>> मृत पर्यटक जम्मू-काश्मीरमधील
पर्यटनासाठी गोव्यात आलेल्या जम्म-काश्मीरमधील दोघा सख्ख्या भावांचा काल हरमल येथे समुद्रात बुडून मृत्यू झाला. हरमल येथील ‘स्वीट लेक’ जवळील समुद्रात ही घटना घडली. अमनदीप (28) आणि अभिषेक (34) अशी मृतांची नावे असून, ते दोघे सख्खे भाऊ आहेत.
सविस्तर माहितीनुसार, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशचे चार पर्यटक रविवारी गोव्यात आले होते. त्यातील अभिषेक याचे लग्न ठरले होते. त्याचीच बॅचलर पार्टी साजरी करण्यासाठी हे मित्र गोव्यात आले होते. ते कळंगुटमध्ये बागा येथे उतरले होते. अमनदीप व अभिषेक याच्याबरोबर सुमित श्रीवास्तव आणि रुहान गुजरा हे दोन मित्र देखील आले होते.
काल सकाळी 6.30 च्या सुमारास अभिषेक आणि अमनदीप हे स्वीट लेकजवळ समुद्रात आंघोळीसाठी गेले होते. त्या ठिकाणी समुद्राच्या एका मोठ्या लाटेबरोबर ते बुडाले. त्यांना बुडताना पाहून इतरांच्या हृदयाचे ठोके चुकले. त्यांनी लगेच पोलीस आणि अग्निशामक दलाला माहिती दिली. सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी पेडणे अग्निशामक दलाला या घटनेची माहिती मिळाली. त्यानुसार दलाचे जवान आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. साधारण दोन ते अडीच तास शोधकार्य करून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात पाठवून दिला. या प्रकरणी पुढील तपास पेडणे पोलीस उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.