शेतकरी आंदोलनावेळी मोदी सरकारने धमकावले होते

0
6

>> ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांचा गंभीर आरोप; विरोधकांचे सरकारवर टीकास्त्र

ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी मोदी सरकारने दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरला धमकावले होते, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच ट्विटरला मोदी सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांची ट्विटर अकाऊंट बंद करा. आम्ही असे केले नाही तर भारतात ट्विटर बंद करू आणि कर्मचाऱ्यांच्या घरी छापेमारी करू, अशी धमकीच देण्यात आली होती, असा आरोपही डोर्सी यांनी केला. या खुलाशानंतर विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला असून, चौफेर टीका चालवली आहे.

एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जॅक डोर्सी यांनी सरकारवर आरोप केले. भारत ही ट्विटरसाठी मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे आम्हाला काही निर्णय घ्यावे लागले. तसे केले नसते तर आमची कार्यालयं बंद केली असती, तसेच कर्मचाऱ्यांवर छापेमारी केली असती. हे भारतात घडले आहे, जो एक लोकशाही देश आहे, असा टोलाही डोर्सी यांनी लगावला.

आरोपांवर मोदी सरकारचे उत्तर
जॅक डोर्सी यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे मोदी सरकारने म्हटले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. ट्विटरवर भारत सरकारकडून दबाव आणला जात होता, हा आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले. शेतकरी आंदोलनादरम्यान, भारतातील ट्विटरचा कोणताही कर्मचारी तुरुंगात गेला नाही किंवा ट्विटरही बंद झाले नाही, असेही चंद्रशेखर म्हणाले.