सायना, श्रीकांतसाठी कठीण ड्रॉ

0
117

>> ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन आजपासून

ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा आजपासून सुुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी सायना नेहवाल व किदांबी श्रीकांत या भारतीयांना किचकट ड्रॉ लाभला आहे. टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी त्यांना मागील वर्षी या स्पर्धेद्वारे कमावलेल्या ६६०० गुणांचा बचाव करावा लागणार आहे.

महिला एकेरीच्या पहिल्याच फेरीत बिगरमानांकित सायनाला जपानच्या तृतीय मानांकित अकाने यामागुचीच्या रुपात तगडी प्रतिस्पर्धी लाभली आहे. त्यामुळे पहिल्या फेरीचा अडथळा ती पार करणे शक्य वाटत नाही. तर श्रीकांतला ऑलिम्पिक विजेत्या चेन लॉंग याच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. टोकियो ऑलिंपिकसाठी क्रमवारीतील ‘टॉप १६’ खेळाडू पात्र ठरणार आहेत. सध्या सायना २२व्या तर श्रीकांत २१व्या क्रमांकावर आहे. एप्रिल अखेरपर्यंतचा वेळ या दोघांकडे आहे. ऑल इंग्लंडमध्ये सायनाला अपयश आले तरी यानंतर होणार्‍या इंडिया ओपनमध्ये भरपूर गुण मिळविण्याची संधी सायनाकडे आहे. या स्पर्धेसाठी तिला सोपा ड्रॉ लाभला आहे. श्रीकांतचे मात्र तसे नाही. मागील वेळा या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत श्रीकांतने मजल मारली होती. त्यामुळे ७८०० गुणांचा बचाव त्याला करावा लागेल.

ऑल इंग्लंड स्पर्धेचा विचार केल्यास यामागुचीला मागील काही महिन्यांपासून सातत्य राखता आलेले नाही. आपल्यापेक्षा सरस खेळाडूंवर विजय मिळविताना तिला खालच्या क्रमांकावरील खेळाडूंकडून धक्कादायक पराभवदेखील पत्करावे लागले आहेत. सायनाने यामागुचीचा अडथळा पार केल्यास दुसर्‍या फेरीत तिला जपानच्याच सायाका ताकाहाशी हिच्याशी दोन हात करावे लागेल. घोडदौड कायम राखली तर सायनासमोर स्पेनची कॅरोलिना मरिन असू शकते.

विश्‍वविजेती पीव्ही सिंधू अमेरिकेच्या बीवन झांगविरुद्ध आपल्या मोहिमेची सुुरुवात करणार असून ती किमान उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपांत्यपूर्व फेरीत तिला जपानच्या नाझोमी ओकुहाराशी झुंजावे लागू शकते. पुरुष एकेरीत साई प्रणिथ दुसर्‍या फेरीत चीनच्या शी यु की याच्याशी तर लक्ष्य सेन हॉंगकॉंगच्या ली चियुक लिव याच्याविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. कोरोना व्हायरसमुळे एसएस प्रणॉय, समीर वर्मा, सौरभ वर्मा, सात्विकसाईराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी, मनू अत्री, सुमीथ रेड्डी यांनी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुरुष दुहेरीत भारताची एकही जोडी नाही. महिला दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा-सिक्की रेड्डी, संजना संतोष-पूजा दांडू आपले नशीब आजमावणार आहेत. मिश्र दुहेरीत सिक्की रेड्डी व प्रणव जेरी चोप्रा यांच्यासमोर पहिल्याच फेरीत अव्वल मानांकित झेंग सी वेई व हुआंग या क्विआंग ही जोडी असेल.