संशय कायम

0
17

बाणस्तारी अपघात प्रकरणातील वाहन नेमके कोण चालवत होते यासंबंधी अद्याप ठोस पुरावा समोर आलेला नसला, तरी ते चालवत असल्याचा संशय असलेल्या महिलेची पाठराखण मात्र पोलीस अतिशय सक्रियपणे करीत असल्याची जनभावना वाढतच चालली आहे. दिवाडीच्या नागरिकांनी तिच्या अटकेसाठी पोलीस स्थानकावर धाव घेतली, तेव्हा बारा तासांत तिच्या अटकेचे वायदे करणाऱ्या पोलिसांनी गुपचूप तिच्या घरी जाऊन तिचा जबाब घेतला. हा जबाब घेण्याचे कारणही एवढेच की, ‘पोलिसांनी जबाब घेतला असल्याने आता तिच्या अटकेची गरज नाही’ हे तिच्या वकिलांना अटकपूर्व जामीन अर्जावेळी न्यायालयात सांगता यावे. तोच मुद्दा अटकपूर्व जामीन अर्जात न्यायालयात मांडला गेला. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी पुरेशी उसंतही पोलिसांनी तिला मिळवून दिली. अपघात झाला तेव्हा तेथे हजर असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी हे वाहन महिला चालवत होती अशी साक्ष त्याचवेळी वृत्तवाहिन्यांना आणि नंतर पोलिसांनाही दिलेली असूनही पोलीस मात्र ते मानून घ्यायला तयार नाहीत! बरे, हे वाहन तिचा नवराच चालवत होता याची एवढी खात्री पोलिसांना असेल तर त्यासंबंधीची एखादी सीसीटीव्ही फुटेजही ते का सादर करू शकत नाहीत? केवळ काही साक्षीदार पुढे केले म्हणजे ते वाहन नवरा चालवत होता हे सिद्ध होऊ शकत नाही. अपघात घडला तेव्हा प्रत्यक्षदर्शी जर महिला वाहन चालवत होती असे ठामपणे सांगत होते व तीच चालकाच्या आसनावर बसलेली दिसत होती, तर वाहनात दारूची बाटली आढळलेली असल्याने तिचीही मद्यप्राशनाची चाचणी करून जबानी नोंदवली जाणे आवश्यक होते. पोलिसांनी ते अजिबात केले नाही, कारण काहीही झाले तरी या राजकन्येला या अपघात प्रकरणात अडकवायचेच नाही असा चंगच जणू पोलिसांनी बांधलेला असावा. अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी सदर महिलेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अद्याप निवाडा दिलेला नाही, परंतु तिला तूर्त अंतरिम जामीन मिळालेला आहे. अटक जरी झाली तरी वीस हजार रुपयांच्या हमीवर व तितक्याच रकमेच्या हमीदारावर तिची सुटका व्हावी असेही सदर आदेशात म्हटले आहे. हा विषय न्यायप्रवीष्ट असल्याने आम्ही त्यावर भाष्य करू इच्छित नाही, परंतु एकाच गुन्ह्यासाठी दोघांना अटक कशी होऊ शकते हा मुद्दा या अपघात प्रकरणात आता पुढे येईल. सदर महिलेचे आजारपण व शस्त्रक्रिया, तिच्या नावावर गुन्हे नाहीत वगैरे युक्तिवाद वकिलांनी केले आहेत. वास्तविक, ज्या वाहनावर तब्बल सातवेळा वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचे चलन बजावण्यात आले आहे, ते तिच्याच मालकीचे आहे, त्यामुळे ते तिचेच गुन्हे ठरतात. या प्रकरणात पोलीस अटकपूर्व जामीनाला विरोध करणार नाहीत हे तर स्पष्टच आहे.
या अपघात प्रकरणात पुढे काय घडेल याचाही अंदाज आतापर्यंतच्या घडामोडींतून येतो. नागरिकांच्या दबावामुळे या अपघात प्रकरणात चालकावर भारतीय दंड संहितेच्या कलम 304 खाली गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. सदर गुन्हा 304 ऐवजी 304 (अ) मध्ये बदलण्याचा जोरदार प्रयत्न यापुढे होईल. कलम 304 खालील गुन्ह्यासाठीची शिक्षा दहा वर्षांची आहे व त्यात जन्मठेपही होऊ शकते. मुख्य म्हणजे हा गुन्हा दखलपात्र असल्याने अ-जामीनपात्र आहे. 304 (अ) हे कलम मात्र जामीनपात्र आहे आणि त्या गुन्ह्यासाठीची कमाल शिक्षाच दोन वर्षांची आहे. पोलिसांना ही चलाखी करता येऊ नये हे पाहण्याची जबाबदारी आता जागरूक नागरिकांची राहील, कारण या दुर्घटनेत तीन
निष्पाप माणसे बळी गेली आहेत. चार जायबंदी झाले आहेत. दोन तरुण मुलांनी आपले आई वडील गमावले आहेत. एका पित्याला आपला कर्तासवरता तरुण मुलगा गमवावा लागला आहे. एका कुटुंबावर आपल्या घरातील कर्त्या पुरुषाचे शरीर पाठीच्या कण्याला मार लागल्याने लुळे पडलेले पाहण्याची वेळ ओढवली आहे. 21 वर्षांची एक मुलगी जायबंदी तर झाली आहेच, आता तिला श्वसनाच्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. हे सगळे कोणामुळे? तर बेफिकीर बेवड्यांमुळे हे संकट ह्या सगळ्या कुटुंबांवर ओढवले आहे. त्यात ही बडी मंडळी आहेत. त्यामुळे जी जागरुकता आणि एकजूट सर्वसामान्य नागरिकांनी या प्रकरणात दाखविली आहे ती कायम ठेवणे आव्हानात्मक असेल. या प्रकरणात पैसे कमावण्याची संधी असल्याने अनेकजण लुडबूड करू शकतात. काही टोपी फिरवू शकतात. नवरा आता जामिनासाठी उच्च न्यायालयात गेला आहे, पण गुन्हा गंभीर आहे. ‘म्हातारी मेल्याचे दुःख नसते, पण काळ सोकावतो’ असे म्हणतात. बाणस्तारी अपघात हा नुसता एक अपघात नाही. गोव्याच्या रस्तोरस्ती जे मृत्यूचे थैमान चालते, त्याला पायबंद घालण्यासाठी हे एक उदाहरण ठरले पाहिजे!