-ः इतिहासाच्या पाऊलखुणा ः- वेदान्ताचे पुनरुज्जीवक ः आद्य शंकराचार्य

0
379
  • दत्ता भि. नाईक

ग्लानी आलेल्या हिंदू धर्माला पुनः एकदा चैतन्य प्राप्त करून देणारे आचार्य म्हणून आद्य शंकराचार्यांचे स्थान अढळपदी विराजमान झाले आहे. वेदान्ताचे पुनरुज्जीवक म्हणून तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात जगभर ते ओळखले जातात.

 

इतिहास लेखन म्हणजे राज्यकर्त्यांच्या वंशावळींची नोंद ठेवणे, अशी परंपरा विद्वान मंडळींनी चालू ठेवल्यामुळे जगातील तत्त्वज्ञान-दर्शन वैचारिक लिखाणाची बर्‍याच मोठ्या प्रमाणात हेळसांड झाली. भारत हा तर तत्त्वज्ञान व आध्यात्मिक चिंतन यासाठीच जगभर ओळखला जातो. वेदकालापासून खंडन-मंडनाची परंपरा असलेला हा देश. उपनिषदांवर आधारलेले वेदांताचे दर्शन व त्याचबरोबर ते नाकारणारी जैन व बौद्ध परंपरा व पाठोपाठ सुरू झालेली आचार्य परंपरा यांचा विचार केल्याशिवाय पराक्रमी राज्यकर्त्यांबरोबरच देशाला जपण्यासाठी लागणारे वैचारिक अधिष्ठान भक्कमपणे उभे करण्याचे काम ज्या दार्शनिकांनी केले त्यांत आद्य शंकराचार्यांचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागेल.

जन्मकाळ

वैशाख शु. पंचमी (यंदा 28 एप्रिल) हा आद्य शंकराचार्यांचा जयंतीचा दिवस. त्यांचे पाळण्यातील नाव ‘शंकर’ होते. केरळमधील एर्नाकुलमजवळील ‘कालडी’ हे शंकराचे जन्मगाव. अंगमाली या रेल्वेस्थानकावरूनही कालडी येथे जाता येते. आधुनिक इतिहासकारांच्या मते त्यांच्या जन्माचा कालखंड सामान्य सन 780 ते 820 असावा. याउलट ओडीसातील पुरी येथील गोवर्धन शंकराचार्य मठ, ज्योतिषमठ तसेच द्वारका शारदापीठ यांच्या म्हणण्याप्रमाणे आद्य शंकराचार्यांचा काळ सनपूर्व 508 ते 820 वा 500 आहे. ए. बी. सेंट यांनी केलेल्या नोंदीनुसार आद्य शंकराचार्यांचा जन्म भगवान गौतमबुद्धांच्या निर्वाणानंतर सुमारे साठेक वर्षांनंतर झाला. भगवान बुद्धांचे निर्वाण सनपूर्व 544 मध्ये झाल्यामुळे निरनिराळ्या पीठांचे जे म्हणणे आहे त्याला दुजोरा मिळतो. पारशी समाजाच्या धार्मिक वाङ्मयात अलेक्झांडरचे भारतावर आक्रमण झाले तेव्हा या देशात शंकराचार्य नामक एक साधू धर्मोपदेश करत होता असा उल्लेख आहे. हा शंकराचार्य नामक साधू म्हणजे आद्य शंकराचार्य कशावरून नसतील असाही विद्वान संशोधकांकडून प्रश्न विचारला जाऊ शकतो. मौर्य सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध मनाला राजाश्रय मिळाल्यामुळे ज्या पद्धतीने मूळ वैचारिक गाभा सोडून सवंग रूप प्राप्त झाले त्याचे निराकरण आद्य शंकराचार्यांच्या अद्वैत वेदान्त व मायावादाने केले असा सर्वसाधारण समज आहे. ते पाहता सामान्य सन 780 ते 820 हा काळ सयुक्तिक वाटतो.

शिवगुरू व आर्याम्बा या ब्राह्मण जोडप्याला संतती नव्हती. उतारवयातच त्यांनी अपत्यप्राप्तीसाठी चंद्रमौलीश्वर मंदिरात मुक्काम करून काही दिवस कंदमुळे व फळे खाऊन व भगवान शंकराचे चरणामृत्य प्राशन करून व्रत पाळले. एके दिवशी स्वतः भगवान शंकर शिवगुरूच्या स्वप्नात आले व म्हणाले की, तुझी तपश्चर्या पूर्ण झाली आहे. तू उद्या सकाळी आपल्या गावी जाऊन गृहस्थाश्रमाप्रमाणे जीवन यापन कर. तुला पुत्रप्राप्ती होणार आहे. तुझ्यासमोर मी दोन पर्याय ठेवतो त्यांपैकी तू एकाचा स्वीकार कर. तुला दीर्घायुषी मूर्ख मुलगा हवा की अल्पायुषी बुद्धिमान? शिवगुरूनी दुसरा पर्याय मान्य केला. त्यानुसार योग्यवेळी त्यांना पुत्रप्राप्ती झाली.

मृत्युभोग टळला

बालक शंकर बुद्धिमान तर होताच, तसाच तो एकपाठीही होता. तीन वर्षांचा असताना त्याने अक्षरओळख करून घेतली. पाच वर्षांचा असताना त्याने सर्व लौकिक साहित्य वाचून काढले व वेदाध्ययनाची तयारी केली. त्याचवेळी त्याची इतरांच्या मानाने लवकर मुंज करण्यात आली व त्याला गुरुगृही पाठवले. गुरुगृही असताना ब्रह्मचार्‍यांनी भिक्षा मागायची असते. असा नित्यक्रम चालू असताना एका घरी भिक्षा मागितल्यानंतर घरातील माऊलीने तिच्याजवळ शिल्लक असलेला आवळा दिला. त्या घराचे दारिद्य्र पाहून बालक शंकराचे मन द्रवले व त्याचवेळी त्या माऊलीचे घर सोन्याच्या आवळ्यांनी भरून टाकले. त्यावेळी त्यांनी केलेली रचना ‘कनकधारा स्तोत्र’ या नावाने ओळखली जाते. वयाची आठ वर्षे पूर्ण होईपर्यंत शंकर गुरुकुलामध्ये राहिला. त्याच काळात त्याचे वृद्ध पिता शिवगुरू कालवश झाले. पित्याचा दाहसंस्कार व इतर कर्मे करतानाच त्याला देहाच्या नश्वरपणाची जाणीव झाली. शंकराचे डोळे आता संन्यास घेऊन देशासाठी नवीन मार्ग शोधून काढण्याकडे लागले होते. मात्र आर्याम्बा त्याला परवानगी देत नव्हती. माता अतिशय धार्मिक आणि श्रद्धावान होती. नित्यनेमाने सकाळी अलवाई- जिला पूर्णा या नावानेही ओळखतात- या नदीवर स्नान करून मग पूर्चाअर्चा करण्याचा त्यांचा नित्यनियम होता. एके दिवशी पावसाळ्यात खूप पाऊस पडला तेव्हा शंकराने आपल्या तपोबलावर नदीचा प्रवाह घराच्या जवळ आणला.

शंकर आता आठ वर्षांचा बालक होता. स्वतःजवळ फार कमी वेळ आहे याची त्याला जाणीव होती म्हणून त्याला संन्यास घेण्याची ओढ होती. ब्रह्मचार्‍याला मातेची व गृहस्थाला पत्नीची परवानगी घेतल्याशिवाय संन्यासाश्रमाची दीक्षा घेता येत नाही व आपला म्हातारपणीचा एकमेव आधार असलेल्या शंकराला माता आर्याम्बा घर सोडून जाण्याची परवानगी देत नव्हती. एके दिवशी शंकर नदीवर पोहत असताना एका मगरीने त्याचा पाय पकडला तेव्हा आपण वाचणार नाही म्हणून किनार्‍यावर बसलेल्या मातेला उद्देशून शंकर म्हणाला, आता मी मरणारच आहे, तर त्यापूर्वी तरी तू मला संन्यास घेण्याची दीक्षा दे. आर्याम्बा बुचकळ्यात पडली व तिने तेव्हाच त्याला संन्यासी बनण्यासाठी परवानगी दिली. आणि आश्चर्य म्हणजे ती मगरी त्याचा पाय सोडून निघून गेली. मृत्यूच्या दारात असताना घेतलेल्या संन्यासाच्या प्रकाराला ‘आतुर संन्यास’ म्हणतात. या प्रकारामुळे शंकराचा आठव्या वर्षी असलेला मृत्युयोग टळला. आपला एकुलता एक पुत्र संन्यास घेणार हे लक्षात येताच माता आर्याम्बा हिने त्याच्याकडून शब्द घेतला की तिच्या मृत्यूनंतर तिचे अंत्यसंस्कार त्याच्याच हस्ते केले जातील. शंकराने ही अट मान्य केली व गुरूच्या शोधात तो निघून गेला.

संन्याशाने केला अंत्यसंस्कार

नर्मदा नदीच्या किनार्‍यावर मांडूक्य उपनिषदाबरोबर जोडून येणार्‍या ‘कारिका’चे द्रष्टे गौडपाद यांचे शिष्य गोविंदयती हे दुसरेतिसरे कोणी नसून व्याकरणकार पंतजलीचे अवतार आहेत हे शंकराच्या लक्षात आले होते व त्यानुसार त्यांनी ओंकारनाथतीर्थ गाठले व जवळच्या एका गुहेत वास करणार्‍या गोविंदयतींची भेट घेतली. त्याची विद्वत्ता व उपजत ज्ञानी वृत्ती पाहून गोविंदयतींनी त्यांना दीक्षा दिली व स्वतःच्या शिष्यपरिवारात सामावून घेतले.

गोविंदयतींच्या देहत्यागानंतर शंकराने तेथून प्रयाग, काशी, पशुपतीनाथ, बद्रीनाथ, केदारनाथ, श्रीनगर ÷इत्यादी ठिकाणी प्रवास केला. केदारनाथचे मंदिर कित्येक वर्षे बंद होते. ते त्याने स्पर्श करताच उघडले. देशात नास्तिकता वाढल्यामुळे बंद पडलेल्या काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिराची साफसफाई केली. हरवलेल्या व नदीत बुडवल्या गेलेल्या कित्येक देवदेवतांचा शोध घेऊन त्यांची पुनर्स्थापना केली. काश्मीरमधील शारदामंदिराचा जीर्णोद्धार केला. तेथील हिमालयाच्या एका शिखराला त्यामुळेच शंकराचार्य पर्वत या नावाने ओळखतात. ते सर्व चालू असताना माता आर्याम्बा मृत्युशय्येवर असल्याचे समजताच शंकर घरी परत आला. एक संन्यासी मातेचा अंत्यसंस्कार करणार हे समजल्यावर गावाने त्याच्यावर बहिष्कार घातला. त्यांनी घराच्या परसात केळीच्या झाडाचे बुंधे रचून त्यांची चिता रचली व त्यावर मातेचा अंत्यसंस्कार करून, एका निरर्थक सामाजिक रूढीला त्यागून मातेला दिलेला शब्द पाळला.

अढळ स्थान

यानंतर आचार्य शंकर दिग्विजयला निघाले. त्यांनी बौद्धपूर्व मीमांसक, कापालिक, वाममार्गी शाक्त यांच्याशी शास्त्रार्थ करून त्यांच्यावर विजय मिळवला. त्यांना सर्वत्र लोक ‘शंकराचार्य’ या नावाने संबोधू लागले. त्यांनी फुंकलेला शंख ज्यांनी ऐकला ते त्यांचे शिष्य बनले. वेदान्त हे तत्त्वज्ञान म्हणजे उपनिषदे. ती वेदाचा अंतिम भाग आहेत. त्यातील अद्वैत वेदान्ताचा त्यांनी पुरस्कार केला. बृहदारण्यक उपनिषदातील अहं ब्रह्मास्मि, ऐतरेय उपनिषदातील प्रज्ञान ब्रह्म, छांदोग्य उपनिषदातील तत्त्वमसी व मांडुक्य उपनिषदातील अथं आत्मब्रह्म ही चार महावाक्ये, याशिवाय सर्व खल्विदं ब्रह्म या वचनांची विशेष चर्चा करून ‘ब्रह्मं सत्यं जगन्मिथ्या जीवों ब्रह्मैव ना पराः’ या तत्त्वाचा म्हणजे ब्रह्म हेच एकमेव सत्य असून जग हे मिथ्या आहे या संकल्पनेचा त्यांनी प्रचार केला. त्यांचा मायावाद बौद्धांच्या शून्यवादाशी मिळताजुळता असल्यामुळे त्यांच्यावर प्रच्छन्न म्हणजे छुपे बौद्ध असल्याचाही आरोप झाला. वयाची बत्तीस वर्षे पूर्ण होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले तेव्हा ते बदरीनाथ येथून केदारनाथ येथे आले व तेथेच त्यांनी देह ठेवला.

आद्य शंकराचार्यांनी बद्रिनाथ, जगन्नाथपुरी, श्रृंगेरी व द्वारका अशा देशाच्या चार कोपर्‍यांत चार मठांची स्थापना केली. याशिवाय त्यांनी कांची कामकोटी येथे वास केला होता म्हणून तेथेही मठाची स्थापना करण्यात आली. या पीठावर बसणार्‍याला शंकराचार्य ही उपाधी दिली गेल्यामुळे ते आद्य शंकराचार्य या नामाभिधानास पात्र ठरले. भगवान बुद्धांची शिकवण ही उपनिषदांमध्येच रुजलेली आहे म्हणून बुद्ध हे विष्णूचे नववे अवतार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. निरनिराळ्या पंथांमध्ये समन्वय साधण्यासाठी शैव, वैष्णव, शाक्त, सौर व गाणपत्य संप्रदायांच्या पंचायतनाची स्थापना केली. तेव्हापासून कोणत्याही मंदिरात स्थानिक देव धरून पंचायतन पूजेची परंपरा सुरू झाली. संन्यासाश्रमाचे सुसूत्रीकरण करून दशनामी संप्रदाय सुरू केले. त्यात तीर्थ, आश्रम, वन, अरण्य, गिरी, पर्वत, सागर, सरस्वती, भारती व पुरी यांचा अंतर्भाव होता. कित्येक संन्यासी आपल्या नावापुढे यांपैकी कोणती ना कोणती उपाधी लावताना आपल्याला दिसतात, त्याचे श्रेय आद्य शंकराचार्यांकडे जाते.

पश्चिमेकडून आलेल्या संप्रदायांमध्ये धर्मग्रंथांवर भाष्य लिहिण्याची परवानगी नाही. परंतु आपल्याकडे धर्मग्रंथ निर्माण झाल्यापासून त्यावर भाष्य लिहिण्याची परंपरा आहे. या परंपरेलाही सुसूत्रता प्राप्त करून देण्याचे कार्य आद्य शंकराचार्यांनी केले. उपनिषदे ही श्रुती आहे म्हणून श्नौत प्रस्थान, भगवद्गीता ही महाभारत या स्मृतीचा भाग आहे म्हणून स्मार्त प्रस्थान व व्यासविरचित ब्रह्मसूत्रे हे दार्शनिक प्रस्थान अशी प्रस्थान त्रयीची मांडणी करून त्यांनी त्यांच्यावर भाष्ये लिहिली. ती ‘शांकरभाष्य’ या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी पाडलेली ही परंपरा पुढेही चालू राहिली. त्यांच्यानंतर नामानुजाचार्य, मध्वाचार्य, निम्बार्काचार्य इत्यादींनी प्रस्थानत्रयींवर भाष्य लिहून आपले विचार मांडले. गंगालहरी, सौंदर्यलहरी, पांडुरंगाष्टक, चर्पपंजरिकास्तोत्र, देव्यापराध क्षमापन स्तोत्र यांसारखी स्तोत्रे लिहून त्यांनी एक व्युत्पन्न कवी असल्याचेही सिद्ध केले आहे. त्यांचे निर्वाण षटक आजकाल सर्वत्र लोकप्रिय बनले आहे. ग्लानी आलेल्या हिंदू धर्माला पुनः एकदा चैतन्य प्राप्त करून देणारे आचार्य म्हणून आद्य शंकराचार्यांचे स्थान अढळपदी विराजमान झाले आहे. वेदान्ताचे पुनरुज्जीवक म्हणून तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात जगभर ते ओळखले जातात.