स्त्री-सुरक्षा

0
9
  • अभिषेक बाळकृष्ण गाडगीळ
    साखळी- गोवा

काही दिवसांपूर्वी कोलकाता येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकाराने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. आधीच ज्वलंत व अतिशय कळीचा असलेला स्त्री-सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या विषयाच्या सर्व बाबींवर चर्चा होणे आवश्यक आहे.

स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार अतिशय निंदनीय आहेत व त्याबद्दल गुन्हेगारांना कडक शिक्षा झालीच पाहिजे. परंतु आपल्याला काही गोष्टी या आपल्या पातळीवर कराव्या लागतील. आपण कायम अशा वेळेस आपल्या सरकारवर, व्यवस्थेवर प्रश्न उठवतो. हे केलेच पाहिजे; पण नेमके आपण कुठे चुकतोय हे आपण समजून घेतले पाहिजे. नपेक्षा अशा समस्यांवर काही तोडगा निघणार नाही.

अशी एखादी घटना घडली की अनेकजण सर्वात आधी पीडितेवर सवाल उठवतात. तिच्या पेहेरावावर, कार्यक्षेत्रावर आणि घटनेच्या काळ-वेळेवर अनेक प्रश्न विचारले जातात. पण आपण हा गुन्हा करणाऱ्यांच्या मानसिकतेबद्दल कधी बोलणार आहोत की नाही? अशी मानसिकता कशी निर्माण होते? त्यामागे कोणत्या गोष्टी असतात? आपण खरेच मुलांना मुलींचा-महिलांचा आदर करायला शिकवतो का? तसे संस्कार करतो का? हे काही प्रश्न आपण स्वतःला विचारणे गरजेचे आहे. केवळ प्रश्न विचारून थांबणे पुरेसे नाही, तर आपल्या स्वतःच्या घरातून या गोष्टी अंमलात आणणे गरजेचे आहे. जर स्त्रीचा आदर करण्याचे संस्कार एखाद्या मुलाला घरातून मिळाले तर तो कोणत्याही स्त्रीवर वाईट नजरेने पाहणे तर सोडाच, तसा विचारसुद्धा करू शकत नाही. सार्वजनिक ठिकाणी महिलेला सुरक्षित वाटेल अशा काही गोष्टी आपण व सरकारी यंत्रणेने एकत्र येऊन केल्या पाहिजेत. आज तंत्रज्ञानाने फार प्रगती केली आहे. या कामासाठी आपण त्याचाही वापर नक्कीच करू शकतो. यासंबंधी अनेक तरतुदी, कायदे लागू करण्यात आले आहेत. त्यांची व्यवस्थित व अतिशय कडकपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. या सर्व प्रावधानांबद्दल महिलावर्गामध्येही जागृती करणे, त्यांना जागरूक करणे आवश्यक आहे.

वरील परिच्छेदातील मुद्यांना जोडून मला एक असा मुद्दा मांडायचा आहे, जो फार बोलला जात नाही. कदाचित हे बोलणे योग्य नसेल, परंतु मला त्याची गरज वाटते म्हणून मी हे धाडस करीत आहे. पुरुषांना स्त्रियांचा आदर करायला शिकवणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच स्त्रियांना त्या आदराचा योग्य मान ठेवणे शिकवले गेले पाहिजे. असेही निदर्शनास आले आहे की स्त्रियांसाठी असलेल्या कायद्यांचा काही स्त्रिया स्वतःच्या वैयक्तिक कारणासाठी दुरुपयोगही करतात. हेही तेवढेच चुकीचे आहे, जेवढे एखाद्या स्त्रीसोबत घडलेला गैरप्रकार. याविषयीसुद्धा जागृती होणे आवश्यक आहे.

आपल्याला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे झाली. अशा निर्घृण घटना समाजात अजूनही घडणे हे आपणा सर्वांसाठीच लज्जास्पद आहे. आता फक्त कोलकाता येथील घटनेबद्दल बोलायचे म्हटले तर त्या महाविद्यालय व रुग्णालयावर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एका जमावाने हल्ला करून त्या ठिकाणाची नासधूस केली. एक महिला मुख्यमंत्री असलेल्या राज्यात हे असे घडणे खरेच लज्जास्पद आहे. याआधीही अशा अनेक हृदयद्रावक घटना या प्रदेशात घडल्या आहेत. आपल्या देशातील विशिष्ट भागांमध्ये घडणाऱ्या घटनांवर पोटतिडकीने बोलणारी माणसे आज मूग गिळून गप्प का आहेत? कुठेही घडला तरी गुन्हा हा गुन्हाच असतो. मग हे असे निवडकपणे टीका करणे कशासाठी? कधी आपण राजकारण, स्वहित, जात, धर्म, प्रदेश या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन एखाद्या गुन्ह्याविरुद्ध आवाज उठवणार आहोत? कारण जोवर आपण वरील सर्व गोष्टींमध्ये अडकून पडू, तोवर काही या गोष्टी बदलणार नाहीत.
शेवटी माझे सर्व सरकारी यंत्रणांना आवाहन आहे की त्यांनी आपले काम चोख करून हे सिद्ध करावे की सर्वसामान्य नागरिक संकटसमयी न घाबरता त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो; अन्यथा जे काही होईल त्याला जबाबदार तेच असतील याचे भान ठेवावे.