ही गुंडगिरी मोडा

0
12

गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील कुटुंबाला कळंगुट येथे टॅक्सीचालकांनी केलेली मारहाण गोव्याच्या प्रतिमेला आणि प्रतिष्ठेला काळीमा फासणारी आहे. केवळ गाडी बाजूला घेण्याची विनंती पर्यटकांनी केली असता, आपल्याला तसे करायला सांगणारे तुम्ही कोण असे म्हणत ह्या स्थानिक टॅक्सीचालकाने साथीदाराच्या मदतीने त्यांना मारहाण केली. हे टॅक्सीचालक मद्य प्राशन केलेले होते असेही तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी संबंधितांना अटक केली आहे, परंतु केवळ एवढ्यावर ह्या प्रकरणाला सरकारने बासनात गुंडाळू नये. पर्यटकांशी गैरवर्तन, त्यांच्याशी अरेरावी ही गोव्यातील टॅक्सी व्यवसायातील नेहमीची गोष्ट बनलेली आहे. पर्यटकांशी दांडगाई करणारे हे टॅक्सीचालक आहेत की गुंड? टॅक्सीचालकांकडून पर्यटकांशी अरेरावी होण्याचे प्रकार नवे नाहीत. अशा असंख्य घटना वेळोवेळी घडलेल्या आहेत. गोवा हे पर्यटनाभिमुख राज्य आहे असे जर आपण म्हणत असू, तर अशा प्रकारच्या गुंडगिरीला कायमचा आळा घातला गेला पाहिजे. गोवा हे भारतातील एक शांतताप्रिय राज्य आहे अशी त्याची पूर्वापार ओळख आहे. येथील शांती, सलोखा, सौहार्द्र यामुळे जगभरातील पर्यटकांना गोव्याची ओढ वाटते. परंतु अशा प्रकारच्या पर्यटकांशी गैरवर्तनाच्या घटनांनी गोव्याच्या ह्या ओळखीला बट्टा लागतो ह्याची जाणीव सरकारने ठेवायला हवी. एखाद्या टॅक्सीचालकाविरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालेला असेल तर त्याचा वाहतूक परवाना रद्दबातल ठरणारी तरतूद सरकारने कायद्यात करावी. तरच ह्या व्यवसायात शिरकाव केलेल्या गुंडपुंडांना त्यातून बाहेर फेकता येईल. टॅक्सी व्यावसायिक आपल्या संघटितपणाच्या बळावर वेळोवेळी सरकारला वेठीस धरत आलेले आहेत आणि जनतेची सहानुभूती गमवून बसले आहेत. गोवा हे देशातील एकमेव राज्य असेल की जेथे ॲप आधारित टॅक्सीसेवा चालवू दिली जात नाही. कारण काय, तर टॅक्सीवाल्यांचा विरोध. गोवा हे एकमेव राज्य असेल जेथे मीटरनुसार टॅक्सी किंवा रिक्षाची भाडेआकारणी होत नाही. कारण काय, तर मीटरला विरोध. स्पीड गव्हर्नरला विरोध, मीटरनुसार भाडेआकारणीला विरोध, विमानतळ आणि हॉटेलवर येणाऱ्या पर्यटकांना नेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना आपल्या खासगी वाहनांचा वापर करू देण्यास विरोध, प्रवाशांना आपल्याला हव्या त्या टॅक्सीचालकास विमानतळावर न्यायला येऊ देण्यास विरोध. अशी ही दांडगाई चालत आली आहे आणि सरकार त्यांना केवळ त्यांच्या मतपेढीखातर वेळोवेळी पाठीशी घालत आले आहे. सत्ताधारी पक्षातील काही आमदार तर ह्या मंडळींचे कैवारी असल्याच्या थाटात आपल्याच सरकारला ललकारत असतात. टॅक्सी व्यवसायातील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी सरकारने गोवा माईल्स सेवा आणली, तर त्यालाही विरोध होत आला. गोवा माईल्सच्या टॅक्सीचालकांना मारहाण काय, त्यांच्या टॅक्सींची मोडतोड काय, सगळे प्रकार झाले. ह्या गुंडगिरीचा तेव्हाच बीमोड झाला असता तर पर्यटकांवर हात उगारण्यास कोणी धजावले नसते. परंतु वेळोवेळी जे नरमाईचे धोरण स्वीकारले जात राहिले आहे, त्यातूनच अशा प्रवृत्ती सोकावल्या आहेत. मोपा विमानतळावरील टॅक्सींसंदर्भातही हीच अडवणूक होत आली. सरकारने शेवटी नमते घेतले. तरीही दांडगाई सुरूच होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा जेव्हा प्रश्न असेल, तेव्हा टॅक्सीवाला असो वा कोणी असो, कोणाचीही गय कोणत्याही कारणाखातर होता कामा नये. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना जर अशा प्रकारच्या गैरवर्तनाला अकारण सामोरे जावे लागत असेल, तर हा संदेश सर्वदूर गेला तर उद्या पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाहीत. गोव्यात येणारा घरंदाज पर्यटक आताच कोकण आणि केरळकडे वळलेला आहे. दुसरीकडे गोवा म्हणजे खा, प्या, मजा करा अशी धारणा झालेले देशी धटिंगण पर्यटक बनून गोव्यात लोटत असतात. गोव्याच्या पर्यटनाची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. कौटुंबिक पर्यटनासाठी गोवा जर सुरक्षित राहणार नसेल, तर कुटुंबासमवेत सुट्टी घालवण्यासाठी बाहेर पडणाऱ्या पर्यटकांचा वर्ग गोव्याकडे पाठ फिरविल्याशिवाय राहणार नाही. गोव्यात एखादी एमएच किंवा केए क्रमांकपट्टी असलेली गाडी दिसली की गुंडपुंडांची प्रादेशिक अस्मिता जागी होताना दिसते आणि त्यांच्याशी क्षुल्लक कारणावरून वाद उकरून काढून दांडगाई केली जाते. आजवर असे कित्येक प्रकार वेळोवेळी घडले आहेत. पर्यटकांवर प्राणघातक हल्ले चढवण्यापर्यंत स्थानिकांची मजल गेली आहे. ह्या प्रकारांना थांबवायचे असेल तर सरकारने पर्यटकांवरील हल्ले अतिशय गांभीर्याने घ्यावेत. आता संबंधित गुन्हेगारांचा बचाव करण्यासाठी स्थानिक राजकारणी पुढे होतील. पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. अशा कशाचीही गय न करता संबंधितांवर कठोर कारवाई केली जावी. तरच पर्यटकांविरुद्ध गैरवर्तन करण्यास यापुढे तरी कोणी धजावणार नाही. गोव्यासारख्या पर्यटनाभिमुख राज्याला अशा प्रकारची धटिंगणशाही परवडणार नाही हे भान पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांना तरी यायलाच हवे.