सलोखा राखा

0
9

महाराष्ट्रात अहमदनगरमध्ये संदलच्या मिरवणुकीत औरंगजेबाचे चित्र झळकवण्याचा झालेला प्रकार आणि कोल्हापुरात काही मुलांनी औरंगजेबाचे आणि टिपू सुलतानाचे व्हॉटस्‌‍ॲप स्टेटस ठेवण्याचा झालेला प्रकार या दोन्ही घटनांची परिणती काल कोल्हापुरात फार मोठा धार्मिक तणाव निर्माण होण्यात झाली. हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेला मोर्चा व ठिय्या आंदोलन, पाळला गेलेला कडकडीत बंद, त्यावेळी झालेली दगडफेक, गाड्यांची मोडतोड, मग जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना करावा लागलेला सौम्य लाठीमार आणि शेवटी संचारबंदीपर्यंतची वेळ येणे हे सगळे होण्यास राज्य सरकारकडून संबंधितांवरील कारवाईत झालेली दिरंगाईच कारणीभूत आहे. सदर प्रकार उघडकीस येताच तात्काळ संबंधितांचा शोध घेऊन त्यांना अटक झाली असती आणि त्यांच्या बोलवित्या धन्यांपर्यंत पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा गेली असती, सत्ताधारी नेत्यांकडून वातावरण शांत राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला असता, तर कोल्हापुरात काल जी संतप्त प्रतिक्रिया उमटली, ती वेळच आली नसती. अशा गोष्टींत तत्पर कारवाई झाली नाही तर काट्याचा नायटा व्हायला आणि परिस्थिती चिघळायला आणि ते लोण मग वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरायला वेळ लागत नाही. मुळात सध्या एकाएकी काही लोकांना औरंगजेबाचा पुळका कसा काय येऊ लागला आहे हे शोधण्याची गरज आहे. 350 वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात सर्वत्र साजरा होत असताना छत्रपतींच्याच महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचा शत्रू असलेल्या औरंगजेबाचे फलक जर मिरवले जाणार असतील आणि व्हॉटस्‌‍ॲपवर स्टेटस घातले जाणार असतील, तर त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटणारच. सरकारलाही त्याची पूर्वकल्पना यायला हवी होती. किंबहुना तशी प्रतिक्रिया उमटावी आणि दंगल भडकावी, धार्मिक ध्रुवीकरणाला चालना मिळावी यासाठीच तर कोणी हे उपद्व्यापक केलेले नाहीत ना याची सखोल चौकशी म्हणूनच झाली पाहिजे. सोशल मीडियाच्या काळात समाजामध्ये हे विष आणि वैमनस्य कालवायला परदेशातूनही सूत्रे हलवली जाऊ शकतात. त्याला काही अर्धवट माथ्याचे लोक सहज बळी पडू शकतात. त्यामुळे अहमदनगरमध्ये फकीरवाडा भागात रविवारी संदलच्या मिरवणुकीत औरंगजेबाचे चित्र असलेले फलक झळकवण्याचा जो प्रकार झाला, त्यांना तसे करण्यास कोणी चिथावले होते, त्यांचा त्यामागचा उद्देश काय हे कसोशीने शोधले गेलेच पाहिजे. औरंगजेबाचे आणि टिपू सुलतानाचे व्हॉटस्‌‍ॲप स्टेटस ठेवून आणि वादग्रस्त संदेश पसरवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नही मुलांच्या माध्यमातून कोणी केला, त्यामागचे हेतू काय हेही तपासणे जरूरी आहे. मुसलमान समाजातील तरुणांचे आणि मुलांचे रॅडिकलायझेशन करण्याचे जे पद्धतशीर प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहेत तेच ह्या सगळ्या प्रकाराला कारणीभूत आहेत. त्यामुळे पडद्यामागचे हेे बोलविते धनी कोण हे महाराष्ट्र सरकारच्या गुप्तचर विभागाने तत्परतेने शोधायला हवे होते, संबंधितांना लागलीच अटक व्हायला हवी होती. तशी ती झाली नाही, त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांना या घटनेचे निमित्त मिळाले आणि कोल्हापुरात कालचा उद्रेक झाला. हे टाळता आले नसते काय?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘औरंग्याच्या अवलादी’ वगैरे शेलके शब्द वापरत आपली प्रतिक्रिया दिली, तीही आक्षेपार्ह आहे. त्यांच्यासारख्या जबाबदार नेत्याच्या तोंडी ही असली भाषा शोभत नाही. काही माथेफिरूंमुळे सत्ताधारी पक्षातील जबाबदार नेत्याकडून संपूर्ण समाजालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा आणि त्यांच्याप्रती संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रकार कितपत योग्य? त्यातून भले राजकीय पोळ्या भाजल्या जात असतील, परंतु समाजामध्ये परस्परांविषयी अविश्वासाची आणि वैमनस्याची भावना वाढत जाऊन दूरगामी परिणाम करणारी जी तेढ निर्माण होईल त्याचे काय? समाजात असंतोष उफाळतो तेव्हा किमान नेतेपदावरील जबाबदार व्यक्तींनी धार्मिक सलोखा आणि शांतता निर्माण करण्यासाठी तत्पर पावले टाकणे अपेक्षित असते, उलट चिथावणीखोर वक्तव्ये करून आगीत तेल ओतणे नव्हे. कोल्हापूर ही छत्रपती शाहूंचीही भूमी आहे. ती सामाजिक न्याय, समतेची भूमी आहे. तेथील सामाजिक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न होता कामा नये. त्यामुळे वातावरण शांत करण्याचा आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा तातडीचा प्रयत्न सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून केला पाहिजे. सरकारनेही नुसती कारवाईची भाषा करून चालणार नाही. ती प्रत्यक्षात झाली पाहिजे आणि अशा प्रकारे झाली पाहिजे की पुन्हा असले उपद्व्याप करण्याची कोणाची प्राज्ञा होता कामा नये.