– दत्ताराम प्रभू-साळगावकर
मुलांचं खेळणं, बागडणं बघितलं, अनुभवलं तर ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे?’ हा प्रश्नच पडत नाही. त्यामुळे ‘विचारी मना’ आणि ‘शोधून पाही’ याची गरजच भासत नाही. कदाचित काही अपवाद असतील, परिस्थितीचा टिळा किंवा शाप असलेली! ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ हेही तेवढंच खरं आहे.
लहान मुलांचं जग हे फार विलक्षण असतं. सर्वकाही आबादीआबाद असं. त्यांच्या राज्यात राजा-राणी असतात, चिऊ-काऊ, वाघ-सिंह सर्वजण असतात. त्यांना गोष्टींचा मेवा देतात. त्यांच्याशी हितगूज करतात. हसतात, बोलतात, गातात. त्यांच्या राज्याचा राजा किंग मोमोसारखा असतो; ‘खा-प्या-मजा करा’ असा उदार संदेश देणारा! त्यांचं खेळणं, बागडणं बघितलं, अनुभवलं तर ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे?’ हा प्रश्नच पडत नाही. त्यामुळे ‘विचारी मना’ आणि ‘शोधून पाही’ याची गरजच भासत नाही. कदाचित काही अपवाद असतील, परिस्थितीचा टिळा किंवा शाप असलेली! ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ हेही तेवढंच खरं आहे.
सुंदर व चपळ चाल असते तिला तुरूतुरू म्हणतात, वार्यावर उडणार्या केसांना भुरूभुरू म्हणतात, काही मुलं असं काही बोलतात की त्या बोलाना चुरूचुरू म्हणावं, असे चुरचुरीत असतात. आमच्याकडे एक छोटू आहे. त्याला आम्ही कसलंही काम करायला सांगितलं तर आमच्याकडे ‘पासवर्ड’ मागतो. पासवर्ड कशाला असं विचारलं तर सांगतो, पासवर्डशिवाय कॉम्प्युटर उघडत नाही असे सांगतो, व कामही करत नाही. त्याला एक पासवर्ड सांगावा लागतो व नंतरच तो ते सांगितलेलं काम करतो. यापुढे आपली सर्व कामे कॉम्प्युटर व रोबोच करतील हे निःसंशय! आपण काय करायचं, कसं वागायचं, सर्वकाही कॉम्प्युटर ठरवेल, सांगेल, शिकवेल! आपण त्याचे गुलाम बनू! श्रीगणेशा तर लहान मुलांपासून झालेलीच आहे! काळ फार दूर नाही जेव्हा लोकांना मत नसणार, कॉम्प्युटरची मात असणार, हाताला काम नसणार, कॉम्प्युटरला मान असणार! हा चिमुरडा आमच्याकडे चॉकलेट, बिस्किटची मागणी करतो. त्याच्याकडे कानाडोळा केला की, ‘मी एक ते पाच अंक मोजणार, तोपर्यंत ते आणून द्या’ असा अल्टीमेटम देतो. हे आमच्यावर उलटलेलं बूमरँग आहे. कोणीतरी त्याला तोंड धुवायला चल, आंघोळीला चल, जेवायला चल, असं सांगितलं व आला नाही तर पाचपर्यंत आकडे म्हणण्याचं शस्त्र उभारलं असणार. आता तोच मंत्र तो आमच्या माथी मारतो! मी काही वर्षांपूर्वी एक कार्टून बघितलं होतं. मुलगा काहीतरी चाळे, दंगामस्ती करत असतो. बापाला ते आवडत नाही. करू नको म्हणून सांगितलं तर तो ऐकत नाही. बापाच्या हातात एक पुस्तक असतं व ते तो वाचत असतो. बापाला एवढा राग येतो की त्याच पुस्तकाने तो आपल्या मुलाला बडवतो. पुस्तकाचं नाव असतं- ‘इंडियन पिनल कोड’!! आहे की नाही मजेशीर?
असाच एक चळवळ्या, चुरचुरीत बालक भेटला. सांगितलेलं काहीच कानावर अजिबात न घेणारा. त्याला दोनदा विचारलं, “अरे तुला ऐकू येतं का? तुला कान आहेत की नाहीत?” तर म्हणाला, “होय, आहेत.” “आहेत, तर तू सांगितलेलं ऐकत नाहीस, मग कान हवेतच कशाला?” तर म्हणतो, “मोठेपणी डोळ्यांना लावलेला च÷ष्मा अडकवायला, नाहीतर पडेल ना!” कोणाला रात्री बरी झोप लागली नाही तर ‘डोळ्याला डोळा लागला नाही’ असं म्हटलं जातं. या बहाद्दराच्या कानी ते पडलं तर म्हणतो, “डोळ्याला डोळा कसा लागेल? मध्ये नाक आडवं आहे ना!”
मी एका छोट्याशा कार्यक्रमासाठी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो. पुष्कळ बालबच्चे जमले होते. मुलांनी गोष्ट सांगायचा लकडा लावला. मी म्हटलं, “सांगतो, राजाची.” मुलं म्हणाली, “नेहमीची राजा-राणीची नको, नवीन कसलीतरी सांगा.” मी म्हटलं, “ठीक, नवीनच सांगतो.”
एक होता राजा. त्याचे कान वेगळेच होते. आपल्यासारखे माणसाच्या कानासारखे नव्हते; गाढवाच्या कानासारखे होते. पण ही गोष्ट फक्त एकच व्यक्ती सोडून अन्य कोणालाच माहीत नव्हती. मी ती व्यक्ती कोण हे विचारलंच नाही, तर मुलंच मोठ्यानं ओरडली, “राणी!” मी म्हटलं “चूक!” तो मनुष्य होता राजाचे केस कापणारा केशकर्तनकार! कारण राजा नेहमीच पगडी बांधून असायचा व कान पगडीत लपवून ठेवायचा. पगडी काढायचा फक्त केशकर्तनकारासमोर, कारण इलाजच नसायचा! राजानं त्याला सक्त ताकीद दिली होती की, ही गोष्ट कोणालाच सांगायची नाही. सांगितल्यास देहान्त शासन! गोष्टी गुपित राहिली. एक दिवस राजाचा तो केशकर्तनकार दूरच्या बाहेरगावी गेल्यामुळे येऊ शकला नाही, त्यामुळे दुसर्याला बोलवावं लागलं. तो आला. राजाने त्याला तशीच सक्त ताकीद दिली की केस कापताना तुला एक गोष्ट दिसेल, पण त्याची वाच्यता कोणाचकडे करायची नाही; केल्यास देहान्त शासन! राजानं केस कापण्यासाठी पगडी काढली तेव्हा त्याला ती विचित्र गोष्ट दिसली. राजाचे कान चक्क गाढवाच्या कानासारखे! त्यानं आपलं काम उरकलं, बिदागी घेऊन तो निघून गेला.
ती विचित्र गोष्ट त्याच्या मनात घट्ट भरून राहिली. त्याला चैन पडेना. कोणाला तरी सांगावीच सांगावी असं पुन्हा पुन्हा त्याला वाटू लागलं, पण सांगणार कोणाला? देहान्तशासनाचं डोक्यावर भूत! त्यानं युक्ती काढली. मनातली ती अजीर्ण मळमळ ओकण्यासाठी एक पहार घेतली, ओसाड व निर्जन माळरानावर तो गेला. पहारीनं जमिनीमध्ये जमेल तेवढं जास्तीत जास्त खोल बीळ काढलं. आपलं तोंड त्या बिळात घातलं, बाजूला दोन्ही हाताचा पसा केला व मोठ्यानं ओरडला, ‘राजाचे कान गाढवाच्या कानासारखे आहेत, राजाचे कान गाढवाच्या कानासारखे आहेत…’ मनाचं समाधान होईपर्यंत ओरडला; झाल्यावर घरी आला. त्याची मळमळ संपली. कोणालाच काही पत्ता लागला नाही. पण आश्चर्य, काही दिवसांनी त्या बिळातून एक झाड उगवलं. मोठं झाल्यावर त्याच्या पानातून वारा वाहत असताना पानांची सळसळ न होता आवाज ऐकू येऊ लागला,
“राजाचे कान गाढवाच्या कानासारखे आहेत… राजाचे कान गाढवाच्या कानासारखे आहेत…”
गोष्ट संपली. नवीन गोष्ट म्हणून मुलं खूश झाली. मी त्यांना विचारलं, “झाड काय म्हणतं?” मुलं ओरडली. कलकलाट केला. “राजाचे कान गाढवाच्या कानासारखे आहेत…”
मुलांनी घर चक्क डोक्यावर घेतलं!
छोट्यांचं राज्य ते हेच!!