हिंसा करणार्‍यांना जागीच गोळ्या घाला

0
21

>> श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून सैन्याला आदेश

श्रीलंकेत सध्या आणीबाणी लागू असून आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेतील अनेक शहरांमध्ये नागरिक निदर्शने करत आहेत. त्रिंकोमाली नौदल तळासमोरही काल निदर्शने सुरू होती. या निदर्शनावेळी जमाव आक्रमक होत असून सरकारी संपत्तीचे नुकसान करत आहे. त्यामुळे श्रीलंकेतील सैन्य दलाला संरक्षण मंत्रालयाने ‘शूट एट साईट’म्हणजेच हिंसा करणार्‍यांना जागीच गोळी घाला असे आदेश दिले आहेत. देशातील अनेक भागात हिंसाचार आणि जाळपोळ करण्यात येत आहे. त्यामुळे, सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी कोलंबोमधील ‘टेम्पल ट्रीज’ हे अधिकृत निवासस्थान सोडले आहे. त्यांनी त्रिंकोमाली नौदलच्या तळावर आश्रय घेतल्याचे वृत्त असल्यामुळे नागरिकांनी तिथे निदर्शने सुरू केली आहेत. दरम्यान, श्रीलंकेत सुरू असलेल्या निदर्शनात आतापर्यंत ५ लोकांचा मृत्यू झाला असून २०० लोक जखमी झाले आहेत.

श्रीलंकेत अराजकता निर्माण झाली असून देशात राजकीय संघर्षही सुरू आहे. दोन्ही बाजूचे समर्थक एकमेकांशी दोन हात करत आहेत. प्रशासनाकडून देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबीयांना हेलिकॉप्टरमधून नौदल तळावर हलवण्यात आले आहे. श्रीलंकेतील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशात हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राजपक्षे यांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये चकमकी सुरू असून श्रीलंकेतील हंबनटोटा येथे संतप्त आंदोलकांनी महिंदा राजपक्षे यांचे घर पेटवले आहे. श्रीलंकेतील तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी सैन्याला पाचारण केले असून सगळ्याच राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

सरकार स्थापनेसाठी
विरोधी पक्षाचा प्रस्ताव

श्रीलंकेतील मुख्य विरोधी पक्ष समगी जना बालावेगया यांनी श्रीलंकेत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, राष्ट्रपतींनी तो प्रस्ताव नाकारला. त्यानंतर या पक्षाने राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.