सी.ए.ची गरज कोणाला?

0
16
  • शशांक मो. गुळगुळे

करदात्याच्या करविषयक प्रश्नांचे निरसन, कर वाचविण्यासाठीचा सल्ला व त्यासाठी कुठे गुंतवणूक करायची याचे मार्गदर्शन, करदात्याच्या उत्पन्नाचा आर्थिक आढावा, अडचणीचे किंवा किचकटीचे आर्थिक व्यवहार या बाबींसाठी सी.ए. हवा.

प्राप्तिकरसंबंधी कामे पूर्ण करण्याचे सध्याचे दिवस आहेत. पगारदारांनी त्यांचा प्राप्तिकर वाचावा, प्राप्तिकरात सवलत मिळावी म्हणून जी काही गुंतवणूक केली असेल, त्याचे पुरावे नोकरीच्या ठिकाणी देण्याचा हा कालावधी आहे. काही कर भरावा लागणारे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे एप्रिलनंतर योग्य गुंतवणूक कुठे करायची याचे नियोजन करतात, तर काही घाईघाईत शेवटच्या घटकेला गुंतवणूक करतात. परिणामी गुंतवणुकीचे निर्णय चुकीचेही ठरू शकतात. निर्णय चुकीचे ठरू नयेत, योग्य ठिकाणीच गुंतवणूक व्हावी म्हणून वित्तीय सल्लागार, कर-सल्लागार किंवा सी.ए. (चार्टर्ड अकौंटंट) यांची मदत घेता येते.

कित्येक जण कर किती भरावा लागणार, किती वाचू शकणार, कर वाचविण्यासाठी कुठल्या कुठल्या सवलती घ्यायच्या व शेवटी रिटर्न फाईल करणे ही कामे स्वतःच करतात. तुमच्या रिटर्न फायलिंगची प्रक्रिया सोपी असेल व तुम्हाला प्राप्तिकर कायद्याचे व्यवस्थित ज्ञान असेल तर अशाने स्वतः रिटर्न फाईल करावा. एखाद्याला बऱ्याच मार्गे उत्पन्न मिळत असेल, विविध मालमत्ता असतील, कॅपिटल गेन्स किंवा ‘लॉस’ यांचे व्यवहार असतील तर करविषयक आर्थिक नियोजनासाठी तसेच रिटर्न फाईल करण्यासाठी ‘सी.ए.’ची मदत घ्यावी.
सी.ए. कधी हवा?
एखाद्याच्या उत्पन्नाचे मार्ग बरेच असतील, ते म्हणजे- पगार, मिळणारे भाडे, कॅपिटल गेन्स, मिळणारा/मिळणारे लाभांश, वेगवेगळ्या मालमत्तांतून अल्प मुदतीचे किंवा दीर्घ मुदतीचे झालेले कॅपिटल गेन्स/लॉस, त्या आर्थिक वर्षात संपत्तीची विक्री किंवा खरेदी झाली असल्यास, वर्षभर सतत शेअर बाजारात व्यवहार होत असतील तर, परदेशात मालमत्ता असल्यास किंवा परदेशातून उत्पन्न मिळत असल्यास, ईएसओपी संबंधी करविषयक प्रकरण असल्यास, नातं नसणाऱ्यांकडून भेटी मिळालेल्या असल्यास, प्राप्तिकर विभागाकडून नोटीस आली असल्यास, तसेच करधारक सल्लागार किंवा फ्री लान्सर म्हणून काम करीत असल्यास अशांनी सी.ए.ची मदत घ्यावी. वर उल्लेखिलेल्या बाबी सामान्य माणूस स्वतःहून हाताळू शकणार नाही.
योग्य सी.ए. कसा निवडावा?
मित्रांना किंवा नातलगांना विचारावे, यातून चांगला सी.ए. मिळू शकतो. वित्तीय सल्लागारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून माहिती घ्यावी. बऱ्याच वर्तमानपत्रांत सी.ए. लेखन करतात. ते लेख वाचावेत व त्या लेखात लिहिलेला मजकूर तुमच्या आर्थिक व्यवहारांशी मिळताजुळता वाटत असेल तर अशा सी.ए.ची निवड करावी. सी.ए.चे इतर ग्राहकही तुमच्यासारखेच असल्यास त्या सी.ए.चा विचार करण्यास हरकत नाही. कोणताही सी.ए. हा सर्व विषयांतील ज्ञानी नसतो.

सी.ए.साठीचा साधारण खर्च
साधे प्राप्तिकर रिटर्न फायलिंगचे काम करून दिल्यास प्रत्येक करधारकामागे सी.ए. साधारणपणे रुपये पंधराशे ते रुपये चार हजार इतके शुल्क आकारतात. छोट्या शहरात छोट्या सी.ए. कंपन्या याहून कमी शुल्क आकारतात. व्हिडिओ कॉलवर सी.ए.ला करदात्याने काही शंका विचारल्यास 35 ते 40 मिनिटांच्या सल्ल्यासाठी/व्हिडिओ कॉल संभाषणासाठी सी.ए. रुपये एक हजार ते रुपये दोन हजार इतके शुल्क आकारतात. करविषयक सल्ले व फायलिंग रिटर्न यासाठी वर्षाला सी.ए. रुपये दहा हजार ते रुपये तीस हजार इतके शुल्क आकारतात. हे शुल्क दर पगारदारांसाठी आहेत. सी.ए.ला करविषयक प्रश्न विचारून आपल्या शंकेचे निरसन करून घेतल्यास, शंकेप्रमाणे सी.ए. उत्तर देण्याचे शुल्क आकारतात. करदात्यांना प्राप्तिकर कायद्यातील सर्व तरतुदी माहीत नसतात. प्राप्तिकर कायद्याचा तेवढा अद्ययावत अभ्यास नसतो. अशावेळी सी.ए.चीच मदत लागते. उदाहरण द्यायचे तर कॅपिटल गेन्सवर ‘ॲडव्हान्स’ कर भरावा लागतो. तो जर भरला नाही तर व्याज आकारले जाते. बँका ठेवींवरील व्याजावर फक्त टीडीएस (टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स- मूलस्रोत कर कपात) 10 टक्के कापतात. ज्यांचे उत्पन्न जास्त आहे व ज्यांना करआकारणी वरच्या ब्रॅकेटनुसार होते अशांनी ॲडव्हान्स टॅक्स भरायला हवा, नाहीतर व्याज आकारले जाते. वरिष्ठ नागरिकांना ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागत नाही. त्यांना कायद्यात सुट देण्यात आलेली आहे. ईएसओपी व्यवहारात दोनदा कर भरावा लागतो. प्रवेश करताना तसेच विकताना ईएसओपी जर भारतातील लिस्टेड कंपनीची असेल तर ती परदेशी मालमत्ता गणली जाते व प्राप्तिकर रिटर्नमध्ये हे नमूद करावे लागते. अशा प्रकारची ईएसओपी विकली नसेल, ‘होल्ड’ असेल तरी प्राप्तीकर रिटर्नमध्ये समाविष्ट करावी लागते. सोने, शेअर, प्रॉपर्टी यांचे अल्पमुदतीचे किंवा दीर्घ मुदतीचे कॅपिटल गेन्स/लॉस यांची मोजणी करणे थोडेसे किचकट स्वरूपाचे काम असते. या अशा व्यवहारांसाठी सी.ए.ची मदत घेणे योग्य ठरते. बरेच करदाते नातलगांच्या किंवा मित्रांच्या शिफारसीनुसार सी.ए. निवडतात. सी.ए. कधीही बदलण्याचा निर्णय करदाता घेऊ शकतो. सी.ए.ची निवड शक्यतो ‘ऑनलाईन’ करू नये. करदाते म्युच्युअल फंड वगैरेत गुंतवणूक वित्तीय सल्लागाराच्या मदतीने करतात. परिणामी वित्तीय सल्लागार चांगल्या सी.ए.चा पर्याय ठरवू शकतो. सी.ए.ची निवड करण्यापूर्वी त्याच्याशी बोलावे व तुम्हाला सी.ए.ची गरज कशासाठी लागत आहे ते त्याला सांगावे व जर तुम्हाला वाटले हा सी.ए. तुमच्या गरजेनुसार आहे तरच त्याची निवड करावी. सी.ए.चे कार्यक्षेत्र विचारात घ्यावे. समजा सी.ए. किरकोळ दुकान मालक किंवा छोटे उत्पादक यांची कामे प्रामुख्याने करीत असेल, त्याच्याकडे या ग्राहकांची संख्या जास्त असेल, तर पगारदारांनी असा सी.ए. न निवडता ज्यांचे पगारदार ग्राहक जास्त आहेत असा सी.ए. निवडावा. सी.ए. निवडताना तो किती फी आकारणार हे निश्चित विचारावे. खिशाला परवडणाऱ्याच सी.ए.ची निवड करावी. या देशात डॉक्टर, वकील, सी.ए. व अल्प स्वतंत्र व्यावसायिक यांनी किती फी आकारावी याबाबतचे नियम नाहीत व अशा बऱ्याच व्यक्ती त्यांचे खरे उत्पन्न जाहीर न करता, प्राप्तिकरही कमी भरतात असे बऱ्याच भारतीयांचे त्यांच्याबद्दलचे मत आहे.
करदात्याच्या करविषयक प्रश्नांचे निरसन, कर वाचविण्यासाठीचा सल्ला व त्यासाठी कुठे गुंतवणूक करायची याचे मार्गदर्शन, करदात्याच्या उत्पन्नाचा आर्थिक आढावा, अडचणीचे किंवा किचकटीचे आर्थिक व्यवहार या बाबींसाठी सी.ए. हवा.

ज्यांना करसल्ला ऑनलाईन हवा असेल तर ही सेवा पुरविणाऱ्या क्लिअर, इंडिया फायलिंग्ज, वकीलसर्च व अन्य काही कंपन्या आहेत. क्लिअर ही रजिस्टर ई-रिटर्न इंटरमिजीअरी (ईआरआय) कंपनी आहे. क्लीअर पोर्टलवर लॉगिंग करून या कंपनीच्या सेवा घेता येतात. ही कंपनी करदात्यांना रिटर्न फाईल कसा करायचा याचे प्रात्यक्षिक/मार्गदर्शन ऑनलाईन करते. या सेवा सशुल्क आहेत. बऱ्याच जणांच्या मते साधा प्राप्तिकर रिटर्न फाईल करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया, तर योग्य गुंतागुंतीच्या व्यवहारांसाठी ऑफ लाईन प्रक्रियाच चांगली. कर भरणा हे वैयक्तिक आहे, त्यामुळे सी.ए. हवा की नको हे स्वतः ठरवावे. कोणता सी.ए. चांगला हेही स्वतः ठरवावे. ऑनलाईन व्यवहार करावेत की करू नयेत हेही स्वतः ठरवावे.