समाजविघातक शक्तींना राज्यात थारा नाही

0
5

>> स्वातंत्र्यदिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती; सामाजिक सलोख्यासाठी नागरिकांचे सहकार्य हवे

राज्यात समाजविघातक शक्तींना थारा दिला जाणार नाही. जाती-धर्माच्या नावावर नागरिकांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. राज्यात समाजविघातक प्रवृत्ती कार्यरत झाल्या असून, नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. राज्यातील सामाजिक सलोखा, एकोपा आणि शांतता कायम राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यपातळीवरील स्वातंत्र्यदिन सोहळ्यात बोलताना काल केले.

बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी कौशल्य शिक्षणावर भर दिला जात आहे. महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ कार्यान्वित करण्यात आलेली आहे. राज्य सरकारची सर्व कॅन्टीन अन्नपूर्णा योजनेखाली महिला स्वयंसाहाय्य गटांना चालविण्यासाठी दिली जाणार आहेत. महिला सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी महिला गटांना अल्प व्याजदरात कर्ज सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कौशल्य विकासासाठी 200 कोटी
‘स्वयंपूर्ण गोवा 2.0′ या उपक्रमातून कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत करण्यात येत आहेत. टाटा संस्थेशी सामंजस्य करार केलेला आहे. टाटा संस्थेकडून अंदाजे 156 कोटी रुपये खर्चून पाच औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात अत्याधुनिक साधनसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. राज्य सरकारकडून सुमारे 40 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना 19 डिसेंबरपर्यंत नोकऱ्या
राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या ज्या मुलांना अजूनपर्यंत नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. त्या सर्वांना येत्या 19 डिसेंबर 2023 पर्यंत सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. राज्यातील गेली कित्येक वर्षे कार्य करणाऱ्या सुमारे 65 गृहरक्षकांना कायद्यात सूट देऊन पोलीस दलात समाविष्ट करून घेण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.