संघ नव्हे, ‘तत्त्वभ्रष्ट यंत्रणा’ सोडली!

0
21
  • प्राचार्य सुभाष वेलिंगकर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्याचे संघचालक श्री. सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह संघाला रामराम ठोकला त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. कोणत्या परिस्थितीत संघातून बाहेर पडावे लागले, याविषयी वेलिंगकर यांनी ‘लोटांगण ः मातृभाषा आंदोलन व संघाचे घूमजाव’ या आपल्या पुस्तकात विस्ताराने सांगितले आहे. आज प्रकाशित होत असलेल्या त्या पुस्तकातील एक महत्त्वाचे प्रकरण.

अल्पसंख्याक लांगूलचालनासाठी मातृभाषा बचाव आंदोलनाशी विश्वासघात करून ‘यू-टर्न’ घेतलेल्या मनोहर पर्रीकरांनी, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या साहाय्याने ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’चे आंदोलन चिरडून टाकण्याच्या केलेल्या प्रयत्नात, भाजपाच्या दडपणाखाली संघाच्या यंत्रणेनेही आंदोलनाबाबत ‘यू-टर्न’ घेऊन साथ दिली. हा गोव्याच्या सामाजिक जीवनातील अत्यंत दुर्दैवाचा भाग होय!
सुभाष वेलिंगकरांना संघचालक पदावरून हटवून आंदोलन चिरडून टाकण्याच्या, स्वत:च मातृभाषेशी प्रतारणा केलेल्या पर्रीकरांच्या इराद्याला संघाने साथ दिली. एवढेच नव्हे तर त्यानंतर आंदोलनाकडे आणि इंग्रजी अनुदान हटविण्याच्या मागणीकडे पूर्णपणे कानाडोळा करून आणि त्यासंबंधी तोंडाने ‘ब्र’ही न काढता भाजपाची मर्जी राखण्याचा प्रयत्न केला.

वेलिंगकरांना पदमुक्त केल्याची अधिकृत माहिती वृत्तपत्रांना देण्यासाठी प्रांत संघचालक मा. सतीशजी मोढ यांच्या सहीने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’च्या मातृभाषेतून शिक्षणाविषयीच्या आंदोलनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा आहे व यापुढेही राहील असे म्हटले होते; परंतु भाजपाच्या दडपणापुढे नांगी टाकलेल्यांनी नीतिभ्रष्ट भाजपाची मर्जी राखण्यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या आंदोलनावर आजतागायत पूर्णपणे बहिष्कार टाकला असल्याचेच संपूर्ण गोव्याच्या निदर्शनास येत आहे.

त्याही पुढे जाऊन, जो-जो कार्यकर्ता भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या आंदोलनाशी जोडला गेल्याचे दिसले, त्या-त्या प्रत्येकाला संघजबाबदारीतून बाहेर फेकले गेले, ही वस्तुस्थिती आहे. भाजपाला नाराज करणारी कोणतीही गोष्ट करण्याचा धोका पत्करायचा नाही, हीच भूमिका आजपर्यंत 1 सप्टेंबर 2016 पासून संघाने घेतली आहे, हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे ‘मातृभाषा आंदोलनाला संघाचा पाठिंबा राहील’ या संघनिवेदनाला काहीही अर्थ राहिलेला नाही! त्यावेळी तसे जाहीर करणे हे ‘फेस सेव्हिंग’ होते.

1 सप्टेंबर 2016 रोजीची सर्व वर्तमानपत्रे काढून पाहिल्यास ही विसंगती आणि ‘फेस सेव्हिंग’ कुणाच्याही लक्षात येईल! भाजपाच्या प्रचंड दडपणाखाली हे सारे निर्णय घेत असताना संघाला हेही दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा होता, की आंदोलनात भाग घेण्याचे आणि त्याला पाठिंबा देण्याचे स्वातंत्र्य अजून संघाकडे आहे! ते स्वातंत्र्य संघाने कधीच गमावले हे आजपर्यंतच्या घटनांनंतर लख्ख प्रकाशाएवढे स्पष्ट झालेले आहे!

भाजपा कोणत्याही दिशेने जावो, कसलीही नीतिभ्रष्टता करो, विचारधारेशी गद्दारी करो, ते निमूटपणे संघ स्वयंसेवकांनी सहन करणे यालाच आता निष्ठावान, समर्पित संघकार्य मानले जाण्याची लाचारीची- संघात यापूर्वी कधीही नसलेली- परंपरा निर्माण झालेली आहे, हे या कृतीवरून लक्षात येते. ही संघ स्वयंसेवकांसाठी अत्यंत दुर्भाग्याची गोष्ट आहे. भाजपाला मान्य नसलेली कोणतीही गोष्ट संघाने, संघ स्वयंसेवकाने करता कामा नये, हा अलिखित दंडक सत्ताधारी भाजपाने संघावर लावण्याइतपत वचक त्यांनी निर्माण केला आहे.

वेलिंगकरांना संपवले की आंदोलन संपले, अशा गैरसमजुतीत असलेल्यांना, वेलिंगकरांना संघचालक पदावरून पदच्युत केल्यानंतरही आंदोलनाचा जोर उतरत नाही किंबहुना त्याची व्याप्ती व प्रखरता भाजपाच्या पाठिंब्याशिवायही 2017 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत कशी उत्तरोत्तर वाढत गेली, याचा अनुभव 21 आमदार संख्येवरून 13 वर आलेल्या भाजपाने व भाजपा-भक्त स्वयंसेवकांनी अनुभवलेला आहे. संरक्षणमंत्रिपदावर असूनही मनोहर पर्रीकरांचा ‘करिश्मा’ भाजपला तारू शकला नाही, ही वस्तुस्थिती!

केवळ संघचालक पदावरून वेलिंगकरांना हटवायला संघाला भाग पाडून भाजपा थांबला नाही! त्यानंतर भाजपाने 500 कार्यकर्त्यांचा एक मेळावा गोमंतक मराठा हॉलमध्ये घेतला. निवडणुका जवळ येत चालल्या होत्या. भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या आंदोलनाच्या वाढत्या तीव्रतेमुळे गर्भगळीत झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये अ-भयाचे वातावरण निर्माण करण्याची गरज भाजपाला वाटली होती. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या खांद्यावरून बंदूक डागण्यात आली आणि सर्वेसर्वा मनोहर पर्रीकरांना खूश करणारी गर्जना पार्सेकरांनी दिली.
‘कवचकुंडले काढून घेतली, आता वाट्टेल तसे शरसंधान करा!’ वेलिंगकरांचे ‘पद’ आम्ही काढून घेतले, आता त्यांच्यावर हवी ती टीका, आरोप करा, असा संदर्भ या घोषणेत होता. वेलिंगकरांशी आणि सिद्धांताशी एकनिष्ठ राहून भाजपासमोर लाचार न होणाऱ्या आंदोलकांबरोबर कायम राहिलेल्या कार्यकर्त्यांची केवढी धास्ती भाजपाने घेतली होती हे लक्षात यावे!

2017 च्या निवडणुकीत जनतेने भाजपाला 21 वरून 13 वरच केवळ आणले नाही, तर तत्त्वभ्रष्ट भाजपाच्या सात मंत्र्यांना घरी बसवले. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांचा हजारो मतांच्या फरकाने दारुण पराभव केला! मातृभाषा मराठी-कोकणीशी केलेला द्रोह महागात पडला होता!
आंदोलन मारून टाकण्यासाठी वेलिंगकरांची पदच्युती केली खरी, परंतु आंदोलनावर त्याचा काहीही परिणाम न होता ते प्रखर झाले, हे सिद्ध झालेच. वेलिंगकरांना पदच्युत केल्यानंतर आपण आंदोलनातील सर्व स्वयंसेवकांना आंदोलनातून बाहेर काढून गद्दार भाजपाच्या बाजूला आणू शकू, ही अटकळ पार चुकीची ठरली! गोव्यातील संघ स्वयंसेवकांची वैचारिक व सैद्धांतिक बैठक सामूहिकरीत्या दुर्गानंद नाडकर्णीसारख्या प्रचारकांनी एवढी मजबूत केली होती, की भाजपाच्या नादाला लागून संघयंत्रणेने स्वत:च्याच सिद्धांतांशी आणि मातृभाषांशी केलेली प्रतारणा स्वाभिमानी स्वयंसेवकांना सहन झाली नाही. संघात राहून लोकआंदोलनाची साथ देण्याची द्वारे बंद होती. कालपर्यंत संघ पूर्णपणे आंदोलनात आणि एका रात्रीत परिवर्तन होऊन दुसऱ्या दिवशी त्याच आंदोलनाच्या विरोधात, विरोधकांच्या कळपात; ही गोष्ट अनैतिक तर होतीच, परंतु गोव्यातील स्वाभिमानी, राष्ट्रवादी, मातृभाषाप्रेमी जनतेशी घोर प्रतारणा करणारी होती!

मातृभाषाप्रेमी स्वयंसेवकांना आंदोलनाची कास सोडायची नव्हती आणि संघात काम करून अंगी भिनलेली तत्त्वनिष्ठा, आचार, विचार, तत्त्वप्रणाली आणि मा. डॉ. हेडगेवार श्रीगुरुजी आणि बाळासाहेब देवरसांचे आदर्शही सोडणे सर्वथा नामंजूर होते. तातडीने करावयाचा पर्याय एकच होता- संघ स्वयंसेवकत्व न नाकारता भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या आंदोलनात पूर्वीप्रमाणेच झोकून देणे!

संघयंत्रणेने ‘सत्य’ सोडून भ्रष्ट, मातृभाषाद्रोही ‘सत्ते’ची साथ देणे स्वीकारले होते. बाहेर पडून किमान निवडणुकीपर्यंत तरी वेगळे व्यासपीठ निर्माण करणे हाच पर्याय होता. भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या आंदोलनात सक्रिय असलेले 95 टक्के संघ कार्यकर्ते बाहेर पडले! ते कुणाच्या ‘व्यक्तिपूजे’मुळे बाहेर पडले नाहीत. तसे म्हणणे ही वैचारिक दिवाळखोरी ठरेल! संघाने शिकविलेली, जीवनात मुरवलेली तत्त्वे आणि सिद्धांत प्रसंग येईल तेव्हा प्रत्यक्ष आचरणात, व्यवहारात आणावे लागतात हेच तर आम्ही शिकलो. मग ‘आज एक, उद्या एक’ हे तडजोडीचे तत्त्वज्ञान स्वयंसेवकाला मान्य तरी कसे व्हावे? ज्यांना ही तडजोड व राजकीय शरणागती रुचली नाही, पटली नाही, पचली नाही, त्यांना वेगळा मार्ग प्रशस्त करण्याशिवाय अन्य पर्याय भाजपाभक्त संघ स्वयंसेवकांनी व त्यांच्या यंत्रणेने शिल्लक ठेवलाच नाही.

मातृभाषा आंदोलनाशी एकनिष्ठ संघ कार्यकर्त्यांनी 1 सप्टेंबर 2016 रोजी सिद्धार्थ भवनात झालेल्या संघ विस्तारित सुकाणू बैठकीत स्वतंत्र युनिट, गोवा प्रांत संघ स्थापन करण्याचा एकमुखाने निर्णय घेतला. बैठकीनंतर तेथेच घेतलेल्या पत्रकार परिषदेत तो घोषित केला. संघ स्वयंसेवकांनी, कोकण प्रांत व केंद्रीय कार्यकारिणीने घेतलेल्या निर्णयांमुळे गोंधळून न जाता मातृभाषा-आंदोलनाशी आपण जोडलेलेच आहोत, याचा विश्वास पक्का करण्यासाठी 7 सप्टेंबरला घेतलेल्या बैठकीत, कमी कालावधी असूनही रविवार, 11 सप्टेंबर 2016 रोजी 1000 तरुण कार्यकर्त्यांचे लक्ष्य ठेवून एक मेळावा कुजिरा येथे योजण्यात आला. हा मेळावा मातृभाषा आंदोलन जिवंत ठेवण्यासाठी व कोकण प्रांत संघाने घेतलेल्या आंदोलनाविरोधी भूमिकेबद्दलची तीव्र नाराजी व्यक्त करण्यासाठी राज्यभरातील सर्व तालुक्यांतून उत्स्फूर्तपणे आलेल्या स्वयंसेवकांच्या उत्साहाने भारलेला झाला. 1000 चे लक्ष्य ओलांडून 1600 कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते. या मेळाव्यात एकमताने आणि ‘ॐ’च्या गजराने पारित करण्यात आलेल्या चार ठरावांत :

  1. भारतीय भाषा सुरक्षा मंचला बिनशर्त सक्रिय पाठिंबा.
  2. भाजपा सरकारच्या चर्चच्या प्राथमिक इंग्रजी शाळांना सरकारी अनुदान देण्याच्या निर्णयाचा निषेध.
  3. सुभाष वेलिंगकरांची संघ गोवा प्रांताच्या संघचालकपदी नियुक्ती.
    यांबरोबरच पुढील ठरावाचाही समावेश होता-
  4. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी यांचा आदर्श आम्ही सतत डोळ्यांसमोर ठेवून संघकार्य करण्याचा निश्चय करीत आहोत. परमपवित्र भगव्या ध्वजाला गुरू मानून हिंदू धर्म, हिंदू समाज व हिंदू संस्कृतीचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करीत आहोत. भगवा ध्वज उभारून संघाची ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ प्रार्थना म्हणून मेळाव्याची सांगता करण्यात आली.