शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचे पॅकेज जाहीर

0
129

 

कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटी रु. चे पॅकेज देण्यात आल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. खाद्य पदार्थांशी संबंधित उद्योगांनाही १० हजार कोटींचे वित्त सहाय जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकर्‍यांसाठी गेल्या दोन महिन्यांत अनेक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती सीतारमण यांनी दिली. गेल्या दोन महिन्यांत ७४ हजार कोटी रु. पेक्षा जास्त रकमेची धान्य खरेदी करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय पंतप्रधान किसान निधी हस्तांतरण योजनेखाली १८,७०० कोटी रु. रोख स्वरुपात शेतकर्‍यांना देण्यात आल्याचे सीतारमण यांनी सांगितले. तसेच पीक विम्याखाली ६४०० कोटी रुपये अदा केल्याचे त्या म्हणाल्या.

शेती व्यवसायासाठी आवश्यक असणार्‍या विविध साधनसुविधा निर्मितीसाठी १ लाख कोटी रु. चा निधी उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. शेतीसाठी कुंपण, शीत गृहे, यार्ड व अन्य सुविधांचा विकास यासाठी या निधीचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांनी उत्पादीत केलेल्या मालाचा पुरवठा करण्याच्या सुविधांसाठी हा निधी उपलब्ध केला जाणार आहे. सरकार अत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.