स्टेट बँकेतील चोरीप्रकरणी तिघांना अटक

0
6

>> फरारी दोघांचा शोध सुरू

>> केरी-सत्तरी येथील घटना

उत्तर जिल्हा पोलिसांच्या कारवाईत केरी सत्तरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या व्यवस्थापकाचे अपहरण आणि चोरी प्रकरणाचा छडा लावण्यास यश प्राप्त झाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह आणखी दोघांना अटक करण्यात आली असून दोघेजण फरारी आहे. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या चोरी व अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार केरी येथील स्थानिक रहिवासी साहिल खान ऊर्फ नियाज हा आहे. अटक केलेल्या अन्य संशयितांमध्ये राजीव कुमार (बेती) व जितेंद्र कुमार (कुर्टी-फोंडा) यांचा समावेश आहे.

या बँकेतून चोरण्यात आलेल्या रकमेपैकी रोख ५.४९ लाख रुपये आणि ११०० ग्रॅम सोने हस्तगत करण्यास यश प्राप्त झाले आहे, अशी माहिती काल पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही चोरीची घटना १४ सप्टेंबरला रोजी सकाळी उजेडात आली.

चोरट्यांनी बँक व्यवस्थापकाचे अपहरण करून बँकेतील रोख ८.७४ लाख रुपये आणि ११०० ग्रॅम सोन्याचे दागिने पळविले होते. चोरट्यांनी चोरी केल्यानंतर पळून जाण्यापूर्वी अपहरण केलेल्या बँक व्यवस्थापकाला ओल्ड गोवा येथे रस्त्यावर सोडून दिले. सदर बँक व्यवस्थापकाने पणजी पोलीस स्थानकावर यासंबंधी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस तपासाला सुरुवात करण्यात आली. उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली डिचोली, फोंडा आणि पणजी विभागातील पोलीस अधिकार्‍यांनी या प्रकरणी योग्य पद्धतीने तपास करून १४ रोजी मध्यरात्री एका संशयिताला अटक करण्यास यश मिळविले. त्यानंतर काल १५ सप्टेंबर रोजी दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५.४९ लाख रुपये आणि ११०० ग्र्रॅम सोने, पिस्तुल, चाकू व अपहरणासाठी वापरलेली व्हॅन हस्तगत करण्यात आली, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक सिंग यांनी दिली. १३ सप्टेंबर रोजी बँकेचे व्यवस्थापक आपल्या दुचाकी वाहनावरून घरी जात असताना वाटेत एका मारुती व्हॅन गाडीने त्यांना अडवून मारुती व्हॅनमध्ये कोंबले. त्यानंतर संशयितांनी बँक व्यवस्थापकाला धाक दाखवून बँकेच्या कॅशिअरकडून कॅश विभागाची चावी आणून घेतली, असेही त्यांनी सांगितले.