25 C
Panjim
Saturday, October 24, 2020

सोबत

  • मीना समुद्र

परवा किच्‌किच् करत एक मध्यम आकाराचं माकड मांजरांमागे लागत बाल्कनीतून घुसून थेट घराच्या खोलीत गेलं होतं. माझं स्वयंपाकघरात काम चालू होतं. आवाज आला म्हणून बाहेर आले तर एक हुप्प्या पळाला आणि शूरवीर मांजरं अंगाची कमान करून, अंगावरचे आणि शेपटीवरचे केस फुलारलेल्या अवस्थेत सावध पवित्र्यात उभी होती…

अगदी परवापरवाचीच गोष्ट. सकाळीच पावसाच्या चारदोन लहानमोठ्या सरी बरसून गेल्या होत्या… आणि मग पाऊस उघडून छानसं ऊन पडलं होतं. खूप दिवस कोंदट, अंधारं, ओलं वातावरण असलं की श्‍वास घुसमटल्यासारखा वाटतो; पण मग उघडीप पडून ऊन पडलं की जरा मोकळं, प्रसन्न, आतूनच उजाडल्यासारखं वाटतं. पाखरं, पशुपक्ष्यांचीही तीच अवस्था होत असावी. कारण उन्हाची ती सोनेरी ‘जर’ अंगाला लावून घेत, पंख उघडून पक्षी यथेच्छ भरार्‍या मारत किलबिलत राहतात. इवली इवली फुलपाखरंही पानाफुलांभोवती गिरक्या घेत राहतात… आणि घरातली मांजरं त्यांची गंमत पाहायला, कधीकधी त्यांना मटकवायलाही बाहेर जाऊन उड्या मारत राहतात. घरातली ही मांजरंही पावसाळ्याच्या या दिवसांत तर उन्हाला हावरी आणि ऊबेला हळवी होत असल्याने एकेक करत बाहेर पळाली. कुणी फरशीवर, कुणी मातीवर, कुणी विटेवर उन्हाला बसली. थोडी गरमी वाढली तशी पोट, पाठ शेकत राहिली. एरव्ही घरात चुली असायच्या तेव्हा तिच्या शेजारी त्यांची बसायची ठरलेली जागा. आता विशेषतः पिल्लं फ्रीजच्या मागच्या बाजूला खोबणीत जाऊन ऊबेला बसतात, नाहीतर निवांत झोप काढतात. त्यांची मातामाऊलीच तिला पान्हा अनावर झाला की त्यांना तिथून हुसकून बाहेर काढते. कारण उबेला चटावलेली पिल्लं तिथून ढिम्म हलत नाहीत. कधी माता तोंडात माशाचा तुकडा घेऊन आली की त्या वासानं मात्र चटकन बाहेर येतात. त्यावेळी त्यांना बोलवणारा मनीचा आवाजही वेगळाच असतो. आमच्याकडं खायला मागतानाचं तिचं ‘म्यॅऊ’ वेगळंच असतं. कित्येक दिवसांच्या त्यांच्या सोबतीनं आता हे कळू लागलंय.

  • तर त्या दिवशीही ती पिल्लं अशीच कपड्यांच्या ढिगात, सोफ्यावर झोपलेली असताना मनीनं घराबाहेरून तो खास आवाज काढला. त्याबरोबर तिन्ही पिल्लं जागी होऊन टणाटण उड्या मारत बाहेर गेली आणि मनीच्या शेपटीशी खेळली. तिनं त्यांचं अंग चाटलं. त्या उन्हात त्यांना साफसूफ करून जणू आंघोळ घातली. आता पिल्लांना तर काय करू आणि काय नको असं झालं. ती आली की सतत तिच्या पोटाशी पिण्यासाठी ओंबणार्‍या पिल्लांना आता ऊब मिळाली, त्यामुळे ती आणखी खुशीत आली. झाडाची हलणारी पानं पकडायला पाहू लागली. वाकुडमानेनं त्यांच्याकडं टुकूटुकू पाहू लागली. सुरसुरत झाडावर चढून सरसरत खाली उतरून या कडेपासून त्या कडेपर्यंत उगीचच पळापळी खेळू लागली. मध्येच गरम फरशीवर त्यांची कुस्तीमस्ती चालू झाली. पिल्लं आसपासच आपापली खेळताना पाहत मनीमाऊही थोडी निर्भर होऊन सुटवंगपणे स्वस्थ बसली. हातपाय ताणून डोळे मिटून तीही ऊब अनुभवू लागली. घराबाहेरच्या त्या जागेतून कुत्र्यांची सतत ये-जा चालते. कधी एवढ्या घरांच्या, इमारतींच्या दाटीतही समोरच्या आवारातल्या चिकूच्या झाडावर माकडांची धाड पडते. कच्चे-पक्के चिकू पाडून टाकतात आणि त्यांची नासाडी करून टाकतात. किच्‌किच् करत एक मध्यम आकाराचं माकड मांजरांमागे लागत बाल्कनीतून घुसून थेट घराच्या खोलीत गेलं होतं. माझं स्वयंपाकघरात काम चालू होतं. खिस्‌फिस् खुर्र खुट् आवाज आला तेव्हा बाहेर येऊन पाहिलं तर एक हुप्प्या पळाला आणि शूरवीर मोठी दोन मांजरं आणि दोन पिल्लं अंगाची कमान करून, अंगावरचे आणि शेपटीवरचे केस फुलारलेल्या अवस्थेत सावध पवित्र्यात उभी होती. बाल्कनीच्या उघड्या दारातून आला तसा तो हुप्प्या गेला म्हणून बरं नाहीतर माझी काही धडगत नव्हती. कुत्रीही अशीच. छान खेळत असलेल्या पिल्लांवर उगीचच भुंकून मर्दुमकी दाखवतात. मग पिल्लं, त्यांची आई, बोकोबा, सगळी शेपटी फुलवून घरात पळून येतात. आता पिल्लं दीड-दोन महिन्यांची झाल्यानं धोके त्यांच्या लक्षात येतात. बेसावध असताना अंगावर धावून आली तर झटकन् घरात पळून येतात, नाहीतर कुत्र्यांना चढता येणार नाही इतक्या उंचीवर झाडावर चढून बसतात. पण अगदी लहान असताना अजाणपणी ती ‘हे कोण बाबा आलंय?’ अशा कुतूहलाने त्यांच्याजवळ जाऊन किंवा थोडी लांबून त्यांचं निरीक्षण करतात. त्यांनी कान हलवला किंवा जरा हळू ‘भुक्’ केलं तरी शेपटी फुलवून पळत येतात. त्यावेळी ‘म्यॅव म्यॅव’ही विसरून जातात जणू. आणि निःशब्द होतात.

आमच्या शाकाहारी घरात दूध, भात, पोळी, पावाचे तुकडे असलं अळणी खाऊन ती कंटाळतात बहुधा. आसपासच्या घरातून वास दरवळत असतात तेव्हा मोठी मांजरं बाहेर ताव मारून येतात आणि मनीमाऊली आपल्या पिल्लांसाठी उंदीर, कबूतर, माशाचा तुकडा असलं मसालेदार काहीतरी घेऊन येते आणि तो विशिष्ट आवाज काढून पिल्लांना बोलावते. मग ती सगळी त्याच्यावर तूटन पडतात आणि ती माऊली त्यांच्याकडे भरल्या मनाने पाहत राहते. आमचे लक्ष नसताना कुठल्यातरी कोपर्‍यात किंवा खुर्ची-सोफ्याखाली ही मेजवानी सुरू असेल तर त्यांना ती करू देणंच ठीक असतं, नाहीतर ती एवढीशी पिल्लं त्यांच्या वजनाचं ते सारं तोंडात धरून घरभर फिरत राहतात. त्यापेक्षा ती एकच जागा पुसलेली बरी. खातानाही एखादं वस्ताद पिल्लू त्या भक्ष्यावर पंजा ठेवून गुरगुरत स्वतःच सगळं मटकावायला बघतं, आणि दुसरी गरीब बिचारी होऊन थोडी लांबूनच त्याच्याकडे आशाळभूतपणे बघत राहतात.

एकदा अशीच तोंडात काहीसे घेऊन मनी घरात येणार तोच तिला बाहेरच फिरवलं, हाकलून लावलं आणि पिल्लांना उचलून बाहेर ठेवलं. पिल्लं ते आणलेलं खात असताना त्यांच्याकडे पाहत ती निमूट बसली तेवढ्यात कुठूनसं कुत्रं येऊन त्या खाण्यावर किंवा पिल्लांवर धाड घालणार एवढ्यात मनीमाऊ जोरकस खिर्र-फिस्-खिर्र करत त्याच्यावर धावून गेली तेव्हा त्या आडदांड कुत्र्यानं तिचे पाय तोंडात पकडून, तिला उलटी करून झोळीसारखं हलवत घेऊन जाताना पाहून त्या आवाजाने बाहेर आलेले आम्ही त्यावर ओरडून काठी भिरकावली तेव्हा ते तिला सोडून पळालं. सुदैवानं तिला जखम वगैरे झाली नव्हती. पिल्लं तर घाबरीघुबरी होऊन केव्हाच घरात पळाली होती.

आणि आत्ता परवा बोकोबा एका हात- दीड हात, बोटाएवढ्या जाड सापाशी खेळत असल्याचे शेजारणीने सांगितले. बाहेर जाऊन बघितले तर हलणार्‍या, शेपटी आपटणार्‍या, वळवळणार्‍या सापाला त्याने नख्यांनी टोचून टोचून रक्तबंबाळ आणि अर्धमेलं केलं होतं. एरव्ही सळसळणारं ते चैतन्य फाटक्या चिंधीसारखं, तुटक्या दोरीसारखं होऊन पडलं तेव्हा त्याला ह्यांनी काठीनं उचलून दूर फेकून दिलं. पण तो विषारी असला तर बोकोबा आणि खेळणार्‍या पिल्लाला काही होणार तर नाही ना या शंकेनं हैराण झालो तेव्हा शेजारीण म्हणाली, ‘‘मांजरं साप खात नाहीत. घरात येऊ देत नाहीत. त्याला अर्धमेलं करून सोडतात!’’ तेव्हा कुठे जिवात जीव आला!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

वजाबाकी

आयआयटी प्रकल्पावरून झालेल्या आरोप - प्रत्यारोपांनंतर अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी राज्यातील डॉ. प्रमोद सावंत सरकारचा पाठिंबा काढून घेतला. अर्थात, सत्तावीस आमदारांचे...

एटीएम चोरी : दिल्लीत तिघांना अटक

>> दिल्ली पोलिसांची धडक कारवाई >> संशयितांकडून रोख रकमेसह पिस्तूल जप्त आंबिर्ण सुकूर येथील युनियन बँकेचे...

देशभरात ४ एटीएमची टोळक्याकडून चोरी

पर्वरीतील एटीएम चोरीप्रकरणी अटक केलेल्या टोळक्याने देशभरात चार एटीएमची चोरी केल्याचे उघड झाले आहे. पर्वरी गोवा येथे एटीएम चोरी प्रकरणातील मुख्य संशयित...

खनिज वाहतुकीसाठी नवीन दर निश्‍चित

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आलेल्या एका बैठकीत राज्यातील खनिज माल वाहतुकीसाठी नवीन दर निश्‍चित करण्यात आला आहे. खनिज...

लाडली लक्ष्मी योजनेची उत्पन्न मर्यादा ३ लाख

राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजनेत दुरुस्ती केली असून या योजनेची उत्पन्न मर्यादा वार्षिक ८ लाखांवरून ३ लाख रुपयांवर आणण्यात आली आहे. यामुळे...

ALSO IN THIS SECTION

‘कोरोना’चा लढा कितपत यशस्वी?

प्रमोद ठाकूर राज्याची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पर्यटन व्यवसायाला हळूहळू चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात देशी पर्यटकांची संख्या...

मी तुझी मावशी तुला न्यावया आलें!

डॉ. सोमनाथ कोमरपंत ‘महाराष्ट्र-रसवंती’मधील लक्ष्मीबाई टिळकांची ही कविता भावनाप्रधान तर आहेच; पण ती त्या काळाच्या संदर्भात अधिक काहीतरी...

रेल्वेस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार

शशांक मो. गुळगुळे केंद्रसरकारने भारतीय रेल्वेचे टप्प्याटप्प्याने खाजगीकरण करण्याचा व भारतातील असंख्य रेल्वेस्थानकांपैकी पहिल्या प्रयत्नात सुमारे ५० रेल्वेस्थानकांचा...

तोरण

मीना समुद्र आपण फारसे पुढारलेले नसलो तरी चालेल; मनात मात्र तोरण अवश्य हवे. आपल्या सुसंस्कारांची, सुविचारांची फुले-पाने त्यात...

झुला… नवरात्रीचा

पौर्णिमा केरकर आज महामारीमुळे मंदिरांना भाविकांअभावी सुन्नता आलेली आहे… सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. असे असले तरी ऋतुचक्र...