-ः बंध रेशमाचे ः- एका लग्नाची गोष्ट

0
301
  • मीना समुद्र

टप्प्याटप्प्याने माणसांचे सुरळीत दैनंदिन जीवनही विस्कळित झाले. पार विस्कटून गेले. त्याला सारेचजण मोठ्या धैर्याने तोंड देत आहेत. आपली सकारात्मक ऊर्जा जपत सगळेच या लढाईसाठी सज्ज झाले आहेत.

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात. दोन विवाहेच्छुक व्यक्ती कुठे, कशा भेटतात आणि मग केव्हा, कशा, कुठे रेशिमबंधाने बांधल्या जातात कळत नाही. मनाने जुळलेल्या किंवा जुळवलेल्या या रेशिमगाठी दृढ करण्यासाठी आप्तस्वकीयांच्या, मित्रमंडळीच्या, हितचिंतकांच्या, परिचितांच्या सान्निध्यात, सहवासात, त्यांच्या आशीर्वादाने आणि साक्षीने माणूस मोठ्या समारंभाने लग्नविधी साजरा करत असतो. सगळेचजण अगदी सगळ्या प्रकारे आपली हौसमौज करून घेतात. अतिशय उत्तम मुहूर्त शोधून, संकटनाशक श्रीविनायकाचे पूजन करून, मंगलविधी करूनही कधीकधी मुहूर्त साधला जात नाही किंवा तो लाभत नाही असं म्हणण्यासारखी परिस्थिती अचानक उभी राहते. माणूस ठरवतो एक आणि नियतीने मनात काही वेगळंच योजलेलं असतं असंही आढळतं काहीवेळा. अगदी आघात-अपघात सोडले तरी एका लग्नात प्रत्यक्ष नवरदेवच ट्रॅफिकजाममध्ये अडकले आणि विवाहमुहूर्त चुकला. तो नंतर तासाभराने पार पाडण्यात आला. पण ते नवरदेव उपस्थित होईपर्यंत सगळ्यांच्या- विशेषतः मुलीकडच्यांच्या- तोंडचे पाणी पळाले होते. अर्थात, आजकाल भ्रमणध्वनीमुळे माणसाचा ठावठिकाणा तरी समजण्याची सोय झाली आहे, एवढे खरे!

यंदाच्या ‘कोरोना’ची काळी छाया तर अनेकांची नियती बिघडवायला कारणीभूत ठरली. सार्‍या जगात हातपाय पसरायला सुरुवात केली तेव्हा सारेचजण हादरले. सार्‍या जगावरच विषाणूंचा प्रभाव तर यःकश्चित् मनुष्याचा त्याच्यापुढे काय पाड? पटकन लक्षात न येणार्‍या आणि त्यामुळेच भराभर सर्वत्र पसरणार्‍या या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी उपाय लक्षात येईपर्यंत तो हां हां म्हणता अगदी सगळीकडे पसरला. माणसाचे सगळे बेत, सगळे मनसुबे त्या विषाणूने हाणून पाडले. स्वप्नं बेचिराख केली. कुणाचा लांबचा प्रवास; कुणाचं रेल्वे, बस, विमानाचं खूप आधी केलेलं आरक्षण; सभासंमेलने, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या क्रीडास्पर्धा; कोणतेही जाहीर केलेले लहानमोठे सभासमारंभ; शाळा-कॉलेजं हे सारंच बंद झालं. टप्प्याटप्प्याने माणसांचे सुरळीत दैनंदिन जीवनही विस्कळित झाले. पार विस्कटून गेले. त्याला सारेचजण मोठ्या धैर्याने तोंड देत आहेत. आपली सकारात्मक ऊर्जा जपत सगळेच या लढाईसाठी सज्ज झाले आहेत. याचाच नमुना म्हणजे मी न अनुभवलेल्या पण घडलेल्या एका लग्नाची गोष्ट!

खरं तर लग्नसमारंभ आणि त्यानिमित्त होणारे सारेच विवाहविधी यांना माणसाच्या जीवनात किती महत्त्वाचं स्थान असतं! त्यासाठी जमणार्‍या सार्‍यांचीच हौसमौज चाललेली असते. शिवाय तो एक आत्यंतिक जिव्हाळ्याचा उत्सवच जणू! त्यामुळेच मुलाचं लग्न ठरल्याचा चुलत बहिणीचा फोन आला तेव्हा अर्थातच खूपच आनंद झाला. किती लहान असताना त्याला पाहिलेलं. नंतर संसारात, मुलाबाळांत गुरफटले, त्यामुळे भेटीही दुर्लभ. लहानपणी काका, काकू, त्यांची मुलं, आत्या, तिच्या मुली यांच्या येण्यानं घराचं सुट्टीत होणारं गोकुळ डोळ्यांसमोर- कधीमधी काही निमित्तानं आठवण आली की- मनात उभं राहायचं. हल्ली सगळ्यांच्या नोकर्‍या, त्यामुळं वेळ नाही. त्यावेळी फोनही नव्हतेच. एकूण काय तर अशा भेटीगाठी कधीतरी लग्नसमारंभातच झाल्या तर! हल्ली बरीच मुलं परदेशी. तसाच हा नवरदेवही नोकरीनिमित्त परदेशीच. त्यामुळे मुलगी कुठली? जमवलं की जमलं? असं विचारल्यावर मुलांनीच इंटरनेटवरून आपापलं जुळवलं आहे आणि स्वतःच ठरवलं आहे असं कळलं. आणि लग्न रजिस्टर होणार असल्यानं रिसेप्शनला यायचं आहे असं आग्रहाचं आमंत्रणही तिने दिलं. म्हणून आम्ही भावंडांनी जायचं ठरवलं. त्यानिमित्तानं सगळ्यांच्याच भेटीगाठी होतात आणि तसे सगळेच आपापल्या जबाबदार्‍यातून मोकळे झाल्यामुळे तशी फारशी अडचण येण्याचंही कारण नव्हतं. त्यामुळे मुंबईत कुठे उतरायचं, कसं जायचं सगळं काही ठरवून टाकलं, आणि 16-17 मार्चनंतर निघण्याचं पक्कं झालं. तोपर्यंत ‘कोरोना’ची कुणकुणच लागली होती असे नव्हे तर बर्‍याच ठिकाणी आपल्याकडेही त्याची चाहूल लागायला सुरुवात झाल्याने खबरदारीचे उपायही सार्वजनिक स्तरावर सुरू झाले होते. पण त्याचं गांभीर्य तेवढं जाणवलं नव्हतं. माझ्या परदेशी राहणार्‍या मुलाचं ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू केव्हाच झाल्याचं सांगितलं आणि मी अजिबात घराबाहेर न पडण्याचं निक्षून बजावलंच. तोपर्यंत मॉल, दुकानं बंद होत आहेत अशी हाकाटी इथे कानी आल्यावर आधी बाजारात जाऊन थोडीफार तजवीज केली आणि त्या लग्नाला जाण्याचा विचार मनातून बाजूला केला. तेव्हाच बहिणीचा पुन्हा फोन आला आणि मंगलकार्यालयं बंद ठेवण्यात येणार असल्यानं रिसेप्शन कॅन्सल झाल्याचं कळवलं. त्यामुळे आमच्या न जाण्याच्या विचाराला आणखी बळकटीच मिळाली. तरी आता लग्न रजिस्टर होणार की नाही याचा भुंगा सतावू लागला. 19 मार्च ही लग्नाची तारीख होती तेव्हा जरा साशंकतेनेच दुपारी फोन करून विचारलं तर बहीण म्हणाली, “लग्न झालं आणि छान, मस्त झालं.” तिच्या आनंदी, निर्भर आवाजानं मीही निर्धास्त झाले.

तिच्याकडून कळलेली त्या लग्नाची गोष्ट अशी की तिनं रजिस्टारच्या ऑफिसला फोन करून विचारलं तर त्यांनी 18 मार्चलाच सकाळी हजर व्हायला सांगितलं. तेव्हा मोजकी मंडळी स्पेशल गाडीने पुण्याहून मुंबईला गेली. तिथे साक्षीदार आणि नवरा-नवरी एवढीच मंडळी गेली. रीतसर हार-अंगठी घालून सह्या करून विवाह पार पडला. इकडे घरातल्या मंडळींनी तोरणं, फुलंपानं लावून घर सजवलं होतंच. नव्या नवरीचा ‘गृहप्रवेश’ झाला. घरातल्याच चारसहा मंडळींनी त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्या उधळल्या आणि आधीच आणलेल्या मिठाईने सगळ्यांची तोंडे गोड केली. घरगुती पक्वान्नाचा आस्वाद सगळ्यांनी खेळीमेळीनं घेतला. एक महत्त्वाचा सोहळा सार्‍यांनी घरगुती वातावरणात पण मेंदी, नवी वस्त्रे, दागदागिने घालून अतिशय आनंदाने साजरा केला, तोही ठरलेल्या तारखेच्या 1 दिवस आधी. आम्ही अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा आणि मंगल आशीर्वाद पाठवले आणि सुंदर फोटो बघत इथे विवाहसोहळा आनंदाने अनुभवला.