-ः बंध रेशमाचे ः- कैरी

0
351
  • मीना समुद्र

थोडी वेगळी वाटचाल केली, खटपट-धडपड केली तर स्वप्नं नक्कीच हाती येतात आणि जीवनाला नवी रूची आणतात, नवी दृष्टी लाभते आणि मनाची मधुर शुभंकर धारणा बनू लागते.

 

नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटावं अशा गो÷ष्टी म्हणजे चिंच, आवळे आणि कैर्‍या. हल्ली कैर्‍यांचा मोसम असा ठरलेला नसला तरी चैत्र-वैशाखातली त्यांची चव न्यारी. त्यामुळे या दिवसांत बाजारात गेलो की डोळे कैर्‍यांचा शोध घेतात आणि अगदी तजेलदार, हिरव्यागार कैर्‍या पाहून मन प्रसन्न होते आणि निवतंही! उन्हाच्या कहरात भाज्या तशा कमीच होत जातात आणि मिळतात त्या चढ्या भावाने. पण कैर्‍या मात्र स्वयंपाकाच्या कितीतरी बाजू सांभाळून घेतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी मिळून-मिसळून वागतात. त्यामुळे गृहिणीला त्या अतिशय प्रिय, जिव्हाळ्याच्या वाटतात. लहानपणी मैत्रिणींशी झालेली लुटुपुटूची भांडणे या कैर्‍यांनीच सोडवलेली आहेत ती चिमणदातांनी तोडलेल्या कैर्‍यांची देवाणघेवाण करून, आणि मोठेपणी बाळाची चाहूल लागल्यावर डोहाळे पुरवण्यासाठी जिवलगाने कैरीसाठी केलेल्या खटपटीमुळे. पुढे गृहिणीपद सांभाळताना कैरीने अनेकानेक प्रकारांनी तिचे सुगरणपण जपल्यामुळे! तिचा लडिवाळ आकारही मोहिनी घालणारा आणि स्वादही लाजवाब!

तर अशा या तकतकीत, टणक, हिरव्यागार कैर्‍या घरी आणून, स्वच्छ धुवून-पुसून चिरल्या जातात. फोडींना तिखट, मीठ, हळद लावून मेथी-मोहरीची पूड आणि हिंगाची फोडणी घालून चिनी मातीच्या बरणीत कालवून भरल्या जातात. करकरीत फोडींचं लोणचं जिभेला पाझर फोडतं आणि जेवणाचे चार घास जास्तच जातात. सबंध बाळकैर्‍यांचं लोणचं मसाला भरून थोडं मुरू दिलं की त्यातला गरही रूचकर लागतो. मेथी, धणे, जिरे, मिरे, किंचित सागूळ घालून तेलाहिंगाची फोडणी दिलेले भरडमसाल्याचे लोणचेही रूची वाढवते. आता तर मसाला वाटाघाटाचाही प्रश्न उरलेला नाही. ‘बेडकर’, ‘केप्र’चे तयार मसाले आणायचे आणि कैरीच्या फोडीत मिसळायचे की लोणचे तयार! कुणी नासू नये म्हणून लोणच्याच्या वर बोटभर तेल ठेवते, कुणी अंगाबरोबरच घालते, तर कुणी आयत्या वेळी लागेल तेवढेच काढून ताजी फोडणी देते. चिरलेल्या कैर्‍यांचा गर तासून त्यापासून गोजं, तक्कू केलं जातं. किसून पोहे, भेळीसाठी वापरलं जातं. आमटण (आंबटण) म्हणून आमटी, फुलसं करण्यासाठी असे तासलेले तुकडे वापरतात. हिंग, मेथी, सुकी मिरची, मोहरी यांची साथ कैर्‍यांच्या पदार्थांना हवीच. मग त्यांची लज्जत आणखी वाढते. साखरेच्या पाकातला मुरांबा, गुळाच्या पाकातला गुळांबा, गोडे वा तिखट लोणचे, उकडांबा, मेथांबा, आंब्याची डाळ अशी तोंडीलावणी असली की एरव्हीचे भाजी-कोशिंबिरीचे कामही भागते. कैरीचा कीस भरपूर साखर किंवा गूळ, मीठ घालून पसरट पातेल्याचे तोंड बांधून उन्हात ठेवला आणि शेवटच्या सातव्या दिवशी तिखटपूड घालून ऊन दिले की वर्ष-दोनवर्ष सहज टिकणारा ‘छुंदा’ हा आंबटगोड पदार्थ तयार होतो. कैरी अशीच सतत उपलब्ध व्हावी म्हणून मीठ लावून तिचे साल काढलेले तुकडे वाळवून आंबोळी; किसून वाळवून आमचूर असे टिकाऊ, रूचकर पदार्थ तयार होतात. ताज्या किसात फक्त तिखट-मीठ-गूळ घालून केलेली झटपट चटणी भाकरी-पोळीबरोबर छानच लागते. मिठाच्या पाण्यातल्या चेपणार्‍या कैर्‍या (तोरा), उन्हाळ्यानं हैराण झालेल्या जीवाला कच्च्या किंवा उकडलेल्या कैरीचं गूळ वा साखर घालून केलेलं वेलची-जायफळयुक्त ‘पन्हे’ हा अतिशय शीतलता देणारा आरोग्यदायक पेयप्रकार. कैरी उकडून तिचा गर साबणाप्रमाणे अंगाला लावून, घागर पाण्याने भरून, तोंड बांधून उन्हात दिवसभर ठेवून, त्या ‘झळोणी’च्या पाण्याने स्नान केले तर घामोळे, पुरळसारखे त्वचारोग होत नाहीत. ऋतुबदलाच्या सुरुवातीलाच लहान मुलांना हे स्नान घातले जाते. कैरी अशी आरोग्यसंपदा देणारी.

अशा या कैर्‍या पाडाला आल्या, आता आंबेही मिळू लागलेत अशी वार्ता ऐकली तरी आंबा सोडाच; कैरी या ‘कोरोना’च्या बंदच्या काळात साधी दृष्टीलाही पडली नाही म्हणून खूपच खट्टू व्हायला झालं होतं. आणि लावलेलं आंब्याचं झाड मोहोर येऊन हिरव्या गोट्या झडून मख्ख उभं. समोरच्या पडक्या घराशेजारच्या आवारात असलेल्या बेवारशी झाडाला लगडलेल्या कैर्‍या अजून पूर्ण आकाराला यायच्या आधीच पोरासोरांच्या वानरसेनेने दगड मारमारून पाडलेल्या. आणि मग खूपच उंचावर असलेल्या त्यांना वाकुल्या दाखवणार्‍या कैर्‍या खर्‍याच माकडांची धाड पडून पारच दिशेनाशा झालेल्या.

परवा मात्र अक्षयतृतीयेला आंब्याची पाने आणण्यासाठी गच्चीवर गेलेल्या नातवाने एक सुवार्ता आणली. पानाआड लपलेल्या मोठमोठ्या कैर्‍यांची! खूप उंचावर असलेल्या, लांब असलेल्या त्या कैर्‍या काढण्यासाठी मग शेजारीणबाईंची आणि आमची काठी जोडून पुढे हुक लावला टोकाला. एक छोटी कामटी क्रॉस करून बांधून एक पिशवीचा झोळणा त्याला अडकवला आणि गच्चीवर आमची मोहीम निघाली. पानं बाजूला करून आधी कैर्‍यांचा ठावठिकाणा घेतला. ही आधी की ती असं करत करत ती भक्कम (अंमळ अवजडच झालेली) काठी पेलत ती कैरीपर्यंत पोचतीय याची खात्री करून मग तडाखा देणार तेवढ्यात जोरात वारा आला आणि हातात आलीशी वाटणारी कैरी दूर गेली. शेजारणीनं मग काठी पेलून चार तडाखे हाणले त्याबरोबर तिनं खाली झाडाच्या पायथ्याशी शरणागती पत्करली. पाचोळ्यात, झाडोर्‍यात पडलेली ती कैरी आणण्यासाठी एक मूल खाली दडादडा पळालं. तोपर्यंत झाड हलल्याबरोबर पदराआडच्या कर्णकुंडलासारख्या चारपाच कैर्‍यांचा घोस हलला. एकानं फांदी बाजूला केली. मी ती घट्ट धरली आणि ओढून घेत कैर्‍या दाखवू लागले तोपर्यंत शेजारीणबाईंना जोरात हसू फुटलं. फांदी ओढून धरून वाकलेला एक माणूस आंबे काढताना वार्‍यानं जोरानं दुसर्‍याच्या अंगणात फेकला जाऊन आंबे चोरण्याची त्याची खोड मोडल्याची हकिकत ऐकून आम्हीही पोट धरधरून हसलो. मग मी फांदीला गच्च धरलं. मला माझ्या लेकीने घट्ट धरलं आणि ती कर्णकुंडलंही आम्ही हस्तगत केली. देठ पिरगळूनही झोळण्यात पडायला तयार नसलेल्या कैर्‍यांना मात्र तडाखे द्यावे लागले. त्यातल्या खाली पडलेल्या ठेचकाळलेल्या कैर्‍या धुवून, तिखटमीठ लावून मुलांनी टॉक टॉक करत खाल्ल्या. ‘ही इथं आहे, ती बघ तिथं आहे’ असं दाखवत 20-25 कैर्‍या काढल्या आणि वाटून घेतल्या. ‘आमची चव बघा’ म्हणत दुसर्‍या दिवशी त्या कैर्‍यांच्या लोणच्यांची देवाणघेवाण झाली. पन्हे पिऊन सगळ्यांना थंडगार वाटलं. पडून किंवा माकडांनी खाऊन वाया जाण्यापेक्षा त्यांचा वेळीच उपयोग झाला म्हणून सार्थक वाटलं.

उगीचच वाटत राहिलं, आपण या बहुगुणी कैर्‍यांसारखी खूप दूरची, उंचउंच जाणारी, आवाक्यात नसणारी स्वप्नं बघत असतो, म्हणून. प्रथम ती आपल्याला अप्राप्य अधांतराला लटकल्यासारखी वाटतात. पानांआड लपलेल्या कैर्‍यांसारख्या स्वप्नांकडे नेणार्‍या वाटा प्रथमदर्शनी दृष्टिक्षेपात गवसत नाहीत. पण थोडी वेगळी वाटचाल केली, खटपट-धडपड केली तर स्वप्नं नक्कीच हाती येतात आणि जीवनाला नवी रूची आणतात, नवी दृष्टी लाभते आणि मनाची मधुर शुभंकर धारणा बनू लागते. हिरवीगार, टणक कैरी हळूहळू मृदुमधुर सोनकेशर-पिवळ्या आम्रफलात परिवर्तीत व्हावी तशी… आणि मग ते तृप्त, स्थिरचित्त, शांत शांत होऊन जाते.