स्नान झाले धरणीचे आता पडेल ‘सोन्याचा प्रकाश’…!

0
52
  • रमेश सावईकर

माणसाच्या इच्छेच्या तालावर पाऊस नाचत नाही. तसा तो वागतही नाही! त्याचा बरसण्याचा मार्ग वेगळा, रूपं आगळी-वेगळी अन्‌‍ त्यानुसार त्याचं बरसणं, त्याचं येणं नि जाणं, त्याला हवं तेव्हा आणि त्याला हवं तस्संच!

आभाळ भरून आलं नव्हतं… मेघांची दाटीवाटीही दिसत नव्हती… त्यामुळे ऋतुराज पर्जन्यराजाच्या आगमनाची पुसट कल्पनाही नव्हती. पण पूर्वसूचना देऊन आला तर त्याला लहरी कसे म्हणता येईल? असा विचार मनात येऊन गेला. अन्‌‍ काय आश्चर्य…! क्षणार्धात तो आगंतुक पाहुण्यासारखा दत्त म्हणून धरतीवर अवतरला. त्यामुळे त्याचे स्वागत आपसूकच करावे लागले. तप्त झालेल्या वसुंधरेला त्याने सचैल स्नान घातले. हवेत गारव्याची लहर सोडली… त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रत्येकाला तो भेटून गेला. मी हा क्षण अनुभवत होतो…

आता तो काही एवढ्यात बरसणार नाही म्हणून मी स्वस्थ बसून होतो. पण काही वेळानंतर पुन्हा मेघांचा गडगडाट होऊन अवनी-कंपायन झालं… स्वच्छ, नितळ असं पूर्वी असलेलं आकाश काळ्याकुट्ट ढगांच्या अभ्रांनी झाकोळून गेलं. वीजा चमकू लागल्या… डोळे दीपवणारा तो लख्ख उजेड तिमिरास मिठीत घेत होता. सारे काही मन स्तंभित करून सोडणारे दृश्य…! अन्‌‍ तो बरसत आला. ‘घननीळा बरसला…!’ या गीतपंक्ती नकळत ओठांवर रेंगाळू लागल्या. तसा तो ऐटीत, आपल्या थाटात आला म्हणून आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. हल्ली तो असाच त्याला हवा तेव्हा बरसतो. त्याचा पूर्वीसारखा नेम आता राहिलेला नाही. पूर्वी तो नेमाने यायचा. सर्वांना त्याचं कौतुक वाटायचं. ‘नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ या काव्यपंक्तीत म्हटल्याप्रमाणे तो वक्तशीर होता. हल्ली तो त्याला हवे तेव्हा धरणीवर बरसतो. तो कधी पूर्वसूचना देत मेघगर्जनेसह धुंवाधार बरसून दाणादाण उडवून देतो, तर कधी मूकपणी संततधार बरसतो.

ऋतुराज, पर्जन्यराज अशा नावानं संबोधला जाणारा हा पाऊस. त्याचे बरसण्याचे रूप आगळे, ढंग वेगळे… कधी तो लहर आली की येईल नि लगेच निघून जाईल, तर कधी हट्टी बनून चक्क सतत तीन-चार दिवस संततधार बरसत राहील. सारी वसुंधरा काळोखाच्या साम्राज्यात लपेटून जाईल. चक्क सूर्यदर्शनसुद्धा नाही, इतपत तो आपली शक्ती दाखवून उच्छाद मांडील! कुठं जाईल, कुठं पाठ फिरवील हे त्याचे त्यालाच माहीत! आज येथे तर उद्या तिथे… त्याला हवी तशी भ्रमंती करील.

तो जेव्हा नेमस्तपणे, संततधार शांतपणे बरसतो तेव्हा तो सर्वांना हवाहवासा वाटतो. पण बेभान होऊन येतो, थैमान घालतो, दाणादाण उडवून देतो तेव्हा तो नको-नकोसा वाटतो. केव्हा एकदा तो विश्रांती घेतो असे लोकांना होऊन जाते. माणसाच्या इच्छेच्या तालावर पाऊस नाचत नाही, तसा तो वागतही नाही! त्याचा बरसण्याचा मार्ग वेगळा, रूपं आगळी-वेगळी अन्‌‍ त्यानुसार त्याचं बरसणं, त्याचं येणं नि जाणं, त्याला हवं तेव्हा आणि त्याला हवं तस्संच!

पाऊस कोणाचंच ऐकेना. कोसळत राहणाऱ्या पावसाची ‘रेन रेन गो अवेऽऽ!’ किंवा अन्य कोणत्याही दयाघन शब्दांत आळवणी केली तरी त्याच्यावर काहीच परिणाम होणे नाही एवढा तो लहरी नि हट्टी. तो आपल्याच धुंदीत बेधुंद होऊन बरसतो. त्याची रूपं अनेक… तो लहरी, खट्याळ, स्वच्छंदी, मस्तीखोर, थैमानी, अबोल, गर्जणारा, झिम्माड, उच्छादी… अशी किती किती रूपं त्याची काय म्हणून सांगावी?
एवढं असूनही त्याची गरजही आहेच. ती तसूभरही कमी होत नाही. चातकासारखी त्याची प्रतीक्षा वेळप्रसंगी माणसांना करावीच लागते. धरतीवर बरसणं हा त्याचा फक्त धर्म नसून तो एक छंद बनून राहिला आहे.
थंडगार वारा वाहू लागला की पाऊस नक्कीच येणार असं आपल्याला वाटतं. दूर कुठेतरी त्याचे बरसणे चालू असते. त्यावेळी दूर असलेला तो साजण-सखा आपल्या भेटीस आल्यावाचून राहणार नाही अशी खात्री वाऱ्यानं त्या गावाला दिलेली असते… तशीच तेथील माणसांनाही! नुसता थंडगार वारा वाहू लागला तरी मन फुलकित होतं. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर नभाचे बांध फोडून पावसाने मातीला भिजवावे, अमृतधारांनी सिंचन करावे अन्‌‍ धरतीला सचैल स्नान घालून ओलेचिंब भिजवावे अशी अपेक्षा त्याची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या पांथस्थाला, बळीराजाला असते.

मृग नक्षत्राचा पहिला पाऊस बरसला की तप्त झालेली धरती तृष्णा भागवून टवटवीत- प्रसन्न चेहऱ्याने त्याच्याशी संवाद साधते. मातीचा सुगंध चोहोबाजूंना पसरतो. खोंड उन्मत्त झाल्यागत वारेमाप धावू लागतं. वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं. चैतन्याची झळाळी चमकते. त्याचे वर्णन करताना कवी म्हणतो ः
स्नान झाले धरणीचे
आता पडेल सोन्याचा प्रकाश!
पाऊस समर्थ, शक्तिशाली अन्‌‍ सृष्टीलाही नवचैतन्यानं देणारा, फुलकित करणारा किमयागार आहे! लहान मुलांना पावसाचं मोठं अप्रूप. जलधारा अंगावरती घेत आपण ओलेचिंब भिजून जावे असे त्यांना वाटते. पावसाची त्यांना पर्वा नसते. उलट त्याच्याशी जवळीक हवी असते. आजारी पडण्याची तमा न बाळगता ती पावसात खेळतात, बागडतात. कुटुंबातील मोठ्या माणसांना चकवा देऊन हळूच घराबाहेर पडून पावसाची मौजमजा लुटतात. पावसाची आळवणी करीत गीत म्हणतात ः

येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा…!
तथापि, त्याची करुणा भाकली म्हणून तो जुमानील असं नाही, करुणेला ‘ओ’ देऊन बरसेलच असं नाही. तो आहेच मुळी लहरी… स्वच्छंदी! हल्लीच्या जमान्यात पैसा खोटा झाला आहे अन्‌‍ पाऊसही खोटारडा! पावसाच्या सरीवर सरी कोसळत राहाव्यात, छप्परावरून पाण्याच्या पागोळ्या अंगणी याव्यात, त्या प्रवाहित पाण्यात आपण कागदाच्या होड्या सोडाव्यात ही लहान मुलांची हौस असते. म्हणून मुलं ‘येगं येगं सरी, माझं मडकं भरी, सर आली धावून, मडके गेले वाहून…’ हे गीत आळवतात. त्यांची दया आली की ‘सरीवर सरी आल्या गं’ हे दृश्य पाहायला मिळतं. सरीवर सरी कौलारू छप्परावरती बरसतात तेव्हा छप्परावरून पाणी जोरात निसटून खाली अंगणी पडतं. त्याचं वर्णन करताना कवी म्हणतो ः
झाली छप्परे उदार, आल्या पागोळी अंगणी!
त्या पागोळ्या अंगणात आल्या की मुलांना अत्यानंद होतो. त्या पाण्यात कागदी होड्या सोडण्याची मौज लुटण्याची त्यांना संधी लाभते. पण पाऊस दयाघन बनून येईलच असे सांगता येत नाही. पाण्यानं मडकं भरून पिण्याच्या पाण्याची सोय तो करीलच असे नाही. पावसाच्या मनात आलं तर सरीवर सरी येऊन तो थांबेलच असंही नाही. धुंवाधार सतत बरसून उच्छाद मांडेल. पाण्याच्या पुरात लोकांच्या संसाराची मडकी वाहून जातील अन्‌‍ लोक बेघर होतील… असा हा पाऊस अनेकदा गरज भागविण्यापुरता हवा-हवासा वाटणारा, पण अक्राळ-विक्राळ रूप धारण करतो त्यावेळी नको-नकोसा वाटणारा. म्हणून ‘तू एकदाचा निघून जा’ म्हणून प्रार्थना करण्याचे प्रसंगही तो अनुभवायला लावतो.

पावसाची रूपं किती म्हणून वर्णावी! त्याचे नानाविध ढंग… लहरी पाऊस, स्वच्छंदी पाऊस, बेभान पाऊस, बेधुंद पाऊस, संततधार पाऊस, धुंवाधार पाऊस, अल्लड पाऊस, झिम्माड पाऊस, धुंवाधार पाऊस, रुसवा पाऊस, अबोला पाऊस, गर्जणारा पाऊस… तन-मन ओलेचिंब भिजविणारा, पर्णहीन वृक्षांना नवपालवीचं दान देणारा दयाघन, वसुंधरेला स्नान घालून नवचैतन्याना खुलविणारा- नटविणारा, बालगोपाळांचा आनंद द्विगुणित करणारा, शेतातील पिकांना नवसंजीवनी देणारा, तप्तपणा गिळून गारवा देणारा, शेतकऱ्यांमध्ये मातीतून सोने पिकविण्याची ईर्षा निर्माण करणारा, नाले-नद्यांना तुडुंब भरून प्रवाहित करणारा, रानावनातील पक्ष्यांना आनंद देणारा… असा हा पाऊस अवर्णनीय!
पाऊस कधी आगंतुक पाहुणा बनून येतो, तर कधी चाहूल देऊन इंगा दाखवतो. कधी लपाछपी खेळतो, तर कधी दांडी मारून ‘गूल’ होतो. त्याची रूपं वेगळी. रूबाब वेगळा. ढंग न्यारा. प्रेम आगळं-वेगळं आणि राग तर भलताच आगळावेगळा. पाऊस हा कित्येकांना चिकचिकीत वाटत असला तरी चराचराची ती मूलभूत गरज आहे. त्याची मौसमी हंगामाची वेळ होऊन गेली अन्‌‍ त्याचं येणं लांबणीवर पडलं तर पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण होतं. माणूस चिंताग्रस्त बनतो. पाऊस केव्हा एकदाचा येतो असे त्याला होऊन जाते.

पाऊस गरज भागविण्यापुरता पडतो तेव्हा त्याचं कौतुक होतं, आणि मर्यादा ओलांडून कोसळतो, उच्छाद मांडतो, थैमान घालून विविध प्रकारची हानी करतो तेव्हा तो नको-नकोसा होतो. ‘सगळीकडे पाणीच पाणी, पण पिण्यासाठी एक थेंबही नाही’ अशी लोकांची अवस्था तो करून सोडतो. म्हणून पावसाने समतोल राखावा असं माणसाला वाटतं.

सृष्टीचा- निसर्गाचा समतोल बिघडलाय. त्याचा परिणाम पर्जन्यराजावरही झाला तर नवल वाटू नये. निसर्गाचा समतोल बिघडतो त्यावेळी त्याचा प्रकोप होतो. मग तो पावसाच्या रूपानं असो, दुष्काळाच्या रूपानं असो किंवा भूकंपाच्या रूपात असो! हा समतोल कसा बिघडत गेला अन्‌‍ कोणी बिघडविला हा मोठा वादग्रस्त प्रश्न आहे. याला माणूसच सर्वस्वी जबाबदार जबाबदार असला तरी तो निसर्गालाच जबाबदार धरतो. मग कोणी कोणाचा समतोल राखावा असा प्रश्न उभा राहतो.

पाऊस पायांत चाळ बांधून रानावनात रिमझिमतो त्यावेळी जीवनातील रेशमकाळाची आठवण करून देतो. कधीकधी पाऊस सृष्टीशी, माणसांशी, पशुपक्ष्यांशी मौन धरतो… अबोला धरून त्याला चिंतातुर करून सोडतो. तेव्हा पावसाच्या धारांचं दर्शन तर घडत नाहीच, उलट माणसाच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागतात. अशा दडी मारून बसलेल्या पावसाला कवयित्री मंदा कदम यांनी केलेलं आवाहन मला आठवतं. त्या म्हणतात ः
ये सोड अबोला आता,
जा शिंपून अवघी धरती
हुंकार उद्याचा देती,
स्वप्नांची हिरवी पाती!
ऋतुबदलानंतर नव्यानं येणारा पाऊस नवतेची, निर्मितीची ग्वाही देतो. जगणं ही नुसती प्रक्रिया न राहता तो जीवनाचा छंद बनतो. पावसाच्या माऱ्यानं झाडांच्या पर्णांना छिद्रं पडतात. ती छिद्रं नसून पानांना फुटलेले ‘नवे डोळे’ असतात. जे पानांच्या बाबतीत तेच इतरांच्या. पाऊस नवनिर्मितीची बिजं पेरून जातो. त्या मातीतल्या नवबिजांतून ‘सोन्याचे दाणे’ पिकविणे हे माणसाच्या प्रबळ इच्छाशक्तीवर अवलंबून असते.
असा हा पाऊस मानव, वृक्षवल्ली, पशुपक्षी आदींच्या जीवनात जगण्याची नवी ईर्षा, नवी आशा निर्माण करतो. नवजीवनासाठी ऊर्जा देतो… जगण्याची नवी उमेद देतो, प्रसन्नता देतो आणि स्वच्छंदी जगण्याची प्रेरणा बनून जातो…!