच असते तसे सदैव उंच उंच जाणे. यश आणि आनंद, सौंदर्य आणि हात जोडल्यासारखे सौजन्य या ज्योतीपाशी असतेच. तिच्याकडे पाहात राहिले की मन एकाग्र होते. आणि मनःशातीही मिळते. म्हणून तेजाची ती ज्योत सर्वांनाच अतिशय जवळची वाटते.

दीपकातील या सार्‍या दिव्यत्वाचा प्रकाश एकवटून लोकांची मनःशक्ती जागृत करण्याचे काम करणार्‍या या दीपज्योतींचा उपयोग ‘कोरोना’सारख्या जागतिक संकटसमयी करण्याची कल्पना आपल्या देशाच्या पंतप्रधानांना सुचली. बर्‍याच गोष्टींचा अभाव, घरात राहण्याची आवश्यकता आणि त्यातली कालावधीची अनिश्चितता यामुळे अधांतराला लोंबकळत राहण्याच्या स्थितीमुळे माणसे हतबल बनली. निराशग्रस्तही झाली. काहींनी अवचित, अकल्पितपणे मिळालेल्या या संधीचे सोनेही केले. पण एकूण सारी मानवजात भयग्रस्त आणि आशंकित असताना 5 एप्रिल 2020 रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांपर्यंत सार्‍यांनी घरातील दिवे बंद करून प्रत्येकी 1 असे दिवे लावण्याचे आवाहन केले आणि काही अपवाद वगळता सार्‍यांनी ते मान्य करून तसे दिवे लावून आपण सारे भारतीय एक आहोत आणि ‘कोरोना’च्या राक्षसी लढाईला सिद्ध आहोत हे दाखवून दिले. जगाच्या कल्याणासाठी, मानवतेच्या कल्याणासाठी जेव्हा मनाला भिडणारे सच्चे आवाहन केले जाते तेव्हा तो हेतू साध्य करण्यासाठी अनेक हात पुढे येतात. ते टाळ्या, थाळ्याही वाजवतात, शंख आणि घंटानादही करतात आणि घरीदारी दीप लावून त्या ज्योतींचे तेज आणि एकजुटीचा आनंद अनुभवत आपल्या आतल्या शक्तीचा, सामर्थ्याचा प्रत्यय घेतात आणि अनाथ, अपंग, गरीब, असहायांसाठी ते सहाय्यक बनतात. जनताजनार्दनाचे हे उदार, अनोखे रूप अशा दारूण संकटसमयी प्रकट होते आणि ते त्या अंधारावर मात करण्यास सज्ज होते. अंतरातल्या दीपज्योतीचा प्रकाश त्याच्या सार्‍या वर्तनावर पडलेला असतो, त्याच्या कृतीतून झळाळत असतो. सार्‍या दुरितांचे तिमिर जाऊन विश्व स्वधर्मतेजाच्या, आत्मतेजाच्या, आरोग्यसंपदेच्या रूपाने असे सळाळते ठेवण्यासाठी आपल्या अंतर्यामी लोकनेत्याने जनताजनार्दनाला घातलेले साकडे- नव्हे! -केलेले आर्जव फळाला आले.

भलेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले हे आवाहन म्हणजे कुणाला जनतेचे लक्ष विचलित करणे वाटले, तर कुणाला विद्युतनिर्मिती संच बंद पडतील अशी भीती वाटली. विद्युत उपकरणे पुन्हा नीट कार्यान्वित होतील की नाही अशी शंकाही कुणाच्या मनात उभी राहिली. कोणत्याही कामाला विरोधी सूर उमटतो तसाच हाही. तथ्य ध्यानात न घेता आळविलेला सूर उठला तसाच मिटून, विरून गेला. ठामपणाने, निश्चित दिशेने, विचारांती उचललेले सार्वत्रिक कल्याणासाठीचे पाऊल हे यशस्वी होतेच, हे 5 एप्रिलच्या दीपप्रज्वलनाने दाखवून दिले. 5 तारीखला 9 वाजता 9 मिनिटे याचाही ज्योतिषशास्त्रदृष्ट्या अन्वय लावला गेला. 5 तारीखला 4 था महिना म्हणून 5+4×÷= 9. मंगळ हा नववा ग्रह. 9 वाजून 9 मिनिटे हे नवग्रहांना प्रसन्न करण्यासाठी. ग्रहांची शक्ती कार्यान्वित करण्यासाठी ही वेळ आणि लॉकडाऊनचा 9 वा दिवस निवडला असेही मत कुणी मांडले. पण एकूणच घरात बंदिस्त झालेल्या लोकांनी दिव्याच्या निमित्ताने घरातच राहून एकत्र यावे आणि आपल्या शक्तीचे आपल्यालाच दर्शन घडावे हाच हेतू त्यामागे होता.

महाभयानक रीतीने अतिशय वेगाने पसरणार्‍या या रोगाचा पत्ता लागत नाही, तसाच पुराणातला भस्मासुर अचानक येऊन डोक्यावर हात ठेवायचा आणि ज्याच्या डोक्यावर त्याने हात ठेवला तो जागीच भस्म होऊन जायचा. शिवशंकरानेच भस्मासुराला चिताभस्म आणण्यासाठी निर्माण केलेले. पण तो गर्वाने फुगला. चिताभस्म मिळत नाही म्हणून डोक्यावर हात ठेवेल ती व्यक्ती भस्म होईल असा वर त्याने शंकराकडून मिळवला आणि त्याने त्रिभुवन त्रासून सोडले. देवांचा राजा इंद्र बनण्याची त्याच्या मनात लालसा होती. शेवटी सर्वजण विष्णूला शरण गेले आणि त्याने मोहिनीचे रूप घेऊन भस्मासुराला भुलवले आणि नृत्य करताना स्वतःचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवून तो भस्म झाला. संगठन, समर्पण, संयम, सेवा, संस्कार यांची पंचसूत्री ‘कोरोना’चा भस्मासुर भस्म करणारी अशीच मोहिनी ठरावी!

पुराणातलीच आणखी एक गोष्ट यासंदर्भात आठवते ती रक्तबीज राक्षसाची. त्याच्या रक्ताच्या धरणीवर पडलेल्या प्रत्येक थेंबातून एक-एक राक्षस निर्माण होई. तेव्हा देवीने त्याचे मस्तक छाटले आणि कालीने त्याचे रक्त जमिनीवर पडायच्या आत चाटले आणि त्या भयानक राक्षसाचा अंत झाला. कोरोनाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही त्याची लागण होते हे लक्षात आल्याबरोबर भारताने सामाजिक दूरत्व राखण्यास सुरुवात केली आणि त्यावर औषधेही निघत आहेत. बुद्धिवंतांच्या, विचारवंतांच्या, शास्त्रज्ञांच्या तपसाधनेमुळे अनेक रुग्ण बरे होत आहेत. मानवी जीवनज्योतीचे अखंडत्व राखण्यासाठी, ती सुरक्षित राखण्यासाठी दीपज्योतीलाच प्रार्थना करूया- ‘शुभंकरोतु कल्याणं आरोग्यं धनसंपदा, शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते।’