श्रीरामनवमी : एक चिंतन

0
455

– उदयबुवा फडके
आज श्री रामांचा वाढदिवस, जन्मदिवस, रामनवमी. संतांचे, देवांचे वाढदिवस आपण जन्मोत्सव म्हणून साजरे करतो. रामनवमी हा तसा संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा उत्सव. बर्‍याच ठिकाणी हा उत्सव चैत्र नवरात्रोत्सव म्हणून साजरा केला जातो. आपण सारे भारतीय उत्सवप्रिय असल्याने वेगवेगळ्या निमित्ताने उत्सव साजरे करतो. अर्थात या जन्मोत्सवासाठी असं विधान करणं तसं चुकीचं ठरेल. कारण श्री रामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा जन्मोत्सव म्हणजे एका महापुरुषाची, एका आदर्शाची आठवण, पूजन किंवा स्मृती जागृत करणं, असा भाग आहे. श्री रामांना सातवा अवतार असं मानलं जातं. हे अवतार म्हणजे काय? माझ्या मते अवतार म्हणजे अवतरण, प्रकटीकरण प्रक्रिया; प्रगट होणं. या महापुरुषांना अवतार (ईश्‍वरी अवतार) असं का म्हटलं जातं? कारण ईश्‍वर या संकल्पनेविषयी आपल्या काही ठाम अशा कल्पना आहेत, व्याख्या आहेत. देव म्हणजे तो अमुक अमुक पद्धतीचाच असायला हवा. मग त्या व्याख्येत जो जो बसतो, त्याला त्याला आपण देवस्वरूप मानला. मग तो प्राणी जलचर असो, भूचर असो, पक्षी असो, मनुष्यप्राणी असो किंवा एखादी वस्तू असो. आपण त्याला भजतो. देवानं कसं असावं?- सर्वांचा रक्षणकर्ता, सर्वांना चांगलं ज्ञान देणारा, सर्वांना समान वागणूक देणारा, न्याय देणारा, स्वभावाने चांगला, लोकांसाठी झटणारा, आदर्शवत जीवन जगणारा तो देव. या परिभाषेत जो जो येतो त्याला आम्ही देव मानतो. अर्थात सगळेच गुण सगळ्यात असतातच असं नाही. पण चांगल्या गुणांचं पूजन, संगोपन, संवर्धन करणारी आपली संस्कृती असल्याने त्यातला एक गुणही असल्यास आपण त्याला देव समजतो.
देवाविषयीची व्याख्या, देवाची आपल्या मनातील संकल्पना जर वर उल्लेखलेल्याप्रमाणं असेल तर रामाला ‘श्रीराम’, ‘प्रभू रामचंद्र’ असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण त्या व्याख्येत ते व्यवस्थित बसतात. संस्कृतात एक वचन आहे-
‘जन्मना जायते शुद्रः संस्कारात् द्विज उच्चते|
वेदपाठी भवेत् विप्रो ब्रह्मजानाति ब्राह्मणः॥
याच न्यायाने एका सामान्य राजाच्या कुळात जन्माला आलेला एक राजपुत्र, देव ही पदवी प्राप्त करू शकतो कारण तो ‘जन्मना जायते शुद्रः’ असला तरी ‘संस्कारात द्विज उच्चते’ प्रमाणे त्याच्यावर झालेले संस्कार आणि त्याने आपल्या कष्टाने आपल्या जीवनाला दिलेला आकार यामुळे तो आदर्शवत ठरला. लोक त्याला देव मानू लागले.
कविवर्य बा.भ. बोरकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती’’. रामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याचं चरित्र आदर्शवत आहे. आचरणीय आहे. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. कारण त्यांनी कधीही कुठल्याही मर्यादेचं उल्लंघन केलेलं नाही. जो असं वागतो तो देव स्वरूपच होईल ना? शिर्डीचे साईबाबा, गोंदवलेकर महाराज, स्वामी समर्थ हेसुद्धा देवत्वाला पोचलेले होते.
श्रीरामांचं जीवन एक संघर्षमय प्रवास आहे. लहानपणात थोडं सुख मिळालं. थोडं म्हणजे किती? वसिष्ठांकडून विद्या ग्रहण करून घरी येईपर्यंतच. त्यांच्या राज्याभिषेकाचा मनसुबा दशरथ महाराजांनी आखला आणि त्यांच्यावर दुःख, अडचणी, त्रास याचा जणू धबधबाच कोसळला. पण माझं कसं होणार..? मी काय करू..? असं म्हणून रडत न बसता त्यांनी त्याही परिस्थितीत धीरोदात्तपणे सामोरं जायचं ठरवलं. त्यात कुठेही अविवेकीपणा नाही, अविचार नाही. आईवडिलांच्या वचनाचा अनादर नाही. कसलीही अपेक्षा नाही. राग, रुसवा, फुगवा नाही. कसलीही तक्रार न करता निमूटपणे सगळं स्वीकारलं. यालाच पुरुषार्थ म्हणायचं. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याच्या त्यांच्या वृत्तीनेच त्यांना या सगळ्यातून जायला सामर्थ्य मिळालं. ती माझी सावत्र आई म्हणून तिने मला ही आज्ञा दिली असावी, असा विचार न करता त्यांनी आपल्या आईला म्हटले, ‘‘माते, अगं मला वाईट नाही वाटलं. उलट तुझ्या या आज्ञेने मला माझा संपूर्ण देश पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.’’
हा त्यांचा दृष्टिकोन प्रत्येकाने आचरण करावा असा आहे. ‘‘मी एवढ्या मोठ्या राजाचा मुलगा, आता सगळं सोडून वनात कसा काय जाऊ? लोक काय म्हणतील?’’ हा विचार त्यांच्या मनाला कधीच शिवला नाही.
त्यांच्या जीवनात तशा चमत्कृती स्वरूपातल्या घटना अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच. त्यापैकी एक घटना म्हणजे अहिल्योद्धार! इथे बर्‍याच वेळा अशी चूक केली जाते ती म्हणजे श्री रामांचा पदस्पर्श झाला आणि शिलेचा उद्धार होऊन ती स्त्री बनली, असा उल्लेख केला जातो. मुळात असं होणं संभवतच नाही. पण साहित्यामध्ये अतिशयोक्ती हा अलंकार मानला जातो. मी समजा असं म्हणालो की मी एक साप पाहिला तर कोणाला त्याचं काहीच वाटणार नाही. पण तेच मी डोळे मोठ्ठे करून हात पसरून ‘‘एवऽऽढा मोठ्‌ठ्‌ठ्‌ठ्ठा साप पाहिला’’ असं बोललो तर लोक त्यानंतर हा काय सांगणार हे ऐकण्यासाठी कान टवकारतात. इथे अहिल्या उद्धाराची कथा थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करून पाहिली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की शिळा म्हणजे दगडासारखी मृतवत पडलेल्या स्त्रीला जागृत करण्याचं काम रामांनी केलं; जे अतिशय महत्त्वाचं होतं. यावरून त्यांच्या नेतृत्व व कर्तृत्वाची कल्पना येऊ शकते. तेच रावणानं अपहरण केलं. हे अपहरण जर अयोध्येत असताना झालं असतं तर सैन्य पाठवून त्याचा पाडाव करता आला असता. पण हे अपहरण वनवासात असताना झाल्यामुळे त्यांनी वानरांना (वनचरांना) जमवून सागरावर सेतू बांधून लंकेत जाऊन रावणासारख्या बलाढ्य; तंत्र-मंत्र-वैद्यक-अभियांत्रिकी यांसारख्या अनेक शास्त्रांत विशारद असलेल्या प्रबल शत्रूला मारून विजय प्राप्त केला आणि प्रयत्न केला तर काहीही अशक्य नाही, हा प्रयत्नवादाचा वस्तुपाठ सर्वांसमोर ठेवला. पुत्राचं कर्तव्य पार पाडून उत्तम पुत्र कसा असावा याचा आदर्श दिला. उत्तम बंधू बनून तीनही भावांना अप्रतिम मार्गदर्शन केलं. उत्तम पती म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलंच पण पत्नीच्या चारित्र्यावर कोणीतरी शंका उपस्थित केल्यावर तिचा त्यागही तेवढ्याच धीरोदात्त पद्धतीने केला. उत्तम प्रशासक म्हणूनही आज त्यांचं नाव घेतलं जातं. उत्तम राज्य म्हणजे रामराज्य, इतकं समीकरण होण्याइतपत अप्रतिम राज्य चालवलं.
एखाद्या राजाचा मुलगा एवढा मोठा होऊ शकतो, देव बनू शकतो हे मी सांगितलं तरी खरं वाटणार नाही. हल्लीच्या राज्यकर्त्यांचे युवराज क्रिकेट खेळतात. युवराज्ञी सिनेमात काम करतात आणि अजून एक म्हणजे राजकारणात लुडबुड करतात. हल्ली विश्‍वविक्रमांची नोंद करणारी पुस्तकं(गिनीज बुक असो किंवा लिम्का बुक अथवा मनोरमा बुक ऑफ रेकॉर्ड असो) कसले विक्रम नोंद करतात? कोण जास्त हसला? कोण जास्त रडला? असे विक्रम नोंदवून आपण समाजाला कसले आदर्श दाखवत आहोत? उद्या जर कोणी जास्त खून केले किंवा अनेक वर्षे अतिरेकी कारवाया केल्या त्याचा तपशील विक्रम म्हणून नोंद झाली तर आश्‍चर्य वाटायला नको. या सार्‍या पार्श्‍वभूमीवर श्रीरामांचं चरित्र व चारित्र्य खरंच विक्रम म्हणून नोंद करावी असंच आहे. एक राजकुमार कसलीही साधनसुविधा नसताना, अयोध्येतून (उत्तर प्रदेश) पार श्रीलंकेपर्यंत जातो, वनचराच्या साहाय्याने लढाई करून ती जिंकतो आणि ते राज्य मनात कसलीही आशा, अपेक्षा न ठेवता ज्याला पराभूत केला त्याच्याच भावाला देतो आणि निरिच्छ भावनेने परत येतो. वाल्मिकी रामायणात दोन गोष्टींचा विशेष उल्लेख सापडतो-१) धर्माची (कर्तव्याची) व्याख्या २) मातृभूमीवरचं प्रेम. धर्माची व्याख्या करताना महर्षी वाल्मिकी म्हणतात-
‘‘धारणात् धर्ममित्याह धर्मेण विघृतः प्रजाः|
यस्या धारयते सर्वं त्रैलोक्यं सचराचरेत॥
– आपल्या धर्माचे म्हणजेच कर्तव्याचे पालन केल्यानेच प्रजा सुसंघटित होते. जी प्रजा ते धारण करते (कर्तव्य पालन करते) ती त्रैलोक्यात, चराचरात सुसंघटितच कायमस्वरूपी राहते.
मातृभूमीबद्दलचं प्रेम व्यक्त करताना श्री रामांच्या तोंडी मोठा सुरेख श्‍लोक वाल्मिकींनी दिला आहे-
‘‘अपि सुवर्णमयी लंका न मे लक्ष्मणा रोच्यते|
जननी जन्मभूमीश्‍च स्वर्गादपि गरियसी॥
लक्ष्मण आपल्या दादाला विचारतो, ‘‘दादा, अरे आपण राज्य जिंकून घेतलं आहे, मग त्यांना का द्यायचं?’’ श्रीराम सांगतात, ‘‘आपण हे राज्य जिंकलं हे खरं, पण आपण राज्याचा विस्तार करण्यासाठी चढाई केली का? नाही. आपण केवळ दुष्प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी चढाई केली. दुष्ट प्रवृत्तीला तिलांजली मिळाली. आपलं काम संपलं. हे राज्य त्यांचं त्यांना देऊन टाकू या’’. त्यावर लक्ष्मण म्हणतो, ‘‘दादा अरे, हे राज्य सोन्याचं आहे. आपल्याकडे ठेवलं तर आपणालाच फायदा होईल. यावर वरील श्‍लोक लक्ष्मणाला श्रीराम ऐकवतात. ते म्हणतात, ‘‘लक्ष्मणा ही सुवर्णमयी नगरी असेल पण ती मला रुचत नाही, आवडत नाही, मला माझी जन्मभूमी स्वर्गापेक्षाही प्रिय आहे.’’
अशा प्रकारचे विचार श्रीरामच देऊ शकतात. कारण ते मानव देहधारी असूनही देवत्वापर्यंत पोचलेले आहेत. म्हणून तर राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी असं सांगतात, ‘‘राम गावा, राम ध्यावा| राम जीविचा विसावा|’’ समर्थांनी श्रीरामांचा आदर्श सर्वांनी घ्यावा म्हणून जागोजागी श्रीरामाची व हनुमंताची मंदिरे उभी केली. ते कधी पंढरपूरला जात नसत. एकदा अति आग्रह झाल्यामुळे ते पंढरपुराला गेले. तिथे ते विटेवरचे परब्रह्म पाहून आनंदी होण्याऐवजी दुःखी झाले. त्यांनी त्या विठुरायालाच विचारले, ‘‘इथे का रे उभा श्रीरामा| मनमोहना मेघश्यामा|’’ त्यांच्या म्हणण्यानुसार इथे कटीवर हात धरणार्‍या देवापेक्षा हाती धनुष्यबाण घेणार्‍या रामाची जास्त आवश्यकता आहे. राम हे काय, हे त्यांनी जाणलं. म्हणून त्यांनी स्वतःला रामदास म्हणवून घेतलं. त्यांनी श्रीरामांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला. श्रीरामांचे द्रष्टेपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून त्यांना जाणवत होतं. आम्हाला मात्र श्रीरामांचं काहीच आवडत नाही. मुळात अयोध्येत जन्म झालाच नाही इथपर्यंत आपण पोचलो. तो सेतू बांधलाच नाही असं म्हणूनसुद्धा आम्ही मोकळे झालो. नासाने त्या सेतूच्या संदर्भात एक छायाचित्र प्रसिद्ध केलं. त्यानंतर ते सगळ्यांना पटलं. नासाने जे दुर्बिणीतून छायाचित्र काढलं त्या पुलाची लांबी ३० किमी आहे. संपूर्ण जगाच्या इतिहासात मानवाने एवढा लांब पूल बांधल्याचं उदाहरण कुठेही नाही. या पुलाची निर्मिती सुमारे १७ लाख ५० हजार वर्षांपूर्वी झाली, असे नासाचे म्हणणे आहे. रामायणाचा कालही त्रेतायुगात म्हणजे सुमारे साडेसतरालाख वर्षांपूर्वीचाच आहे. रामेश्‍वर ते मन्नार या दरम्यान जी फेरीबोट चालते तिथे तो समुद्र अगदी तीन ते चार फूट इतकाच खोल आहे. रामेश्‍वरला पाण्यात तरंगणारे दगड सापडतात (इटाव्याच्या संस्कृत विद्यापीठाच्या वस्तुसंग्रहालयामध्ये आजही तो पहायला मिळतो.)
ते टाकून तिथे पूल बांधण्यात आला हे सगळं माहिती असूनही आम्ही ते मानत नाही. असो. प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी केलेलं संशोधन, घेतलेले कष्ट याची कल्पना या पुलावरून येऊ शकते.
थोडक्यात असं की श्रीराम हे असे एक आगळे-वेगळे व्यक्तिमत्त्व की ज्यांनी आपल्या जीवनात बर्‍याच गोष्टी केल्या. बर्‍याच गोष्टी शिकवल्या. बर्‍याच गोष्टींचा आदर्श घालून दिला. स्वकर्तृत्वाने ते देवत्वापर्यंत पोहोचले. अशा व्यक्तीचं स्मरण करणं एक भारतीय म्हणून आपणाला अतिशय आवश्यक आहे. श्रीरामाकडे केवळ देव म्हणून न पाहता एक कर्तृत्ववान पुरुष म्हणून पाहून त्याचा जन्मोत्सव साजरा करताना या सर्वांची आठवण ठेवणं गरजेचं आहे, हे सांगण्यासाठी हा सगळा लेखनप्रपंच!