सादिकच्या खून प्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक

0
26

>> आणखी काही जणांच्या सहभागाचा संशय

रुमडामळ-दवर्ली येथे काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या जामिनावर सुटलेल्या सादिक बेळ्ळारी याचा खून झाला होता. या खून प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी काल राहिल पानवाला याला अटक केली. या खून प्रकरणात मुख्य सूत्रधार हा तोच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी आतापर्यंत तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांसोबत आणखी कित्येक जण या प्रकरणात समाील असल्याचा पोलिसांना संशय आहे.

तीन वर्षांपूर्वी 2020 साली रुमडामळ-दवर्ली येथील भगवती कॉलनीमध्ये मुजाहिद खान याचा खून झाला होता. या प्रकरणात सादिक बेळ्ळारी व इस्माईल मुल्ला उर्फ छोटू या दोघांना अटक झाली होती. आता सादिकच्या खून प्रकरणी सुरुवातीला कादर खान आणि तौफिक कडेमानी यांना अटक झाली आहे. मुजाहिद खान हा कादर खान याचा सख्खा भाऊ होता. दुसरा संशयित तौफिक कडेमानी हा कादरचा मित्र आहे.

पोलीस तपासात या प्रकरणात आणखी जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार काल पोलिसांनी या खुनाचा कट रचल्या प्रकरणी राहिल पानवाला या मुख्य संशयितास अटक केली. आता हे तिघेही पोलीस कोठडीत आहेत.

या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे तपासात दिसून आल्याने पोलीस त्यांच्या शोधात आहेत. पानवाला हा बोर्डा येथे गॅरेज चालवित होता, तर तौफिक हा दुसऱ्या गॅरेजमध्ये कामाला होता. पानवाला हा मुजाहिदचा मित्र होता. हे सर्वजण एकाच खोलीत राहत होते. सादिक बेळ्ळारी हा जामिनावर सुटल्यानंतर त्याने आपल्या मित्रांना जंगी पार्टी दिली होती. त्यामुळे हे तिघेही संशयित संतापले होते, त्यातून त्यांनी हा कट रचला होता. या प्रकरणात पोलिसांनी भादंसंचे 120 (ब) कलमही जोडले आहे.