-ः इतिहासाच्या पाऊलखुणा ः- पानीपतच्या रणमैदानावरील तीन युद्धे

0
301
  • दत्ता भि. नाईक

अतिआत्मविश्वास, पूर्वनियोजनाचा अभाव व शत्रू कसा वागू शकतो व फितुरी कशी होऊ शकते याबद्दल धडा शिकवणारी ही तीनही युद्धे आगामी हजार वर्षे तरी भारतीय जनमानस विसरणार नाही.

 

विभाजनपूर्व महापंजाबचा भाग असलेल्या हरियाणा राज्यात वसलेले पानीपत हे आपल्या देशात युद्धभूमी म्हणून सर्वत्र प्रसिद्धीस पावलेले आहे. सन 1526, 1556 व 1761 मध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय अशी तीन युद्धे पानीपतच्या रणांगणावर लढली गेली. या तिन्ही युद्धात आक्रमकांची सरशी झाल्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याला ग्रहण लागले. ही युद्धे केवळ राजकीय वर्चस्वासाठी लढली गेली नाहीत. भारतीय संस्कृती व परंपरा, शिक्षणपद्धती, जीवनप्रणाली, संस्थाव्यवस्था इत्यादी जीवनप्रवाहासमोर फार मोठे आव्हान उभी करणारी अशी ही युद्धे होती.

कुंकवाची जागा रक्ताने घेतली

पानीपतचे पहिले युद्ध आक्रमक मोगल बाबर व दिल्लीचा बादशहा इब्राहिम खान लोदी यांच्यामध्ये लढले गेले. 1192 मध्ये दिल्लीचा सम्राट पृथ्वीराज चौहान याचा पराभव करून मुहम्मद घोरीने दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर कुतुबुद्दिन याचा गुलाम वंश, त्यानंतर खिलजी, तुघलक, लोदी असे एकामागून एक मुसलमान राज्यकर्ते दिल्लीचे बादशहा बनले. जेव्हा सुलतान इब्राहिम लोदी दिल्लीच्या तक्तावर बसला होता तेव्हा स्वतःची छोटीशी परंतु कोणतीच दयामाया नसलेली संस्कारहीन सेना घेऊन मुगल टोळीवाला बाबर याने आक्रमण करून इब्राहिम खान व त्याची वीस हजारांची सेना यांची सरसहा कत्तल केली. शीख पंथाचे प्रथम गुरू श्री गुरू नानकदेव तसेच त्यांचे शिष्य मरदाना यांना कैदेची शिक्षा दिली. श्री गुरू नानकांनी त्यांचे मित्र लालो याला संबोधून केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, बाबर पापकृत्यांची वरात घेऊन आलेला आहे. ज्या महिलांच्या कपाळावर कुंकू होते ते पुसून टाकल्यामुळे त्या रक्ताचे अश्रू ढाळीत आहे. गुरू नानक पुढे म्हणतात, हे विधात्या, तू हे काय केलेस? खुरासावळा (अफगाणिस्तान) सुरक्षित करून हिंदुस्थानला आतंकित केलंस. तू मोगल बाबरला साक्षात यमराज बनवून या देशावर पाठवले आहेस.

युद्धात दुपारपर्यंत दिल्लीच्या सुलतानाचा पराभव झाला होता. इब्राहिम खान लोदी वीस हजार सैनिकांसह मारला गेला होता. शौर्यात लोदीचे सैनिक कमी पडले नाहीत, परंतु बाबरच्या शिस्तबद्ध सैन्यासमोर शिस्तीचा अभाव, आक्रमणासमोर टिकाव धरण्याचा सराव नसल्यामुळे त्यांचा पराभव झाला व देश दुर्दैवाच्या फेर्‍यात अडकला.

विक्रमादित्य हेमू

बाबरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायून हा दिल्लीचा बादशहा बनला. बिहारमधील ससाराम येथे स्थायिक झालेल्या शेर शहा सुरी या पठाणाने हुमायूनला हरवले व त्याला देशाबाहेर हाकलून लावले. शेरशहा सुरी हा धार्मिकदृष्ट्या उदारमतवादी होता असे नव्हे तरीही जनता मोठ्या प्रमाणात त्याच्या मागे उभी राहिली. शेरशहानंतर त्याचा मुलगा जलालखान हा गादीवर आला व त्याने इस्लाम शहा हे नामपद धारण केले. इस्लाम शहाला चांगल्या माणसांची पारख होती. त्यामुळे तो हेमू या हिंदू सरदाराचा सल्ला घेत असे.

हेमूचा जन्म राजस्थानमधील अलवार क्षेत्रातील राजगढ येथून साडेचार किलोमीटरवर असलेल्या मच्छेरी नामक गावातील भार्गव घराण्यातील धूसर जातीच्या पूरण दास नावाच्या संत वृत्तीच्या ब्राह्मणाच्या घरी झाला. इस्लाम शहाच्या मृत्यूनंतर काही काळ अराजकेत गेला व नंतर आदिलशहा हा सुरी घराण्याचा वारस बादशहा बनला. त्याने हेमूला मुख्य प्रधानपदी नेमले व अफगाण सैनिकांच्या तुकडीचा प्रमुखही नेमले. हेमू युद्धशास्त्रात इतका निपुण होता की तो बावीस लढाया लढला व सर्वच्या सर्व लढायांमध्ये विजयी झाला होता.

जेव्हा हुमायूनने भारतावर आक्रमण करून दिल्ली ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आदिलशहाने हेमूला त्याच्यावर पाठवले व स्वतः चुनार येथे जाऊन लपून राहिला व सिंहासन सोडल्याचे जाहीर केले. हेमूच्या सैनिकांनी 6 ऑक्टोबर 1556 रोजी दिल्लीतून आक्रमकांना हुसकून लावले व विजयाचा डंका पिटला. एकोणतीस वर्षे हेमूने दिल्लीवर राज्य केले व त्याला जनतेने विक्रमादित्य या नामाभिधानाने सन्मानित केले. परंतु इतिहासाच्या पुस्तकात एक पराभूत राजा म्हणूनच त्याचा उल्लेख केला जातो.

हुमायूनचा मुलगा जलालुद्दिन अकबर आणि त्याचा पालक बैरामखान यांनी पुन्हा आक्रमण केले. युद्धात हेमूची सरशी होत होती, परंतु भुवईला एका बाणाने स्पर्श केल्यामुळे हेमू बेशुद्ध होऊन पडला. तो मरण पावला असे समजून सेना हतबल झाली व मोगलांनी हेमूच्या सेनेचा पराभव करून त्याला कैद केले. 5 नोव्हेंबर 1556 हा तो अपशकुनी दिवस होता. बैरामखानला अकबरास ‘गाझी’ म्हणजे धर्मयोद्धा बनवायचे होते म्हणून त्याने अकबराकरवी विक्रमादित्य हेमूचा शिरच्छेद घडवून आणला. त्याचे डोके अफगाणीस्तानला पाठवले व धड दिल्ली शहराच्या वेशीवरील वधस्तंभावर टांगण्यात आले.

रोहित्यांची फितुरी व गारद्यांची निष्ठा

5 जून 1674 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची रीतसर स्थापना झाली. हे राज्य त्यावेळेस फारच छोटे होते, परंतु परकीय सत्तांच्या गळफासात अडकलेल्या देशातील कानाकोपर्‍यातील जनतेला दिलासा देणारी घटना होती. संभाजी महाराजांनी मोगलांच्या सेनेची जबडेफाड करून स्वराज्याचा विस्तार केला. फितुरीमुळे त्यांना आलेले वीरमरण मराठ्यांचा हिरमोड करण्याऐवजी प्रेरणादायक ठरेल. इतकेच नव्हे तर रामराजेंच्या निधनानंतर महाराणी ताराबाई यांनी ना राजा ना राजधानी अशा अवस्थेत स्वराज्य टिकवून धरले. संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांना छत्रपतीपदाचा राज्याभिषेक सातारा येथे झाला. ते संतवृत्तीचे असल्यामुळे सज्जनगडाच्या अगदी जवळ असलेले सातारा हे नगर त्यांनी निवासासाठी निवडले. सातारा या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासन स्वतःजवळ ठेवून पंतप्रधानाची नियुक्ती व शिक्काकट्यार देणे हे दोन अधिकार स्वतःकडे ठेवून त्यांनी बाजीराव भट्ट यांना पंतप्रधानपदी म्हणजे पेशवेपदी नियुक्त करून उर्वरित संपूर्ण स्वराज्याचे अधिकार त्यांच्या हाती सोपवले.

पेशवे बाजीराव व त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी स्वराज्याचा चहू बाजूनी विस्तार केला. त्यांच्यानंतर बाजीरावाचे ज्येष्ठ चिरंजीव बाळाजी बाजीराव उपाख्य थोरले नानासाहेब हे पेशवे बनले. बंधू रघुनाथराव उपाख्य राघोबादादा तसेच चिमाजी अप्पांचे चिरंजीव सदाशिवराव भाऊ यांच्या शौर्याला मर्यादा नव्हती.

शिवाजी महाराजांच्या काळात गोव्यातील पोर्तुगिजांचा व्हाईसरॉय कोंदी दे साव्हिएंती याने पोर्तुगालच्या राजाला लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराजांचे सिंधूपासून कावेरीपर्यंत एक राज्य बनवायचे आहे असे म्हटले होते. त्याची कार्यवाही राघोबादादांनी अटकेपार झेंडे लावून पूर्ण केली. अटकपासून कटकपर्यंत पसरलेले काफिरांचे राज्य समाप्त करण्यासाठी भारतात स्थायिक असलेल्या नजीबखान रोहिल्याने अफगाणिस्तानमधील अहमदशाह अब्दालीला आमंत्रण पाठवले. आतापर्यंत पराभवाची सवय नसलेल्या मराठ्यांचा अतिआत्मविश्वास नडला. सोबत कुटुंबीय, तीर्थयात्रेसाठी निघालेले वृद्ध, पेंढारी यांचा ताफा घेऊन सदाशिवराव भाऊ निघाले. सदोबादादांना उत्तर भारताशी परिचय होता, परंतु सदाशिवराव भाऊ तेथील हवामान व माणसे याबाबतीत अनभिज्ञ होते. सोबतीला इब्राहिमखान गारदी याचा तोफखाना होता. त्याला फितवण्याचे अब्दालीकडून प्रयत्न झाले, परंतु तो शेवटपर्यंत पेशव्यांशी एकनिष्ठ राहिला.

युद्ध सुरू झाले तेव्हा मराठ्यांची सरशी होत होती. धुमश्चक्रीमध्ये दोन्ही सैन्यदलांच्या बाजू उलट्या झाल्या. अब्दालीला रोहित्यांकडून कुमक व रसद मिळत होती, परंतु सुरजमल जाटाशी सदाशिवराव भाऊंची बोलणी पूर्वीच फिसकटली होती. गोविंदपंत बुदेला मदतीसाठी निघाला होता त्याला रोहित्यानी गाठले. त्याच्याजवळ असलेले धन लुटले व त्याचे डोके सदाशिवराव भाऊना भेट म्हणून पाठवले. मराठ्यांचे सैन्य समोर आल्यामुळे व तोफांची तोंडे वळवण्याची सोय नसल्यामुळे इब्राहिमखान गारद्याचा तोफखाना निरर्थक ठरला. सदाशिवराव भाऊ ज्या गजेंद्र हत्तीवर बसले होते त्यांच्यासोबत असलेल्या नानासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र विश्वासरावांना गोळी लागली व ते मृत्युमुखी पडले. त्यामुळे सदाशिवराव बेभान झाले व गती वाढवण्यासाठी हत्तीवरून उतरून ते घोड्यावर स्वार झाले. भाऊसाहेब दिसेनासे झाल्यामुळे ते युद्धभूमीतून पळाले असा समज झाल्यामुळे मराठ्यांमध्ये पळापळ झाली. 14 जानेवारी 1761 हा तो दुर्दैवी दिवस ज्या दिवशी मराठ्यांचा दारूण पराभव झाला. या तिन्ही युद्धात भारतीय सेनेचा पराभव झाला. नेपोलियनच्या वॉटरलू येथील पराभवामुळे युरोपियन भाषांमध्ये जसे ‘वॉटरलू’ म्हणजे अपयश असा अर्थ घेतला जातो तसा भारतीय भाषांमध्ये ‘पानीपत होणे’ म्हणजे अपयशी होणे असा अर्थ रूढ झाला. अतिआत्मविश्वास, पूर्वनियोजनाचा अभाव व शत्रू कसा वागू शकतो व फितुरी कशी होऊ शकते याबद्दल धडा शिकवणारी ही तीनही युद्धे आगामी हजार वर्षे तरी भारतीय जनमानस विसरणार नाही.