स्वातंत्र्य, समता व बंधुतेची शिकवण देणारे
गौतमबुद्ध

0
9
  • शंभू भाऊ बांदेकर

स्वातंत्र्य, समता व बंधुता या तीन उच्चतम तत्त्वांवर आधारित गौतमबुद्धांचा धर्म आहे व तो खऱ्या अर्थाने सुख, शांती व समाधान प्रदान करील असा लक्षावधी लोकांचा विश्वास आहे. केवळ बौद्ध धर्मीयांनीच नव्हे तर इतर कुठल्याही धर्माच्या लोकांनी भगवान गौतमबुद्धांच्या त्रिसूत्रीची विचारधारा अमलात आणली तरी माणूस सुखी, शांती व समाधानास पात्र होईल. बुद्धपौणिमेनिमित्ताने…

केवळ आपल्या भारत देशातीलच नव्हे तर अख्ख्या जगातील दीन-दलित, शोषित-पीडित, आदिवासी, बंजारा आदी लोकांना भगवान गौतमबुद्ध जवळचे का वाटतात आणि गौतमबुद्धांनाही हे लोक जवळचे का वाटत, याबद्दल एक आख्यायिका आहे ती अशी ः
सिद्धार्थ गौतम आपल्या राजमहालाचा त्याग करून सच्चा ज्ञानप्राप्तीसाठी जंगलात निघून गेले. कुणालाही न सांगता, न विचारता त्यांनी हा मार्ग पत्करला होता. बरेच दिवस गेले. सिद्धार्थ परत येईना. त्यांच्या वडिलांना चिंता वाटू लागली. सल्लामसलतीनंतर असे ठरले की, ‘बंजारा ही भटकी जमात आहे. त्यांना देशातील सर्वच आडमार्ग माहीत आहेत. कारण त्यांचा फिरतीचा व्यवसाय होता. सतत ते रानोमाळ फिरतात. त्यांच्याकडे सिद्धार्थाला शोधण्याची जबाबदारी द्यावी. यासाठी त्या लोकांना लागणारा सर्व खर्च त्या-त्या राज्यातील राजांनी द्यावा व त्याची वसुली सिद्धार्थाच्या पिताश्रींकडून करून घ्यावी.’ फतवा निघाला आणि बंजारी लोक आपल्या कामाला लागले.

एके दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक समाधिस्त साधू त्यांना दिसला. फतव्यातील वर्णनानुसार हाच सिद्धार्थ गौतम आहे याची त्यांना खात्री पटली. त्यांनी त्यांचे रक्षण करण्याचे ठरविले. समाधिस्त गौतम बुद्धांना जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा त्यांना प्रथम फलाहार आणि सुकामेवा बंजाऱ्यांनीच दिला आणि त्यांची साथसंगत करून ते अनेक गावांत त्यांच्यासोबत फिरू लागले. प्रत्येक गावात गौतमबुद्धाची प्रवचने होत. प्रत्येक प्रवचनाला काही बंजारा व्यक्ती सतत हजर दिसत असल्यामुळे गौतम बुद्धांनी एकदा त्यांना विचारले, “का रे बाबा, रोजच सकाळ, संध्याकाळ माझे प्रवचन ऐकण्यास हजर राहता याचे नेमके कारण काय?” यावर दोन अडाणी माणसांनी उत्तरे दिली, “बापू, आपले प्रवचन गोड आणि श्रवणीय असल्यामुळे आम्ही नित्यनेमाने हजर राहतो. या प्रवचनातून आम्हाला जगण्याची दिशा समजते. करुणा, शांती, सद्भाव यांचे दर्शन घडते.” या उत्तराने प्रभावित होऊन गौतम बुद्धांनी बंजारा लोकांना सर्वप्रथम दीक्षा दिली. ते लोक होते तपस्यू आणि भिल्ल. यातून मग जगातील तमाम अडाणी, अज्ञात, अशिक्षित लोकांपासून शिक्षित-सुशिक्षित लोकांपर्यंत जगण्याचा मंत्र मिळाला आणि ते गौतमबुद्धाच्या उपदेशाने आपले जीवन सुसह्यपणे जगण्याच्या प्रयत्नास लागले. आपल्या परिचयाच्या दोन विभूती गौतम बुद्धाच्या उपदेशाने, शिकवणीने प्रेरित होऊन कार्य करीत राहिल्या. त्यांपैकी एक म्हणजे डॉ. धर्मानंद कोसंबी आणि दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होत. गौतम बुद्धांच्या बौद्ध धर्माबाबत बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, “माझी श्रद्धा बुद्धिनिष्ठ आहे. ती अंधश्रद्धा नाही. माझ्या बुद्धीच्या साहाय्याने विचार करताना मला बौद्ध धर्माची तत्त्वे पटली, म्हणून मी तो धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. जगातील इतर धर्म परमेश्वर-आत्मा-मृत्यूनंतरची मानवाची स्थिती यासंबंधी विचार व उपदेश करतात, पण या गोष्टी बौद्ध धर्मामध्ये नाहीत. मानवी जीवन सुखमय व्हायला जी तत्त्वे कारणीभूत आहेत, ती तत्त्वे बौद्ध धर्माने सांगितली व उपदेशिली. ती तत्त्वे म्हणजे प्रज्ञा, करुणा आणि समता. मनुष्याने बुद्धिनिष्ठ राहावे, सर्व माणसांवर प्रेम करावे आणि त्यांच्याशी समपातळीने वागावे, हा या तीन तत्त्वांचा अर्थ आहे. या तत्त्वांप्रमाणेच सर्वजण वागू लागले तर जग सुखी होईल. प्रज्ञा, करुणा आणि समता ही श्रेष्ठतम तत्त्वे बौद्ध धर्म सांगतो, म्हणून मला तो स्वीकारावा असे वाटले.”

आजच्या भाषेत सांगायचे झाले तर स्वातंत्र्य, समता व बंधुता या तीन उच्चतम तत्त्वांवर आधारित गौतमबुद्धांचा धर्म आहे व तो खऱ्या अर्थाने सुख, शांती व समाधान प्रदान करील असा लक्षावधी लोकांचा विश्वास आहे. केवळ बौद्ध धर्मीयांनीच नव्हे तर इतर कुठल्याही धर्माच्या लोकांनी भगवान गौतमबुद्धांच्या त्रिसूत्रीची विचारधारा अमलात आणली तरी माणूस सुखी, शांती व समाधानास पात्र होईल, यात शंका नाही.
बुद्धाची तत्त्वे अजरामर आहेत. बौद्धधर्म ज्याने स्वीकारला असेल त्याने प्रज्ञा, करुणा व समता या तीन तत्त्वांप्रमाणे आचरण केले पाहिजे, असे सांगून बुद्ध म्हणतात, “हा धर्म तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हाच तो स्वीकारा.”

आज जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या झळा सर्वदूर पसरल्या आहेत व पसरत आहेत. अशावेळी बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आपण प्रज्ञा, करुणा, समता मंत्रावर गंभीरपणे विचार करणे, हे सयुक्तिक ठरणार नाही का?