सण-उत्सव ः ज्ञानभंडाराच्या राशी

0
22

योगसाधना- 625, अंतरंगयोग- 211

  • डॉ. सीताकांत घाणेकर

उच्चकोटीचा बुद्धिमान प्राणी म्हणजे मानव. प्रत्येकात पुष्कळ विविधता अन्‌‍ अनेक गूढांचा संचय असतो. हे सर्व समजण्यासाठी सुरुवातीला विषयाची जाणीव हवी. तद्नंतर चिंतन, अभ्यास… या अत्यंत कठीण विषयांवर सखोल मार्गदर्शन आहे ते आपल्या भारतातील तत्त्ववेत्त्यांचे. हे ज्ञानभंडार इतके विशाल आहे की ते आत्मसात करण्यास कित्येक जन्म लागतील.

सृष्टिकर्त्याने स्वतःच्या कल्पकतेने बुद्धीचा संपूर्ण व योग्य उपयोग करून एक सुंदर असे विश्व साकार केले. त्यातील विविध घटक सर्वांनाच परिचित आहेत- निसर्ग, जीवजंतू, कृमी-कीटक, पशू, प्राणी, पक्षी… त्यांत उच्चकोटीचा बुद्धिमान प्राणी म्हणजे मानव. प्रत्येकात पुष्कळ विविधता अन्‌‍ अनेक गूढांचा संचय असतो. हे सर्व समजण्यासाठी सुरुवातीला विषयाची जाणीव हवी. तद्नंतर चिंतन, अभ्यास… विश्वातील विविध तत्त्ववेत्त्यांनी आपापल्या परीने याचा अभ्यास, संशोधन केले. अनेक क्षेत्रांत त्यांचे योगदान आहे. पण यातील अत्यंत कठीण विषयांवर सखोल मार्गदर्शन आहे ते आपल्या भारतातील तत्त्ववेत्त्यांचे. हे ज्ञानभंडार इतके विशाल आहे की ते आत्मसात करण्यास कित्येक जन्म लागतील.

सर्वसामान्यांसाठी हे ज्ञान समजणे सोपे व्हावे म्हणून त्यांनी विविध कर्मकांडे, उत्सव यांच्या रूपाने ते समाजासमोर ठेवले. हल्लीच्या काही महिन्यांत या उत्सवांचा जणू पूरच आला आहे- श्रीगणेशचतुर्थी, श्रीकृष्णजन्माष्टमी, नवरात्री, दसरा आणि आता दिवाळी… त्यात वेगवेगळे घटक- नरकासुर दहन, दीपोत्सव, लक्ष्मीपूजन, तुलसीविवाह, भाऊबीज वगैरे…
आपल्यातील अनेकजण सुट्ट्या घेऊन हे सर्व सण मोठ्या उमेदीने साजरे करतात. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे फक्त कर्मकांड म्हणून, मौजमजेचे एक साधन म्हणून. त्यामागील तत्त्वज्ञान, भाव न समजता. त्यामुळे एवढा वेळ गमावून, एवढा खर्च करून, एवढे कष्ट घेऊन आपल्या ऋषी-महर्षींचे जे ध्येय होते त्यापासून आपण दूरच आहोत. प्रगती होण्याऐवजी अधोगतीकडे आपली घोडदौड वेगाने चालू आहे.
आपण हे ध्येय, तत्त्वज्ञान, भावार्थ थोडक्यात समजण्याचा प्रयत्न करू-

  • दीपावली ः दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव, ज्योतींचा उत्सव. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी आपण ज्योती पेटवतो, त्यावेळी म्हणतो- ‘तमसोऽमा ज्योतिर्गमय.’ समईमध्ये एकापेक्षा जास्त वाती असतात. कार्यक्रमातील प्रत्येक प्रतिष्ठित व्यक्ती एक-एक ज्योत पेटवते. हे फक्त कर्मकांड नाही तर त्याला भावार्थ व गर्भितार्थ आहे. ज्योत लावली की अंधकार निघून जातो. ज्योत हे ज्ञानाचे प्रतीक आहे. तामसिकपणा हा जीवनाचा अंधकार आहे. तो निघून जीवनात चैतन्य यायला हवे. ही ज्योत एकट्याने लावून उपयोगाचे नाही. कारण जीवनात अंधकार पुष्कळ आहे. त्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक व अपेक्षित आहे. कार्यक्रमासाठी स्टेजवर असलेल्या व्यक्ती ज्ञानी व प्रतिष्ठित असतात. अशा व्यक्ती इतरांच्या जीवनात प्रकाश आणू शकतात, त्यांची जीवनज्योत पेटवू शकतात.
    दीपावलीत तर असंख्य दिवे, आकाशदिवे असतात. हे ज्ञानाचे दिवे असा गर्भितार्थ आहे.
    दिवाळी जवळ आली की प्रत्येकजण आपले घर कानाकोपऱ्यातून साफ करतो. जसा केरकचरा बाहेर फेकला जातो, त्याप्रमाणे मनातील नकारात्मक विचार, भाव फेकून देणे हा गर्भितार्थ आहे. नाहीतर बाहेरून घर स्वच्छ दिसेल, पण कुुटुंबातील सदस्यांच्या अंतर्मनात वाईट विचार असतील तर उत्सवाचे सार्थक होणार नाही. त्यामुळे आपल्यातील कडवटपणा काढून टाकणे ही खरी आध्यात्मिक प्रगती ठरेल.
    दिवाळीच्या वेळी लहानथोरांना नवे कपडे आणतात. हे कपडे आकर्षक असतात. याचा अर्थ- राग, द्वेष, चिंता या अशा नकारात्मक भावना सोडून प्रेम, शांती, आनंद अशा सकारात्मक भावना मनात रुजवायच्या असतात. यामुळे त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसेल. ती व्यक्ती सर्वांचे केंद्रस्थान बनेल. ती व्यक्ती सर्वांची आवडती बनेल. ‘जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला’ म्हणूनच नवे आध्यात्मिक वळण आणण्यासाठी ही वेळ उत्तम आहे.
  • नरकासुर दहन ः हा कार्यक्रम तरुणपिढीचा आवडता बनला आहे. नरकासुर बनवण्यासाठी हे लोक त्याला कितीतरी वेळ देतात. स्वतःची कर्तृत्वशक्ती वापरून विविध तऱ्हेचे आकर्षक नरकासुर तयार करतात. वर वर बघितले तर यात वावगे काहीही दिसत नाही. पण वाड्यावाड्यांवर लहान-मोठे नरकासुर बनवले जातात तेव्हा एक सूक्ष्म विचार मनात येतो- वेेळेचा किती हा अपव्यय? त्यापेक्षा एक छोटासा नरकासुर पुरे होता. कारण नरकासुर हा मानवातील राक्षसी वृत्तीचे प्रतीक आहे. आपले षड्रिपू – काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अहंकार. त्यांच्यामुळे मानवाचा व मानवतेचा नाश होत आहे.
    आपल्या आसपास व चहूकडे असे लहानमोठे नरकासुर दर क्षणाला दृष्टिक्षेपात येतात. जगात सुख-शांती हवी असेल तर अशा नरकासुरांना घडवण्यापेक्षा ती वेळ विधायक कामांसाठी आपण वापरू शकतो. तसेच त्याला जाळून त्याची राख करणे याचा गर्भितार्थ म्हणजे आपल्यातील विकारांना संपवून टाकणे.
    त्याशिवाय काही वाईट गोष्टीदेखील आहेत.
  • समाजाकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने पैसे गोळा करणे. त्यातील काही धनाचा उपयोग दारू पिण्यासाठी करून धागडधिंगा घालणे.
  • प्रतिमा जाळल्यानंतर जो धूर बाहेर निघतो त्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण अत्यंत घातक असते.
  • सबंध दिवस व रात्र मोठमोठ्याने लाऊड स्पीकरवर सिनेमातील विविध गाणी चालू असतात. त्यामुळे सर्वांनाच उपद्रव होतो. पण मुख्य म्हणजे वृद्धांना, लहान मुलांना, आजारी व्यक्तींना जास्त त्रास होतो. त्यापेक्षा भक्तिसंगीत लावले तर वातावरण प्रसन्न राहील.
    तसेच नरकासुर बघायला कुटुंबाची कुटुंबे विविध तऱ्हेच्या वाहनांनी रात्रभर फिरत असतात. त्यामुळे रहदारीचा त्रास होतोच, पण प्रदूषणदेखील भर घालतो. थोड्या ठिकाणी श्रीकृष्णाची लहान प्रतिमा बनवून नरकासुरावर बाण सोडतात. पण सहसा कृष्णाकडे कुणाचे लक्ष जात नाही. फटाके व आतषबाजी काही दिवस आधी सुरू होते. त्यामुळेदेखील वातावरण प्रदूषित बनते.
  • अभ्यंगस्नान ः नरकासुर दहनाचा कार्यक्रम झाल्यावर स्नान करण्याचा कार्यक्रम असतो. यावेळी सुगंधित उटणे अंगाला लावले जाते. याचा अर्थ म्हणजे आता यापुढे मी सुगंधी सद्गुणांचे आचरण करीन. उदा. पवित्रता, प्रेम, शांती, आनंद…
  • कुटुंबातील ओवाळणी ः घरातील महिला पुरुषांना व तरुणांना ओवाळतात. त्यावेळी दृष्ट काढण्याचेदेखील एक छोटेसे कर्मकांड असते. पूर्वीच्या एकत्रित कुटुंबात हा कार्यक्रम आनंददायक असायचा.
  • मेजवानी ः तद्नंतर सर्व सदस्य एकत्र बसून विविध तऱ्हेच्या जिन्नसांचा आस्वाद घेतात. येथे पोह्याचे अनेक पदार्थ बनवले जातात. त्याशिवाय चण्याची उसळ, गोव्यातील प्रसिद्ध आंबाड्याचे सासव, तसेच विविध तऱ्हेची मिठाई- याचा गर्भितार्थ म्हणजे आयुष्यात गोडवा असू दे. परस्परांतील संबंध गोड असूदेत. त्यामुळे कुटुंबात, समाजात शांती नांदेल.
  • लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी नवे वर्ष मनवतात. त्यावेळी हिशेबाच्या जुन्या वह्या बाजूला ठेवून नवीन वह्यांची पूजा करतात. तसेच आपणदेखील जुने हिशेब संपवून (नकारात्मक) नवे हिशेब (सकारात्मक) सुरू करू शकतो. भूतकाळात झाले ते विसरून जायचे, क्षमा करायची आणि नवीन जीवन सुरू करायचे.
  • मंदिर भेट- जिथे मंदिर जवळ असते तिथे कुटुंबातील सदस्य जाऊन भगवंताला नमस्कार करून येतात. त्यावेळी देवाला सांगायचे असते ः
  • मी माझ्यातील राक्षसी वृत्तींना जाळून टाकले आहे.
  • माझ्या अंतर्मनात सकारात्मक दिव्य आत्मिक गुण- ज्ञान, सत्य, प्रेम, शांती… सदैव राखण्याचा मी प्रयत्न करीन. मी पवित्र जीवन जगेन.
  • माझ्या या नवीन अवताराला देवा मला आशीर्वाद दे.
    असे घडले तरच आपण एकमेकांना ‘शुभ दीपावली’ म्हणतो याला अर्थ आहे.