श्रीपाद नाईक यांच्या पुत्राला उमेदवारी नाकारली

0
16

>> कुंभारजुवेतून पांडुरंग मडकईकर यांच्या पत्नीला उमेदवारी; भाजपच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर

माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपने आता केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक यांचाही पत्ता कापला आहे. त्यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. भाजपने काल आपल्या उर्वरित ६ उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यात पक्षाने कुंभारजुवेतून विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या पत्नी जेनिता मडकईकर यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपकडून काल गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी आणि अंतिम यादी जाहीर करण्यात आली. त्यात कुंभारजुवे मतदारसंघाबाबत भाजप नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघातून आपले पुत्र सिद्धेश नाईक यांना उमेदवारी मिळावी, यासाठी श्रीपाद नाईक हे प्रयत्नरत होते आणि त्यांचे पुत्र सिद्धेश नाईक हे देखील कुंभारजुवे मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक होते; मात्र त्यांना उमेदवारी नाकारून जेनिता मडकईकर यांना पक्षाने संधी दिली आहे. विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांचे अनारोग्य लक्षात घेऊन त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे.

डिचोली मतदारसंघात पक्षाने यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे विद्यमान आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. सांताक्रूझ मतदारसंघात पक्षाने विद्यमान आमदार आंतोनियो फर्नांडिस यांनाच उमेदवारी दिली आहे.

मायकल लोबो यांनी पक्ष सोडल्याच्या पार्श्‍वभूमीवर उमेदवार नसल्याने रिक्त झालेल्या कळंगुट मतदारसंघात नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जोसेफ सिक्वेरा यांना उमेदवारी दिली आहे. एलिना साल्ढाना यांनी पक्ष सोडल्याने भाजप कुठ्ठाळी मतदारसंघात उमेदवाराच्या शोधात होता, तेथे पक्षाने नारायण नाईक यांना उमेदवारी दिली आहे.
कुठ्ठाळीत गिरीश पिल्लई यांना उमेदवारी मिळावी, यासाठी मंत्री माविन गुदिन्हो यांनी हालचाली चालवल्या होत्या; मात्र त्यांच्या पदरी निराशा आली आहे. कुडतरी मतदारसंघात पक्षाने अँथनी बार्बोझा यांना उमेदवारी दिली आहे.

सिद्धेश नाईकांकडून
अपक्ष लढण्याचे संकेत

उमेदवारी नाकारल्यानंतर सिद्धेश नाईक यांनी काल रात्री आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतली. आपण नेहमीच कार्यकर्त्यांसोबत असून, कार्यकर्त्यांचा निर्णय हा आपला निर्णय असेल. भाजपने उमेदवारी नाकारल्याने आपला अपक्ष लढण्याचा विचार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजून दोन दिवस आहेत. त्यामुळे गुरुवारपर्यंत निर्णय घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल, असे सिद्धेश नाईक यांनी सांगितले.

रोहन हरमलकर कुंभारजुवेतून अपक्ष लढणार
सिद्धेश नाईक यांच्यासोबत भाजप नेते रोहन हरमलकर हे देखील कुंभारजुवेतून उमेदवारीसाठी इच्छुक होते. उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी कुंभारजुवे मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

अनिल होबळे नाराज
सांताक्रूझमधून आंतोनियो फर्नांडिस यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपचे उपाध्यक्ष अनिल होबळे हे दुखावले आहेत. त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून, पक्षाने भंडारी समाजावर अन्याय केल्याचा आरोप केला आहे.