सरकारी शिक्षक भरती लवकरच सुरू : मुख्यमंत्री

0
19

>> पाचवी ते आठवीपर्यंत मूल्यवर्धन शिक्षण; नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह आहाराबाबत ऑक्टोबरपर्यंत निर्णय

राज्यातील सरकारी विद्यालयांमध्ये आवश्यक साधनसुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. सरकारी शिक्षक भरती लवकरच सुरू केली जाणार आहे. तसेच राज्यात पाचवी ते आठवीपर्यंत मूल्यवर्धन शिक्षण सुरू केले जात आहे. विद्यालयांतील रेमेडियल क्लासेसच्या नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार देण्याबाबत येत्या ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पणजीतील पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील सरकारी प्राथमिक मराठी शाळा बंद करण्याचे हेतू नाही, तर मुलांना आवश्यक साधनसुविधा देण्यासाठी शाळांच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव आहे. त्यासाठी पालक आणि शिक्षक यांच्याशी चर्चा सुरू आहे. शाळांच्या विलीनीकरणातून मुलांना मिळणार्‍या सुविधांची माहिती दिली जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. साखळी मतदारसंघातील सुर्ला येथील सरकारी विद्यालयांत नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, जवळच्या दोन प्राथमिक शाळांचे सरकारी माध्यमिक विद्यालयांत विलीनीकरण करून मुलांना साधनसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पहिली ते दहावीपर्यंतची मुले एकाच समूहामध्ये शिक्षण घेत आहेत. गावागावांतील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचा हेतू आहे. शाळांच्या विलीनीकरणाला केवळ विरोधासाठी विरोध करू नये, तर मुलांना मिळणारे फायदे जाणून घेतले पाहिजेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शांतीलाल मुथ्था फाउंडेशनच्या सहकार्यातून मुलांना मूल्यवर्धन शिक्षण देण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या शिक्षणामुळे प्राथमिक स्तरावरील मुलांनी ५०० माहितीवर्धक आणि कलात्मक पोस्टर तयार केले आहेत. तसेच, १५० व्हिडिओ तयार केले आहेत. पाचवी ते आठवी या वर्गासाठी मूल्यवर्धन शिक्षण देण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. माध्यमिक स्तरावर हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी मुथ्था फाउंडेशनकडून शिक्षकांना योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. मुलांना प्राथमिक स्तरापासून मूल्यवर्धन शिक्षण देणारे गोवा हे अग्रेसर राज्य असून, केंद्र सरकारकडून याची निश्‍चित दखल घेतली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

यंदापासून मुलांना मूल्यवर्धन शिक्षण

राज्यात पाचवी ते आठवी या माध्यमिक स्तरावर मूल्यवर्धन शिक्षणाला चालू शैक्षणिक वर्षापासून सुरुवात केली जाणार आहे. राज्यात वर्ष २०१६ पासून प्राथमिक स्तरावर मूल्यवर्धन शिक्षण दिले जात आहे.

ह्या मूल्यवर्धन शिक्षणाचा मुलांना मोठा फायदा होत आहे. मूल्यवर्धन शिक्षण या विषयावर येत्या सोमवार दि. १९ सप्टेंबर रोजी सर्व शाळांशी आपण व्हर्च्युअल पद्धतीने संवाद साधणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.