॥ घरकुल ॥ अंगण

0
143
  • प्रा. रमेश सप्रे

‘अगं, तुळस काहीही देत नाही तरीही तिची सेवा करायची निरपेक्ष कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. … आणि एक सांगू, जर हा निरपेक्ष कृतज्ञतेचा संस्कार रुजला तर भाकड गायीला कत्तलखान्यात नि म्हातार्‍या (निरुपयोगी) आईला वृद्धाश्रमात पाठवण्याचा विचारसुद्धा मनाला शिवणार नाही’.

अंगण या शब्दाचा ‘अंग’ या शब्दाशी काही संबंध आहे का हे माहीत नाही. एक मात्र खरं की अंगण हे घरकुलाचं अविभाज्य अंग होतं. अंगणाशिवाय घरकुल शून्य शून्य जरी वाटलं नाही तरी सुनं सुनं निश्चित वाटतं. घरकुलाला चारी बाजूंनी रिकामी जागा असली तरी अंगण मात्र दोनच बाजूला असतं. पुढे आणि मागे. तसं पाहिलं तर दोन्ही जमीनीचे तुकडेच. पण पुढच्या नि मागच्या अंगणाची संस्कृती वेगवेगळी असते. असं असलं तरी पूर्वीची माहेरवाशीण लग्नानंतर सासुरवाशीण जरी झाली तरी दोन्ही अंगणांबद्दल वाटणारी हुरहुर सारखीच असते.

मागच्या अंगणातल्या परसबागेतील तिनं लावलेल्या रोपांची झाडं झालेली असतात. भाज्यांचा वाफा वेगळा तर फुलांचा ताटवा स्वतंत्र निराळ्या जागेत असतो. गोठा असतो नि मुख्य म्हणजे गोठ्यात जनावरं असतात. त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा किणकिण नाद सासुरवाडीच्या कामाच्या धबडग्यातही तिला स्पष्ट ऐकू येतो नि तिचं हळवं कोवळं मन माहेरच्या घरकुलाच्या मागच्या अंगणात रुंजी घालू लागतं. मागच्या परसातली तिची भाज्या- फुलं- गायी वासरं यांच्याहून जिवंत सखी म्हणजे बाराही महिने निवळ शितळ पाणी असलेली विहीर. नाहीतरी खरं जीवन तिच्यातच असतं ज्यावर सार्‍या गृहवासियांचं जीवन अवलंबून असतं. मागच्या परसाला असलेल्या कुंपणावर चढलेली लाल भोपळ्याची वेल, तिची नाजुक पिवळी फुलं नि तितकीच खरखरीत फताडी पानं दोन्हींच्या स्पर्शस्मृतीनंही तिचं अंग शहारुन जातं. काही क्षण एखाद्या कोमल वेलीसारखी ती थरथरतेसुद्धा. या थरथरीशी एक आठवण घट्ट जोडलेली आहे. एकदा बारीकसा खडा तिनं गंगागायीच्या दिशेनं फेकला असताना तिला लागल्यावर काय नाजुक थरथर तिच्या कातडीवर दिसली होती!

हे झालं मागच्या अंगणाचं वैभव. पुढच्या अंगणाची श्रीमंती काही आगळीच असे. एका कोपर्‍यात असलेलं सुंदरसोज्वळ वाटणारं तुळशीवृंदावन. सकाळी सर्व ऋतूत तिची आई तुळशीला पाणी घालीत असे. पावसाळ्यात पाऊस बरसत असताना असं पाणी तुळशीला घालणं हा मूर्खपणा नव्हता का? – निश्चितच नव्हता. उन्हाळ्यात एकदोन तांबे पाणी घालावं लागे. तर पावसाळ्यात एकदोन चमचे. पण तुलसीपूजनाचा जो कृतज्ञतेचा संस्कार असतो तो सतत जिवंत राहायला नको का? – ‘काय देते ग ही तुळस तुला? ना सुगंध, ना शोभेची फुलं, ना फळं, ना इतर कामासाठी लाकूड ना सावली जिच्यात आनंदानं बसता, झोपता येईल. मग का रोज घालायचं पाणी तिला?’ या तिच्या प्रश्‍नावर आई जरा वरच्या आवाजात म्हणायची, ‘तुझ्या या ‘का’ प्रश्‍नाचं उत्तर एकच आहे… ‘म्हणूनच! अगं, तुळस काहीही देत नाही तरीही तिची सेवा करायची निरपेक्ष कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. … आणि एक सांगू जर हा निरपेक्ष कृतज्ञतेचा संस्कार रुजला तर भाकड गायीला कत्तलखान्यात नि म्हातार्‍या (निरुपयोगी) आईला वृद्धाश्रमात पाठवण्याचा विचारसुद्धा मनाला शिवणार नाही’.
पुढच्या अंगणाचा सर्वात आकर्षक पैलू म्हणजे त्याचं शेणानं सुरेख सारवलेलं असणं. स्वच्छ असेल तर रात्री या अंगणात जमिनीवर तसंच झोकून द्यावं नि तारेनक्षत्रं बघत झोपून जावं.

निसर्गाचे सगळे ऋतू नि त्यांचे मूड्‌स या अंगणात प्रत्यक्षपणे अनुभवता येतात. रणरणतं ऊन असो की कोसळता पाऊस असो की थरकाप करणारी थंडी असो. या सार्‍यांचा अनुभव या पुढच्या अंगणातच येतो. तसा तो टेरेसवर येत नाही. कारण अंगण जिवंत असतं तर टेरेस निर्जीव. विशेष म्हणजे टेरेस असलेल्या घरातली माणसं सगळ्या ऋतूंशी वैर साधून असतात. झाला गडगडाट की काढा छत्र्या- रेनकोट. पावसाचा एक थेंब अंगावर पडेल तर शप्पथ. जरा गार वारा वाहू लागला की आलेच यांचे स्वेटर- मफलर बाहेर. आणि उन्हाळ्याचं तर विचारुच नका. त्या टोप्या, ते काळे चष्मे, ते झिरझिरीत कपडे या मंडळींची वाटच पाहत असतात.

पण अंगणात सार्‍या ऋतूंचा होणारा स्पर्श हृदयाला सुखावून जातो. उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर अंगणात झोपून गप्पा मारत रात्र रात्र जागणं होई. त्यातही पौर्णिमेच्या प्रकाशात तर हमखास चांदणीभोजन. त्यात आंबट, खारट, तुरट, तिखट, कडू, गोड अशा सहाही रसांची रुची असे. पदार्थ साधेच पण अतिशय रुचकर. साथीला गप्पा अन् सारवलेल्या अंगणाचा वत्सल स्पर्श. अमावस्येची तर मुलं वाट पाहत कारण घरातली जाणती मंडळी त्यांना आकाशदर्शन घडवत. सप्तर्षी दाखवताना त्या त्या ऋषीची गोष्ट सांगत. एकट्या अरुंधतीलाच पती वसिष्ठांबरोबर स्थान कसं मिळालं याची नि तिच्या तार्‍याच्या बरोब्बर विरुद्ध दिशेला दिसणार्‍या ध्रुवतार्‍याची कथा तर प्रत्येक वेळी बुद्धीत नवा प्रकाश पाडत असे.

मुलांचं नि अंगणाचं खरं नातं दिसून येई ते पावसाळ्यात. पाणी साचलं की नावा करायच्या कागदाच्या नि ती कागदी नाव बुडली तरी पावसाच्या सरीत डोक्याचं मडकं भिजवायचं नि हसायचं. ते मडकं भरायचं नाही. कारण मडकं भरलेलंच असायचं नाना कल्पनांनी, भन्नाट विचारांनी, कडूगोड स्मृतींनी! ‘ये गं ये गं सरी, माझं मडकं भरी’ म्हणत मातीचं मडकं भरायचं. हिवाळ्यात सकाळी – रात्री शेकोटी पेटवून तिच्याभोवती धगीत बसून चकाट्या पिटायच्या. एक- ना दोन अनेक स्तर नि पदर असायचे घरकुलाच्या अंगणाच्या सहवासाला. आता तो रोमान्स जवळजवळ अस्तंगत झालाय कारण पूर्वी जमीनीतून सोनं पिकायचं आज जमीनच सोनं बनलीय. (दरफुटी भाव वाढल्यामुळे!)
तरीही अजून कोकणातील, खेड्यातील अनेक घरकुलांसमोर अशी हसू-आसूंनी भिजणारी अंगणं आहेत. अंगणावर घरातील सर्व पिढ्यांचा अधिकार असतो. थरथरत्या हातांनी तुळशीपुढे सांजवात लावली जाते. त्याचवेळी देवासमोर कोवळे हात जोडले जाऊन म्हणत असतात…‘दिवा लावला तुळशीपाशी उजेड पडला देवापाशी!’ आतलं देवघर नि घराच्याही बाहेर असलेल्या पायवाटेवर एकाच वेळी पडणार्‍या प्रकाशाचं प्रतीक असायचा तो दिवा नि अंगणाच्या सीमेवर असलेली ती तुळस! देहलीदीपक न्यायाच्या म्हणजे उंबरठ्यावर तेवणार्‍या दिव्यासारखा स्वतः जळून इतरांना प्रकाश देण्याचा संस्कार निराळा शिकवायची गरज नसायची. कारण अशा संस्कारांची शाळा असायचं ना घरकुलामागचं- पुढचं ते अंगण!