शिक्षण आणि संस्कार

0
2065
–  वल्लभ लक्ष्मण केळकर
समाजाची वर्तमान स्थिती फारच गंभीर आहे. त्यावर चिंतन करून उपाय करण्याची आवश्यकता आहे. समाज आणि विद्यालयांमधून नैतिक आणि सांस्कृतिक संस्कारांचे वैभव वाढले पाहिजे, तेव्हाच आपला भारत देश एक गौरवशाली राष्ट्र बनेल.
शिक्षण आणि संस्कार हे दोन भिन्न शब्द; परंतु समग्र, संतुलित आणि उत्तम शिक्षणातूनच संस्कारक्षम पिढी घडते. प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज म्हणाले होते, सुसंस्कारांचे दान म्हणजेच खरे शिक्षण! शिक्षण म्हणजे दळण नव्हे तर जीवनाला उत्तम वळण लावण्याचं ते एकमेव साधन होय.
घटनेने प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गोष्टी प्रदान केल्या आहेत, त्याप्रमाणे त्याचा पूर्णत्वाने विकास व्हावा, त्याला सुयोग्य वळण लागावं, तो सुसंस्कारित व्हावा, यासाठी शिक्षण हीही आजच्या काळात अत्यावश्यक गोष्ट झाली आहे आणि ती प्रत्येकाला मिळाली पाहिजे. खरं तर शिक्षण ही जन्मापासून अखेरच्या श्‍वासापर्यंत चालणारी प्रक्रिया आहे. ‘एज्युकेशन इज ए लाईफलॉंग प्रोसेस इट गोज ऑन फ्रॉम क्रेडल टू ग्रेव्ह’ असं म्हणूनच म्हटलं गेलं आहे.
आज आपल्या समाजासमोर एक महाभयंकर समस्या अक्राळविक्राळ स्वरूपात उभी आहे आणि ती म्हणजे फोफावणार्‍या प्रदूषणाची. ते प्रदूषण म्हणजे आचार-विचार-उच्चारातील प्रदूषण. आजच्या विद्यार्थ्यांच्या आचार-विचार-उच्चाराला प्रदूषणामुळे दुर्गंध येत आहे. मनुष्य घरात जगतो आणि शाळेत विचार करायला शिकतो, त्यामुळे जगणे आणि विचार यांचा मेळ बसणे खूप कठीण झाले आहे. त्याला उपाय म्हणजे एका बाजूने घर शाळेत आलं पाहिजे, अन् दुसर्‍या बाजूने शाळा घरात घुसली पाहिजे. सध्या ‘वाढता वाढता वाढे’ या न्यायाने वर्ग तुडुंब होत चालले आहेत. भरलेले वर्ग, विषयांची भाऊगर्दी, पाठीवर मणभर ओझे, सतत बदलणारे अभ्यासक्रम, सदोष अवमूल्यन पद्धती, सातत्याने होणारे कार्यक्रम व उपक्रम यांमधून विद्यार्थ्यांची होणारी केविलवाणी फरफट आणि या सार्‍या अग्निदिव्यातून विद्यार्थ्यांना बाहेर काढताना अध्यापकांची होणारी ससेहोलपट, करावी लागणारी तारेवरची कसरत या गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत.
एक काळ असा होता की शाळा आणि मंदिर हे त्या गावातील लोकांची चेतनाकेंद्रे होती. परंतु कालांतराने या दोन्ही संस्था मोडकळीस आल्या आणि त्यामुळे प्रत्येक गावामध्ये सुसंस्कारांच्या माध्यमातून निर्माण होणारी सुजाण पिढी इतिहासजमा झाली आहे.
शिक्षण म्हणजे वळण, उन्मीलन, विकसन! केवळ पुस्तकी विद्या, परीक्षेसाठी अभ्यास म्हणजे खर्‍या अर्थाने शिक्षण नव्हेच. शिक्षण बुद्धीला हवं, भावनांना हवं, शरीराला हवं, मनाला-संवेदनांना हवं, ज्ञानेंद्रियांनाही सुयोग्य शिक्षण मिळायला हवं. आदर्श आणि व्यवहारवास्तव यांची सांगड घालायची कशी? काय घ्यायचं, स्वीकारायचं? त्याचबरोबर जीवनातील प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर ज्यातून मिळते तेच खरे शिक्षण. शिक्षण घेणं म्हणजे नुसती पदव्यांची भेंडोळी जमा करणं नव्हे. वागायचं कसं, बोलायचं कसं, लिहायचं कसं, वाचायचं काय हे सारं आपल्याला शिक्षणातूनच कळतं.
पोटापाण्याची सोय, व्यक्तिमत्त्वाचा विकास, भावी जीवनाची तयारी, यश-मान-कीर्ती मिळवणं, जीवनात आनंद मिळणं, सुख मिळणं ही अनेक उद्दिष्टं जरी असली तरी सुशिक्षितपणापेक्षा सुसंस्कारित होणं, आत्मिक विकास होणं अन् मुख्य म्हणजे सुसंस्कारित माणूस घडवणं हेच शिक्षणाचं अंतिम श्रेष्ठतम उद्दिष्ट आहे.
शिक्षण व संस्कार या प्रक्रियेत चार स्तंभ महत्त्वाचे आहेत. विद्यार्थी, शिक्षक, पालक व संस्था या चारही स्तंभाच्या समन्वयाने निरोगी, सुजाण पिढी विकसित होते. इतिहासाकडे वळून पाहताना दिसते की, आजच्यासारखी माध्यमं, तंत्रज्ञान, भौलिक विकास या गोष्टी नसतानासुद्धा सदाचारी, सद्वर्तनी, सत्यवचनी, प्रज्ञावान पिढी कशी निर्माण झाली?
डॉ. ह. वि. सरदेसाईंच्या मते ज्ञानेश्‍वरांसारखा युगात्मा युगायुगांतून एखादाच जन्माला येतो हे खरं, पण ज्ञानेश्‍वर या शब्दाचा, विशेषणाचा अर्थ अभिप्रेत आहे तो एवढाच की, बुद्धिमान आणि तशी शहाणी मुलं घरोघरी जन्माला येणं अशक्य वाटत नाही. शरीरशास्त्र असं सांगतं की, जन्मतः सर्व मुलं शहाणीच असतात. तुम्ही-आम्ही, म्हणजे त्या मुलांचे पालक, शिक्षक, शेजारीपाजारी, नातेवाईक त्या मुलांची बुद्धिमत्ता, त्यांचे उपजत शहाणपण, बीजरूपाने तिथं असणारं त्यांचं ते ज्ञानेश्‍वरपण नाहीसं करून टाकतो. आमच्या देशाला बुद्धिमत्तेचं तसं वावडं असण्याचं कारण नाही. भारतात बुद्धिवंतांची मोठी परंपरा होऊन गेली. पण मग आमचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात आजकाल मागं का पडू लागले? प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या मते, तो काळ बुद्धिप्राधान्याचा म्हणजे बुद्धिवंतांना, विचारवंतांना प्राधान्य देण्याचा होता. ते समाज असे होते की तिथे कोणताच समतोल ढळला नव्हता. बुद्धिवंतांना मान होता. तसाच क्षात्रधर्मालाही होता. वाणिज्य वृत्तीला म्हणजे अर्थोत्पादनालाही होता. पुढंपुढं अर्थाला महत्त्व प्राप्त झालं आणि बुद्धिमत्तेच्या वाढीचा विचार मागे पडला. आज समाजात बुद्धीच्या वाढीचे प्रयोग होताना दिसत नाहीत. गुरू-शिष्य संबंधातलं पावित्र्य संपुष्टात आलं आहे. जिव्हाळा निकालात निघाला आहे. व्यक्तीचा विचार संपला आहे. खेड्यापाड्यांतही माणूस आजकाल गटानेच जगतो. आश्रमजीवन नाही, पाठांतर नाही, स्पर्धा नाही. मी काही नवा विचार शोधीन हा हव्यास, ही जिद्द नाही. प्राचीन काळी आश्रमात जाणारा शिष्य सर्वोत्तम शिष्य बनून स्वगृही परतायचा. सर्व भिस्त गुरूवर होती. त्या काळचे पालक गुरूवर श्रद्धा, निष्ठा, भक्ती, भिस्त ठेवून एक प्रकारे निश्‍चिंत असायचे. हळूहळू काळ बदलला. शाळा-महाविद्यालये निघाली. मुलं आपापली शाळेत जाऊ लागली, अभ्यास करू लागली. एकत्र कुटुंबात संस्कार कळत-नकळत व्हायचे- घरातल्या एकोप्यातून, प्रथा-परंपरांतून, एकमेकांच्या वागण्यातून! यामुळे पालकत्वाच्या जबाबदारीची थोडी थोडी वाटणी व्हायची. विचारांना मुरड होती, आचारांना मर्यादा होती, जीवनाला शिस्त होती. बघता बघता तीही परिस्थिती पालटली. एकीकडे ज्ञानाचा विस्फोट, दुसरीकडे भोवळ यावी असे युगपरिवर्तन. प्रश्‍न वाढले, समस्या गुंतागुंतीच्या झाल्या. पूर्वी मुलांना पालकांचा धाक वाटायचा, तर हल्ली मुलांचा पालकांना धाक वाटायला लागला आहे. आज मुलांना आईवडील आहेत पण बर्‍याच मुलांना पालक नाहीत असं खेदानं म्हणायची पाळी आली आहे. पा- पाहणारा, पालन करणारा, ल- लक्ष ठेवणारा आणि क- कर्तव्यदक्ष राहून कठोरपणे कर्तव्य करणारा. असा पालकवर्ग दुर्मीळ होत चालला आहे.
परवा एका पालकाचा भ्रमणध्वनी आला. तो आपल्याच मुलांबाबत बोलत होता. त्यांनी जे काय सांगितलं ते ऐकून पुरता हादरून गेलो. पिचलेल्या, अगतिक झालेल्या, धास्तावलेल्या व खंतावलेल्या पालकांचा तो एक प्रतिनिधी होता. पूर्वीच्या काळी पालकसभा, पालकप्रबोधन, पालकशिबीर यांचं आजच्यासारखं स्तोम नव्हतं. परंतु बदलत्या काळात नवी निर्माण झालेली गरज प्रकर्षानं जाणवायला लागली आहे.
आपल्या हिंदू परंपरेमध्ये संस्कारांना विशेष महत्त्व आहे. यामध्ये- गर्भाधान, पुंसवन, सीमान्तोन्नयन, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चुडाकर्म, कर्णवेध, उपनयन, विद्यारम्भ, समावर्तन, विवाह, वानप्रस्थ, संन्यास व अंत्येष्टी यांचा समावेश आहे.
भारतातील एक नामवंत शिक्षणतज्ज्ञ श्री. लज्जाराम तोमर म्हणतात, माणसाचे संस्कार तीन गोष्टींवर अवलंबून असतात. यामध्ये आनुवंशिकता, पूर्वजन्म व वातावरण यांचा समावेश होतो. माणसाची शारीरिक रचना, बुद्धी व अभिरूची त्याच्या आनुवंशिकतेवर अवलंबून असते. गुण व संस्कारक्षम संततीसाठी दांपत्य सूत्रबंधन, मुलीची निवड विविध नियमांच्या आधारे होते. या सिद्धांतामुळेच हिंदू समाजांमध्ये पूर्वजांच्या प्रति अगाध श्रद्धेचा भाव पाहायला मिळतो.
संस्काराच्या प्रक्रियेत वातावरणाचासुद्धा महत्त्वाचा सहभाग आहे. प्राकृतिक, पारिवारिक, सांस्कृतिक व सामाजिक परिस्थितीचा खूप मोठा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर होत असतो. संस्कार ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक असे तीन प्रकारचे असतात. भारतीय मनोविज्ञानाच्या आधारे संस्कार हाच शिक्षणाचा आधार आहे. त्याच्या आधारावरच विद्यार्थ्याचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, नैतिक व आध्यात्मिक विकास होतो. सध्याचे शिक्षण मार्क्सवादी झाल्यामुळे संस्कारांची उपेक्षा केली जाते आहे. ज्ञानप्राप्तीबरोबरच विद्यार्थ्यांचे नैतिक चरित्र व सांस्कृतिक व्यक्तित्व निर्माणामध्येसुद्धा संस्कारांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. संस्कारपरंपरा कमजोर पडल्यामुळे संस्कारशून्य पिढी निर्माण होत आहे.
सामाजिक वातावरण घडवण्यामध्ये जननिक आनुवंशिकतेपेक्षा सामाजिक आनुवंशिकता जास्त महत्त्वाची आहे. आपला समाज, संस्कृती, आपला इतिहास, आमची भाषा, आपले साहित्य, आमच्या चालीरीती या सर्व गोष्टी आमच्या संस्कारावर प्रभाव टाकतात. माणूस हा घर करणारा, आपल्या पुढच्या पिढ्यांची चिंता वाहणारा प्राणी ही माणसाची खरी व्याख्या आहे. ‘माझं अपत्य मी सुसंस्कृत करीन’ असा आग्रह व निर्धार प्रत्येक पालकाने केलाच पाहिजे. कारण ती फक्त तुमची मुलं नाहीत, त्यांच्यावर झालेल्या संस्कारांचे फलित म्हणजे सुसंस्कृत समाजनिर्मिती होते. खलिल जिब्रानच्या भाषेत सांगायचं झाल्यास-
तुमची मुलं ही तुमची मुलं नाहीतच.
चिरंजीव होऊ इच्छिणार्‍या,
जीवनाच्या उत्कट आकांक्षेची ती मुलं आहेत.
तुमच्या देहाच्या वाटेनं ती जन्माला आली असली,
तरी तुम्ही केवळ निमित्तमात्र आहात.
तुम्ही त्यांना आपलं प्रेम द्या,
पण आपले विचार मात्र देऊ नका.
तुम्ही त्यांच्यासारखे खुशाल व्हा,
होण्याचा प्रयत्न करा
पण त्यांना तुमच्यासारखं बनवण्याचा
विचारही करू नका.
लक्षात ठेवा,
जीवन हे भूतकाळात रेंगाळत नसतं,
ते नेहमी पुढे जात असतं.
व्यक्ती सुशिक्षित असली तरी ती सुसंस्कारित व्हावी तरच ती परिपूर्ण असते. सुसंस्कार व्यक्तिजीवनात नैतिक बळ देतात, जीवन उजळून टाकतात, शाश्‍वत आनंद मिळवून देतात. त्यामुळे सुजाण माणूस संस्कारांचे त्यांच्या जीवनातले स्थान नाकारत नाहीत. संस्कार हे जाणीवपूर्वक करायला हवेत. संस्कार एका क्षणात, एका दिवसात, एका रात्रीत होत नाहीत. असे संस्कार फसवे असतात. मनाची मशागत हळुवारपणे, कौशल्याने करून संस्कारांचे बीज पेरावे लागते. घरी पालकांनी आणि शाळेत आम्ही आशावादी बनून असे संस्कार करायला हवेत.
योग्य संस्कार करण्यासाठी सुजाण पालकांची गरज आहे. पालकांची जबाबदारी आहे- मुलांमध्ये योग्य मूल्य रुजवण्याची. मूल्यांची गंमत अशी की ती थेट शिकवता येत नाहीत. मूल्यांचे घास भरवता येत नाही. ती उदाहरणांमधून रुजवली जातात. याबाबत आश्‍विनी देव म्हणतात, ‘पालकांना स्वतःच्या मूल्यांबाबत स्पष्टता असेल तरच ते योग्य ती मूल्ये मुलांपर्यंत खंबीरपणे व सहजतेनं पोहोचवू शकतील. म्हणजे मुलांवर संस्कार होण्यासाठी पालकांची सुजाणता आवश्यक ठरते.’ प्रवीण कुलकर्णी आपल्या लेखात म्हणतात, ‘पालकत्व निभावताना संस्कारक्षम मुलांच्या मनाचा, कलाचा आणि स्वभावाचा विचार करून सतत डोळस प्रयत्न करत राहाणे म्हणजे सुजाण पालकत्व.’
डॉ. ह. वि. सरदेसाई म्हणतात, मुलांना जन्म देणं तरी एकवेळ सोपं पण त्यांना संपन्न व्यक्तिमत्त्वाची माणसं होण्यासाठी संधी आणि वातावरण देणं फार कठीण काम आहे. मुलाला समर्थपणे वाढवण्याची पूर्वतयारी करायची म्हणजे स्वतःच थोडं नव्यानं मोठं व्हायचं.
मुलं म्हणजे नसतात काही
देवाघरची फुलं
मुलं म्हणजे नसतात फक्त
मातीचेही गोळे
तीही तुमच्या-आमच्यासारखी
‘माणसं’च तर असतात;
एवढंच की खूप खूप
चिमुकली दिसतात!
पालक म्हणून तुम्ही-आम्ही
काय करायला हवं?
मुलांबद्दलचं वास्तव हे
स्वीकारायला हवं!
जा बरं खेळा जाऊन…
असं म्हणून भागत नसतं,
कारण कधी त्यांनासुद्धा
तुमच्याशीच खेळायचं असतं!
आकाशीचं इंद्रधनुष्य
त्यांनाही सुंदर दिसत असतं!
अहो पण, तेही त्यांना
तुमच्यासोबत बघायचं असतं!
समाजाची वर्तमान स्थिती फारच गंभीर आहे. त्यावर चिंतन करून उपाय करण्याची आवश्यकता आहे. समाज आणि विद्यालयांमधून नैतिक आणि सांस्कृतिक संस्कारांचे वैभव वाढले पाहिजे, तेव्हाच आपला भारत देश एक गौरवशाली राष्ट्र बनेल.