शिवोलीत 11 कोटींचे अमलीपदार्थ जप्त; एकास अटक

0
5

गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने बामनवाडो-शिवोली येथे छापा टाकून सुमारे 11.07 कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले असून, एका व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी उशिरा करण्यात आली. संशयिताकडून 110 ग्रॅम हाय-मायक्रॉन लिक्विड एलएसडी जप्त केले. या लिक्विडमधून सुमारे 11 लाख एलएसडी पेपर ब्लॉट्स मिळण्याचा अंदाज आहे, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 11 कोटींपेक्षा जास्त असू शकते, अशी माहिती अमलीपदार्थविरोधी विभागाच्या पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी पोलीस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.

या प्रकरणी मोहम्मद समीर (29, मूळ रा. केरळ) याला अटक करण्यात आली आहे. तो मागील काही महिन्यांपासून गोव्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स व्यवहार करत असल्याचा संशय आहे. तो बामणवाडो शिवोली येथे भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांनी सापळा रचून घराच्या बाहेर त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 4.72 ग्र्रॅम एलएसडी अमलीपदार्थ आढळून आला. त्यानंतर राहत्या घराची झडती घेतली असता आणखी 106 ग्रॅम एलएसडी अमलीपदार्थ आणि 101 ग्रॅम गांजा हा अमलीपदार्थ आढळून आला. मोहम्मद याच्याकडे एकूण 110.7 ग्रॅम हाय-मायक्रॉन लिक्विड एलएसडी आढळून आला, जो टपार्ट्यांमध्ये सामान्यतः वापरला जाणारा एक शक्तिशाली सायकेडेलिक अमलीपदार्थ आहे. जप्त केलेल्या एलएसडीमधून 10 ते 12 लाख ब्लॉट्स मिळू शकतात, प्रत्येक ब्लॉट्स बेकायदेशीर अमलीपदार्थ बाजारात 3 हजार ते 5 हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात होता, असेही सुनिता सावंत यांनी सांगितले.

मोहम्मद हा गेल्या 5 वर्षांपासून गोव्यात राहत असून, तो बागा येथे एक गेस्ट हाऊस देखील चालवत आहे. एलएसडी पुरवठ्याचा स्रोत शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याने येत्या काही दिवसांत आणखी काहींना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी सांगितले.

>> अमलीपदार्थ प्रकरणी अटक केलेल्या मोहम्मद याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे, असेही पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी सांगितले.