शेअर बाजारातील परतावा

0
19
  • शशांक मो. गुळगुळे

बँक ठेवी, अल्प बचत संचालनालयाच्या गुंतवणूक योजनांतून मिळणार्‍या परताव्याचा विचार केला तर या गुंतवणुकीतून मिळालेल्या परताव्याच्या दुपटीहून जास्त परतावा शेअर बाजारात गुंतवणूक असणार्‍यांना मिळाला आहे. शेअर बाजारातील कारभार हा जरी १०० टक्के शास्त्रशुद्ध नसला तरी तो जुगार नव्हे!

गुंतवणुकीतील अनेक पर्यायांत शेअर बाजारातील गुंतवणूक हा एक मुख्य पर्याय आहे. मराठी माणसे पूर्वी शेअर बाजारात विशेष गुंतवणूक करीत नसत. मराठी माणसांची शेअर बाजार म्हणजे जुगार अशी मनोभावना होती. पण आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नसून, आता मराठी माणसांची शेअर बाजारात गुंतवणूक वाढली आहे.

मुंबई शेअर बाजार हा भारतातील सर्वात जुना शेअर बाजार असून, सर्वात लोकप्रिय शेअर बाजार आहे. यातील गुंतवणुकीवर अगदी सुरुवातीपासून गुंतवणूकदाराला वार्षिक सरासरी १७ ते १८ टक्के परतावा मिळाला आहे. हा परताव्याचा दर खरोखरच जबरदस्त आहे. यातील गुंतवणूक चार वर्षांत दुप्पट होते, पण यासाठी दीर्घ मुदतीची गुंतवणूक करायला हवी. शेअर बाजारचे चढ-उतार हे निर्देशांकात मोजतात. इंग्रजीत त्याला ‘इंडेक्स’ म्हणतात. लोकांच्या बोलण्यातही ‘इंडेक्स’ हाच शब्द असतो. एप्रिल १९७९ मध्ये हा निर्देशांक १०० अंशांवर होता, तर गेल्या बुधवारी (२१ सप्टेंबर २०२२) तो ५९,४५६.७८ अंश होता. ४३ वर्षांत शेअर बाजारची ही प्रचंड उसळी! निर्देशांकाच्या पातळीची आकडेवारी १९७९ पासून उपलब्ध असली तरी निर्देशांक १९८६ साली लॉंच झाला. आपल्या देशाची अर्थव्यवस्था खुली नसण्याच्या कालावधीत निर्देशांक ‘लॉंच’ झाला. कोणाची जर ३० प्रमुख कंपन्यांच्या शेअरमध्ये १९७९ पासून आतापर्यंत गुंतवणूक असेल (मध्ये शेअर विकलेले नसतील) तर अशा गुंतवणूकदाराला वर्षाला सरासरी १५.८ टक्के दराने परतावा मिळाला असेल. बँक ठेवी, अल्प बचत संचालनालयाच्या गुंतवणूक योजनांतून मिळणार्‍या परताव्याचा विचार केला तर या गुंतवणुकीतून मिळालेल्या परताव्याच्या दुपटीहून जास्त परतावा शेअर बाजारात गुंतवणूक असणार्‍यांना मिळाला आहे. याशिवाय या शेअरमधील गुंतवणुकीवर दरवर्षी कंपन्यांतर्फे लाभांशही मिळतो. लाभांशापोटी मिळालेली रक्कम गुंतवणूकदाराने जर शेअरमध्ये गुंतवली तर त्याला एक ते दीड टक्का जास्त परतावा मिळू शकतो. म्हणजे सुमारे १७ टक्के दराने परतावा मिळू शकतो. नोव्हेंबर २०१४ (सध्याचे सरकार अस्तित्वात आलेले वर्ष) निर्देशांक २८ हजार ६९४ होता. एप्रिल १९७९ पासून नोव्हेंबर २०१४ पर्यंत ज्यांची शेअर बाजारात गुंतवणूक होती त्यांना सरासरी १७.२ टक्के परतावा मिळाला. लाभांशाची रक्कम ज्यांनी गुंतवली असेल अशांना तर १८ टक्क्यांहून अधिक दराने परतावा मिळाला. हे चित्र गुलाबी वाटत असले तरी शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीमही आहे. अल्पमुदतीची गुंतवणूक करणार्‍यांना जोखमीची झळ, दीर्घ मुदतीची गुंतवणूक करणार्‍यांपेक्षा जास्त बसते.

निर्देशांक ‘डेटा’ ३ एप्रिल १९७९ पासूनचा उपलब्ध आहे. या दिवशी निर्देशांक १२४.१५ अंशांवर बंद झाला होता. निर्देशांकाची १९७९ एप्रिलमध्ये १०० समजून आकडेवारी केली तर परताव्याची टक्केवारी १५.८ येते. जर निर्देशांकाची पातळी १२४.१५ समजून आकडेवारी केली तर परताव्याची टक्केवारी १५.२ येते. १९७९ मध्ये शेअरमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर ४३ वर्षांनंतर आता १५.८ टक्के दराने गुंतवणूक मूल्य रुपये ५ लाख ८३ हजार ४६३ झाले असेल तर १५.२ टक्के दराने गुंतवणूक मूल्य रुपये ४ लाख ६५ हजार ५६२ रुपये झाले असेल. सुमारे साडेचार तप शेअर बाजारात गुंतवणूक कायम ठेवलेल्यांना इतका प्रचंड परतावा मिळाला असेल.

हर्षद मेहतामुळे त्या काळात शेअर बाजारात प्रचंड तेजी होती. पण नंतर हर्षद मेहताची लबाडी/गुन्हेगारी लक्षात आली आणि काही काळ शेअर बाजारात प्रचंड मंदी आली. १९९१ नंतर आपल्या देशाची अर्थव्यवस्था खुली झाल्यानंतर शेअर बाजारातील सौदे वाढले. परिणामी १९७९ पासून १९९४ पर्यंत या कालावधीतील निर्देशांकाची वाटचाल जास्त वेगवान नव्हती. १९९४ नंतर ती जास्त वेगवान झाली. १२ सप्टेंबर १९९४ रोजी शेअर बाजार निर्देशांक ४६३१ अंशांवर बंद झाला होता. ३ एप्रिल १९७९ ते १२ सप्टेंबर १९९४ या कालावधीत शेअर बाजारातील गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक २६.४ टक्के परतावा मिळाला होता. १२ सप्टेंबर १९९४ पासून आतापर्यंत वार्षिक निर्देशांक परताव्याचे प्रमाण ९.५ टक्के होते. १९७९ ते १९९४ या पंधरा वर्षांच्या कालावधीत गुंतवणुकीच्या मूल्यात ३६ पट वाढ झाली. त्यानंतरच्या आतापर्यंतच्या २८ वर्षांच्या काळात गुंतवणुकीच्या मूल्यात १२ पट वाढ झाली. १९७९ ते १९९२ या काळात, २ एप्रिल १९९२ मध्ये निर्देशांक सर्वाधिक ४३८८ इतका होता. या कालावधीत वार्षिक सुमारे ३१.५ टक्के परतावा मिळाला. त्यानंतरच्या वर्षी ८.९ टक्के दराने वार्षिक परतावा मिळाला. १९७९ पासून पुढील १३ वर्षांत शेअर बाजारातील निर्देशांक गुंतवणुकीत ३४ पट वाढ झाली, तर त्यापुढील तीन दशकांत सुमारे १२ टक्के वाढ झाली. १९७९ पासून बरीच वर्षे शेअर बाजारात गुंतवणुकीचे प्रमाण फार कमी होते व जी काही गुंतवणूक होत असे ती प्रमुख व मोठ्या शहरांतच होत असे. १९९२-१९९४ पासून शेअर बाजारातील उलाढाल वाढली.
शेअर बाजारात ‘लिस्ट’ असलेल्या शेअरची खरेदी करणे किंवा विक्री करणे याला ‘सेकंडरी मार्केट’ म्हणतात. कंपन्यांनी शेअर विक्रीस काढलेले शेअर विकत घेणे याला ‘प्रायमरी मार्केट’ म्हणतात. शेअर विक्री प्रक्रिया संपल्यानंतर, शेअरचे वाटप झाल्यानंतर व शेअर लिस्ट झाल्यानंतर, तो शेअर ‘प्रायमरी मार्केट’मधून ‘सेकंडरी मार्केट’मध्ये येतो. शेअर बाजारात गुंतवणूक करताना ‘वेळ’ फार महत्त्वाची असते. योग्य वेळ साधण्याचे कौशल्य असावे लागते. शेअरचा भाव कमी असताना गुंतवणूकदार शेअर खरेदी करतात व भाव वाढल्यावर विक्रीचा विचार करतात. ८ जानेवारी २००८ रोजी निर्देशांक २० हजार ८७३ अंशांवर बंद झाला होता. या दिवसापासून आतापर्यंतचा विचार केल्यास परतावा ७.३ टक्के मिळाला.

‘निफ्टी’ निर्देशांक
जसा शेअर बाजारातील उलाढालीचे मूल्यमापन करण्याकरिता निर्देशांक (इंडेक्स) आहे, तसा राष्ट्रीय शेअर बाजारातील उलाढालीचे मूल्यमापन करण्याकरिता निफ्फी निर्देशांक आहे. निफ्टी निर्देशांकाचा विचार केल्यास यात वर्षाला सरासरी १३.८ टक्के दराने परतावा मिळाला आहे. हा निर्देशांक १९९९ पासून कार्यरत झाला. १९९९ पासून ऑगस्ट २०१४ पर्यंतच्या पहिल्या पंधरा वर्षांच्या काळात राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्यांना १४.५ टक्के दराने परतावा मिळाला. गुंतवणूकदार शेअर कधी खरेदी करतो आणि कधी विकतो यावर त्याला किती परतावा मिळणार हे ठरते. शेअर खरेदी करायला आणि विकायला योग्य वेळ साधली गेली पाहिजे. अशी उदाहरणे घडतात की आज शेअर विकले, पण उद्या विकले असते तर जास्त पैसे मिळाले असते. शेअर बाजारातील उलाढालींना किंवा चढ-उतारांना तशी तार्किकता नाही. अमेरिकेचा अध्यक्ष बायडेन जर शिंकला तर त्यामुळेही शेअर बाजार खाली जाऊ शकतो.

शेअर बाजार खाली किंवा वर जाण्यास देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कारणेही अवलंबून असतात. निफ्टी निर्देशांकात दर ऑगस्ट अखेरीची पहिल्या दहा वर्षांची आकडेवारी पाहिली तर सरासरी वार्षिक १४.२ टक्के परतावा मिळाला. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून शेअर बाजाराचा अभ्यास लागतो, पण त्याशिवाय नशीबही बाजूने लागते. कधीकधी अभ्यास करणारे फसतात व अंदाजपंचे गुंतवणूक करणारे पैसा कमवून जातात. पण ज्याप्रमाणे एकाच टोपलीत सर्व अंडी ठेवू नयेत त्यानुसार सर्वच गुंतवणूक एकाच पर्यायात करू नये. गुंतवणूक विभागावी.

म्युच्युअल फंड
ज्यांना शेअर बाजारात थेट गुंतवणूक करायची नसेल अशांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी. आपल्या देशात बर्‍याच म्युच्युअल फंड कंपन्या आहेत व त्यांच्या फार मोठ्या संख्येने गुंतवणूक योजना आहेत. या म्युच्युअल फंड योजनांसाठी जनतेकडून पैसा जमविला जातो तो ‘डेट’ किंवा शेअरमध्ये गुंतविला जातो. काही योजनांत शंभर टक्के निधी शेअरमध्ये गुंतविला जातो. काही योजनांत शंभर टक्के निधी ‘डेट’मध्ये गुंतविला जातो, तर काही योजनांत काही टक्के निधी ‘डेट’मध्ये व काही टक्के निधी शेअरमध्ये गुंतविला जातो. गुंतवणूकदार त्याला हव्या त्या पर्यायात गुंतवणूक करू शकतो. यात गुंतवणूकदाराची त्याच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक होते. फक्त शेअरमध्ये गुंतवणूक करणार्‍या योजनांत जोखीम जास्त असते. ‘डेट’मध्ये गुंतवणूक करणार्‍या योजनांत जोखीम जवळजवळ नसते.

‘डेट’ व शेअर अशा दोन्हीमध्ये गुंतवणूक करणार्‍या योजनांत मध्यम स्वरूपाची जोखीम असते. पूर्वी भारतीयांचा कल फक्त बँकेच्या मुदतठेवीत गुंतवणूक करण्याकडे होता. आता भारतात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार्‍यांचे प्रमाण फार वाढले असून, म्युच्युअल फंडात गुंतवणुकींवर कित्येक गुंतवणूकदारांना फार चांगला परतावा मिळाला आहे. कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना त्या कंपनीचा शेअर भाव काय आहे, हा मुद्या विचारात घेतला जातो. त्यामुळे प्रत्येक कंपनीच्या प्रवर्तकांना/व्यवस्थापकांना आपल्या कंपनीच्या शेअरची जास्तीत जास्त उलाढाल व्हावी व शेअरचा भाव चढा राहावा असे वाटते, व हे गुंतवणूकदारांनाही वाटते. शेअर बाजारातील कारभार हा जरी १०० टक्के शास्त्रशुद्ध नसला तरी शेअरबाजार म्हणजे जुगार नव्हे हे निश्‍चित!