सिक्वेरा यांच्या घरावर कॉंग्रेसचा मोर्चा

0
18

>> पुतळ्याचे दहन अन् फुटीर आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी

नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी कॉंग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी काल आंबोरा-राय येथील त्यांच्या निवासस्थानी निषेध मोर्चा काढला. यावेळी तेथे निषेध म्हणून त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी फुटीर आमदारांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या. तसेच त्यांनी आलेक्स सिक्वेरा यांना आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपच्या उमेदवारीवर पुन्हा निवडून येण्याचे आव्हान दिले.

कॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस यांच्या नेतृत्त्वाखाली गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक, अँथनी डिसिल्वा, झरिना डिकुन्हा, मोरेन रिबेलो, फ्रेंकी डिमिलो, सावियो डिसिल्वा यांच्यासह ५० हून जास्त कार्यकर्त्यांनी आलेक्स सिक्वेरा यांच्या घरावर मोर्चा काढला.

आलेक्स सिक्वेरा हे कॉंग्रेसच्या उमेदवारीवर नुवे मतदारसंघातून निवडून आले होते; पण मतदारांचा विश्‍वासघात करून स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी भाजपात प्रवेश करून जनतेचा विश्‍वासघात केला. त्याचा जाब विचारण्यासाठी आल्याचे व्हिरियातो फर्नांडिस यांनी सांगितले. कॉंग्रेसचे आमदार फुटणार नसल्याची शपथ त्यांनी देवासमोर घेतली होती, याची आठवण देखील त्यांनी करून दिली.

काल कॉंग्रेस कार्यकर्ते राय येथे निषेध मोर्चा काढणार असल्याचे वृत्त आधीच समजल्याचे पोलिसांनी सिक्वेरा यांच्या निवासस्थानाबाहेर कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी सिक्वेरा यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांना अडविले, त्यांना आत सोडले नाही.

कॉंग्रेसचा त्याग केलेल्या सर्व आमदारांच्या निवासस्थानी मोर्चा नेण्यात येणार असून, त्यांना जाब विचारण्यात येणार असल्याचे दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी सांगितले.