– रामनाथ न. पै रायकर
सितारों के आगे जहॉं और भी हैं,
अभी इश्क के इम्तहॉं और भी हैं|
– इकबाल
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘राजा हरिश्चंद्र’पासून ते करण जोहर, दिबाकर बॅनर्जी, झोया अख्तर आणि अनुराग कश्यप या दिग्दर्शकांच्या चमूने बनविलेल्या ‘बॉम्बे टॉकिज’पर्यंत तब्बल शंभर वर्षांच्या कालावधीत भारतीय सिनेसृष्टीतील अगणित सौदागरांनी प्रेक्षकांना काळोख्या चित्रपटगृहातील खुर्च्यांवरून कित्येकवेळा मायानगरीची सफर घडवून आणलेली आहे. रुपेरी पडद्यावर साकार होणार्या या मोहमयी, रसिल्या आणि नशिल्या स्वप्ननगरीत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी १९१३ पासून आजतागायत कैक निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, छायाचित्रकार, नृत्यदिग्दर्शक, फाईट मास्टर्स, रंगरसायन तज्ज्ञ, ध्वनिलेखक आणि इतर बर्याचजणांनी रक्ताचे पाणी केले आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास म्हणजे एक शतकी सफर आहे, जी मूकपटांपासून बोलपटांपर्यंत, कृष्ण-धवल चित्रपटांपासून रंगीत सिनेमापर्यंत, ३५ मी.मी.च्या पडद्यापासून सिनेमास्कोप- ७० मी.मी. अशा अतिभव्य रजतपटापर्यंत, मोनो ध्वनिमुद्रणापासून डोल्बी डिजिटल ध्वनिव्यवस्थेपर्यंत आणि द्विमितीपासून त्रिमिती चित्रपटांपर्यंत न थांबता सतत चालू आहे… प्रत्येक दिवशी… तीन ते पाच खेळ दररोज अशा नेमाने… आणि या अशा नेत्रदीपक प्रवासाचे वर्णन काही शब्दांत करणे कसे शक्य व्हावे? भारतीय सिनेसृष्टीचा हा विशाल सागर काही घड्यांमध्ये भरून कसा दाखवता येईल? शिवाय भारतीय सिनेमा म्हणजे केवळ हिंदी सिनेमा हा गैरसमज दूर केला तर हे काम अधिकच कठीण होऊन बसेल.
भारतीय चित्रपटसृष्टीचा कणा हिंदी चित्रपटसृष्टी असला तरी त्याव्यतिरिक्त तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक या चार राज्यांनी बनलेली दाक्षिणात्य सिनेसृष्टी आणि कलकत्ता हा केंद्रबिंदू असलेली बंगाली चित्रनगरी जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवून आहे हेही विसरता कामा नये. याव्यतिरिक्त गुजराती फिल्म इंडस्ट्री, अत्यंत यशस्वी ठरलेली भोजपुरी चित्रपटसृष्टी आणि पूर्वोत्तर राज्यांमधील आसामी सिनेसृष्टीदेखील भारतीय चित्रपटसृष्टीचा अविभाज्य भाग आहे. आणि शेवटी न विसरता येण्याजोगी मराठी मायानगरी जेथे या मनोरंजनाच्या उद्योगाचा पाया घातला गेला…
दादासाहेब फाळक्यांनी रुपेरी पडद्यावरील चालती चित्रे सादर केली आणि प्रेक्षकांची ‘शब्दांवाचुनी कळले सारे, शब्दांच्या पलिकडले’ अशी अवस्था झाली. चित्रपट माध्यमाने भारावून गेलेल्या भारतातील अनेक सर्जनशील व्यक्तींचीही हीच स्थिती झाली. त्यामुळे ‘राजा हरिश्चंद्र’च्या निर्मितीनंतर मुंबई व मद्रासमधील अशा व्यक्ती चित्रपटांच्या नादाला लागल्या. १९२० च्या दशकाच्या मध्यापर्यंत चित्रपटनिर्मितीचा केंद्रबिंदू म्हणून मद्रास ओळखले जाऊ लागले. रघुपती व्यंकय्या नायडू, एस. एस. वासन आणि ए. व्ही. मेयप्पन यांनी मद्रास येथे चित्रपटनिमिर्र्तीसाठी भले मोठे स्टुडिओ उभारले, ज्यांमधून तेलगू व तामीळ चित्रपट तयार होऊ लागले.
१९३० चे दशक उजाडता उजाडता जगातील इतर चित्रपटनिर्मिती केंद्रांबरोबर भारतानेही मूकपटांचा निरोप घेत बोलपटांच्या बोलक्या दुनियेत प्रवेश केला आणि १९३१ साली प्रसिद्ध चित्रपट निर्माते- दिग्दर्शक आर्देशिर इराणी यांनी ‘आलम आरा’ हा पहिलावहिला भारतीय बोलपट तयार केला. बोलपटांच्या आगमनानंतर भारतीय सिनेकलावंतांनी केवळ चांगले दिसावे या माफक अपेक्षेने विराट रूप धारण केले. चित्रपट कलावंतांनी, खास करून नायक व नायिकेने चांगले दिसण्यासोबत उत्तम आवाजाची दैवी देणगी अंगी बाळगणे आणि त्याही पुढे जाऊन सुरीले गायन सादर करणे अशी गरज निर्माण झाली. भारतीय चित्रपटाला आवाज फुटला तोच मुळी संगीताच्या साथीने, ज्यामुळे बोलपटांच्या सुरुवातीच्या काळात चित्रपटांमध्ये बेसुमार गाण्यांचा वापर केला जाऊ लागला. कदाचित त्या काळात लोकप्रिय असलेल्या संगीत मराठी तसेच संगीत पारशी रंगभूमीचा हा थेट परिणाम असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
१९३१ साली दक्षिण भारत तसेच बंगालमध्येदेखील बोलपटांची नांदी झाली. या वर्षी बंगालीमध्ये ‘जुमाई शाष्ठी’, तेलगूमध्ये ‘भक्त प्रल्हाद’ आणि तामिळमध्ये ‘कालिदास’ हे संवाद असणारे चित्रपट प्रदर्शित झाले. याच काळात म्हणजे १९२९ मध्ये मराठी माणसांनी कोल्हापूर येथे स्थापन केलेली प्रभात फिल्म कंपनी आणि १९३४ साली बंगाली बाबूंनी मुंबईत निर्माण केलेले बॉम्बे टॉकिज हे आस्थापन म्हणजे महाराष्ट्रातील दर्जेदार सिनेनिर्मितीची दोन प्रमुख केंद्रे बनली. या दोन महान स्टुडिओंनी दादासाहेब फाळक्यांनी घातलेल्या चित्रपटसृष्टीच्या पायावर अप्रतिम कलामंदिर उभे केले. या स्टुडिओंमध्ये तयार झालेल्या चित्रकृतींमध्ये कुंदनलाल सैगल, अशोक कुमार, केशवराव दाते, गजानन जागीरदार असे नट व देविका राणी, दुर्गा खोटे, लीला चिटणीस अशा नट्यांनी कामे केली. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन आहे हा समज पुसून टाकण्याचे काम ‘अछुत कन्या’, ‘कुंकू’, ‘माणूस’, ‘शेजारी’ आणि अशा कित्येक समाजप्रबोधनपर चित्रपटांनी प्रभावीपणे केले. आजपासून जवळ जवळ ७५ वर्षांपूर्वी ‘संत तुकाराम’ (१९३६) या चित्रपटाने व्हेनिस चित्रपट महोत्सवात धडक मारली व १९३७ साली जगातील एक सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून मानाचा मुजरा प्राप्त केला.
भारताला ब्रिटिश साम्राज्याकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरू झालेल्या नेहरू युगामध्ये व्ही. शांताराम, बिमल रॉय, राज कपूर आणि मेहबूब खान यांच्या सर्जनशीलतेला धार चढली. या चित्रपंडितांनी पं. जवाहरलाल नेहरूंच्या ध्येयधोरणांशी जवळीक साधणार्या विषयांवर चित्रपट तयार केले. ‘दो आँखे बारह हाथ’ (१९५७), ‘दो बिघा जमीन’ (१९५३), ‘आवारा’ (१९५१), ‘जागते रहो’ (१९५६), ‘बूट पॉलिश’ (१९५४), ‘अंदाज’ (१९४९), ‘मदर इंडिया’ (१९५७) ही अशीच काही उदाहरणे.
याच दरम्यान दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीनेही बरीच मजल मारली. तामीळ, तेलगू, कन्नड व मल्याळम चित्रपटांनी नवनवे विक्रम साधले आणि बर्याच दक्षिण भारतीय निर्मात्यांनी हिंदी चित्रपटांची निर्मिती हाती घेतली. १९४० च्या दशकामध्ये बहुतेक भाषांमधून निर्माण होणार्या चित्रपटांसाठी निर्मात्यांनी धर्म हा विषय जवळ केल्याचे आढळून येते.
इकडे १९४० ते १९६० च्या दशकांचा काळ हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीताचा सुवर्णकाळ बनून राहिला. अनिल बिश्वास, सज्जाद हुसैन, खेमचंद प्रकाश, नौशाद, सचिन देव बर्मन, सी. रामचंद्र, सलील चौधरी, मदन मोहन, हेमंत कुमार, ओ. पी. नय्यर, शंकर जयकिशन आणि इतरांनी रुपेरी पडद्यावर सुरांची इंद्रधनुष्ये साकारली. प्रत्येक संगीतमार्तंडाने आपली स्वतंत्र शैली सांभाळत साहिर, शैलेंद्र, हसरत, मजरूह, शकील, कैफी, राजा मेहदी अली खान अशा कविश्रेष्ठांच्या काव्यांना स्वरांचे कवच दिले आणि कुणीही याआधी न ऐकलेल्या रचना लता, आशा, सुमन, रफी, मुकेश, मन्नाडे, किशोर, गीता दत्त, शमशाद बेगम, महेंद्र कपूर अशा कलाकारांकडून म्हणून घेतल्या.
प्रमथेश बरुआ आणि देवकी बोस यांसारख्या प्रतिभासंपन्न चित्रकर्त्यांनी सुरुवातीच्या काळात बंगाली सिनेसृष्टीला वरच्या पातळीपर्यंत नेऊन ठेवले असले तरी बंगालमधील समांतर सिनेमाचा उदय १९५० च्या दशकात झाला याबद्दल दुमत असू नये. या दशकामध्ये सत्यजित राय, बिमल रॉय, ऋत्त्विक, घटक आणि मृणाल सेनसारख्या चित्रमहर्षींनी अपू मालिका (‘पथेर पांचाली’, ‘अपराजितो’, ‘अपूर संसार’), ‘उदयेर पाथे’, ‘बारी थेके पालिये’ आणि ‘निल आकाशेर निचे’ असे चित्रपट निर्माण केले आणि त्यानंतर बंगाली चित्रपटांमध्ये वेळोवेळी मोलाची भर घातली. यातील अनेकांनी पुढे प्रभावशाली हिंदी चित्रपटदेखील दिग्दर्शित केले.
भारतीय चित्रपटसृष्टीने १९६३ साली आपला सुवर्णमहोत्सव साजरा करीपर्यंत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये जेमिनी आणि ए.व्ही.एम.सारखे नामवंत स्टुडिओ उभे राहिले होते. हिंदी चित्रपटसृष्टीत मनोरंजन आणि सामाजिक बांधीलकी यांची सांगड घालणारे के. आसिफ, बी. आर. चोप्रा, गुरुदत्त, फणी मजुमदार, हृषिकेश मुखर्जी असे दिग्दर्शक, दक्षिणेतील के. व्ही. रेड्डी, नागी रेड्डी, एल. व्ही. प्रसाद, रामू करियत यांच्या तोडीस तोड उभे ठाकले. दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कपूर ही त्रिमूर्ती नेहरू युगाची रुपेरी पडद्यावरील प्रतिनिधी बनून राहिली. पुढे १९६० च्या दशकात शम्मी कपूर, धर्मेंद्र, मनोज कुमार, राजेंद्र कुमार, राजेश खन्ना यांनी प्रेक्षकांच्या हृदयसिंहासनावर राज्य केले. राजेश खन्ना तर भारतीय चित्रपटसृष्टीचा पहिला युवराज- सुपरस्टार- बनला.
दक्षिणेकडील मायानगरीने आपली घोडदौड चालू ठेवत एन. टी. रामाराव, एम. जी. रामचंद्रन, शिवाजी गणेशन, जेमिनी गणेशन, ए. नागेश्वर राव, राजकुमार आणि प्रेम नजीरसारख्या कलाकारांना अकल्पनीय यश आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळवून दिले. या सर्व कलावंतांनी तीन दशकांहून अधिक काळ रुपेरी पडदा गाजविल्यानंतर आपली गादी रजनीकांत, कमल हसन, मम्मुट्टी, मोहनलाल, चिरंजीवी, नागार्जुन आणि बाळकृष्णसारख्या नव्या दमाच्या गड्यांना बहाल केली.
१९७० च्या दशकाची सुरुवात एका मोठ्या बदलाने झाली. एका बाजूला दक्षिण भारतातील चित्रपट भडक होत चालले असताना हिंदी चित्रपटसृष्टीत हिंसाचाराचे आगमन झाले. बदलती सामाजिक मूल्ये आणि महागाईच्या वणव्याचा सामान्य माणसाला दाह देणारी अर्थव्यवस्था यातून लेखकद्वयी सलीम-जावेद यांनी ‘एंग्री यंग मॅन’ अर्थात संतापलेला तरुण अमिताभ बच्चनच्या रूपात पडद्यावर सादर केला. सामान्य माणसांच्या वेदनांना वाट मोकळी करून देणार्या अनेक व्यतिरेखा सलीम-जावेद यांनी अमिताभ बच्चनच्या माध्यमातून रंगविल्या. ‘जंजीर’ (१९७३), ‘दिवार’ (१९७५) आणि ‘शोले’ (१९७५) सारखे चित्रपट त्यांच्या निर्मात्यांसाठी सोन्याच्या खाणी बनले.
भारताच्या स्वातंत्र्यापासून सुरय्या, मीना कुमारी, नर्गिस, वैजयंतीमाला, वहिदा रहमान, मधुबाला, आशा पारेख, सायराबानो, माला सिन्हा आणि शर्मिला टागोर यांनी रजतपटाला सौंदर्य प्रदान केले. पुढे जया भादुरी, हेमा मालिनी, झिनत अमान, रेखा, परवीन बाबी, स्मिता पाटील, शबाना आजमी, जयाप्रदा, श्रीदेवी, माधुरी दीक्षित आणि अशा अनेक ललनांनी प्रेक्षकांना लावण्य व अभिनय यांचे संमिश्र दर्शन घडविले.
ज्या दशकामध्ये मनोरंजन हेच सिनेमाचे मूळ सूत्र आहे हे ब्रीद चित्रपटनिर्मात्यांनी आपल्या मनावर कोरून घेतले होते, त्याच दशकात अदूर गोपाळकृष्णन, अरविंदन, श्याम बेनेगल, शाजी करुण आणि इतर अनेक बुद्धिवान दिग्दर्शकांनी कलात्मक चित्रपटांना नवे वळण दिले, ज्यामुळे भारतीय चित्रपट परत एकदा आंतरराष्ट्रीय चित्रपट समुदायाच्या कौतुकास पात्र ठरला.
१९८० च्या दशकात महिला दिग्दर्शकांचे आगमन झाले. विजया मेहता (‘राव साहेब’), अपर्णा सेन (‘३६ चौरंगी लेन’), सई परांजपे (‘चष्मेबद्दूर’), कल्पना आजमी (‘एक पल’), प्रेमा कारंथ (‘फणीअम्मा’) आणि मीरा नायर (‘सलाम बॉम्बे’) यांनी स्त्रीशक्तीचे रुपेरी पडद्यावर दर्शन घडविले. यांपैकी काही महिला दिग्दर्शक तर आजही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कलाकृतींद्वारा मानसन्मान प्राप्त करीत आहेत.
याच दशकात दक्षिण भारतामधील चित्रपटांमध्ये एका बाजूला सवंगपणा तर दुसर्या बाजूला अप्रतिम निर्मितिक्षमता बघायला मिळाली. बालू महेंद्र (‘मुनराम पिराई’) किंवा मणी रत्नम (‘नायगन’) या नव्या पिढीतील दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शकांनी भारतीय प्रेक्षकांची मान गर्वाने उंचावली यात शंकाच नाही.
१९८० चे दशक चालू असताना बंगाली चित्रपटांनी गोंधळलेल्या मनःस्थितीत पारंपरिक कलात्मकता आणि भावनात्मक उत्कंठा यांचा त्याग केला आणि धंदेवाईक स्वरूप धारण करून लोकप्रिय परंतु सवंग हिंदी चित्रपटांची नक्कल करण्यास सुरुवात केली. गौतम घोषसारखे काही सन्माननीय अपवाद सोडले तर १९८० च्या दशकाच्या अस्तापर्यंत बंगाली चित्रपटांचा दर्जा घसरला होता. मात्र तोपर्यंत तपस पाल, प्रसनजित, चिरंजित, रितुपर्णा सेनगुप्ता आणि इतर बंगाली कलाकारांची लोकप्रियता शिगेला पोचली होती हे मान्य करावेच लागेल. सुदैवाने मागील शतक संपता संपता बुद्धदेव दासगुप्ता, रितुपर्णो घोष, अपर्णा सेन व संदीप राय यांनी बंगाली चित्रपटांची ‘डुबती नय्या’ सावरली. याच काळात सत्यजित राय यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी राय यांनी दिग्दर्शित केलेले ‘गणशत्रु’ (१९८९), ‘शाखा प्रशाखा’ (१९९०) आणि ‘आगंतुक’ (१९९२) हे चित्रपट त्यांच्या आजारामुळे त्यांच्यावर आलेल्या हालचालींच्या बंधनास्तव एखाद्या नाटकाप्रमाणे बंदिस्त वाटले. नव्या शतकाच्या आगमनानंतर जित, देव, परंब्रता आणि रुद्रनिल असे नायक, तसेच कोयल मलीक, श्रबंती चटर्जी अशा नायिका आणि अंजान दत्ता, शेखर दास, अनिरुद्ध राय चौधरी, कौशिक गांगुली, अतनू घोष, श्रीजित मुखर्जी आणि राज चक्रवर्ती असे दिग्दर्शक यांनी बंगाली चित्रपटसृष्टीला स्थैर्य प्राप्त करून दिले.
दक्षिणेकडे के. बालचंदर, के. विश्वनाथ, भारती राजा, बापू, बालू महेंद्रू अशा दिग्गज दिग्दर्शकांनी सर्जनशीलतेची धगधगती मशाल गिरिश कासारवल्ली, मणी रत्नम, संगीतम श्रीनिवास राव, शाजी करुण, सलीम अहमद अशा तरुण रक्ताच्या स्वाधीन केली. गेल्या वीस-पंचवीस वर्षांमध्ये ‘पुष्पक विमान’, ‘नायगन’, ‘रोजा’, ‘कांचीवरम’, ‘गुलाबी टॉकिज’, ‘आदामिन्ते माकन आबू’ असे काही उत्कृष्ट चित्रपट दक्षिणेमध्ये तयार झालेले आहेत.
दरम्यान, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये १९९० पासून आधुनिक तंत्राचा मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला. डॉल्बी डिजिटल ध्वनी, उच्च दर्जाचे स्पेशल इफेक्टस् यांच्याबरोबरीने डोळे दीपवून टाकणारी नृत्ये, ही गेल्या पाव शतकामध्ये तयार झालेल्या हिंदी चित्रपटांची खासियत बनली. अलीकडे तर हिंदी चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योगाचे स्वरूप धारण केले आहे, ज्यामुळे कॉर्पोरेट जगताकडून चित्रपटांसाठी मोठ्या प्रमाणात पैसा उभा केला जाऊ लागला आहे. शाहरुख खान, करिना कपूर, आमिर खान, कतरिना कैफ, सलमान खान, प्रियांका चोप्रा, हृतिक रोशन, राणी मुखर्जी अशा मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या कलाकारांसोबत इरफान खान, आयुष्यमान खुराणा, राजकुमार यादव, रणदीप हुडा, नवाझुद्दीन सिद्धीकी असे कलाकारदेखील आज हिंदी चित्रपटांमध्ये दिसत आहेत. सुदैवाने शेखर कपूर, राजकुमार संतोषी, सुरज बडजात्या, राहुल रवैल, मन्सूर खान अशा प्रयोगशील दिग्दर्शकांची १९८० च्या दशकात बघायला मिळालेली कर्तबगारी पुढे आदित्य चोप्रा, करण जोहर ते अगदी राजकुमार हिराणी, विशाल भारद्वाज, फॅरहान अख्तर, दिबाकर बॅनर्जी, अनुराग कश्यप, तिग्मांशू धुलियापर्यंत अनुभवायला मिळते. या सर्वांनी कथानक आणि सिनेतंत्र यांचा उत्तम मेळ साधला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटसृष्टीबाबत बोलायचे झाल्यास प्रभात फिल्म कंपनीने निर्माण केलेल्या ‘अयोध्येचा राजा’ (१९३२) या पहिल्या बोलपटापासून ते लवकरच येऊ घातलेल्या ‘झपाटलेला २’ या पहिल्या मराठी त्रिमिती चित्रपटापर्यंत सदर चित्रपटसृष्टीत अनेकजणांनी कर्तबगारी व यशाची शिखरे गाठलेली बघायला मिळतात. चित्रपती व्ही. शांताराम यांच्यापासून सुरू झालेला मराठी चित्रपटांचा प्रवास मोठा मनोरंजक आहे. शांताराम यांनी सुरुवातीला प्रभात फिल्म कंपनीसाठी ‘कुंकू’, ‘माणूस’, ‘शेजारी’सारखे चित्रपट तयार केले, तर नंतरच्या काळात राजकमल कलामंदिर या चित्रसंस्थेसाठी ‘पिंजरा’, ‘चानी’सारखे चित्रपट निर्माण केले. ‘श्यामची आई’ (१९५३), ‘श्वास’ (२००४), ‘देऊळ’ (२०११) सारख्या मराठी चित्रपटांनी तर थेट राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करण्यापर्यंत धडक मारली होती. भालजी पेंढारकर, राजा परांजपे, राजा ठाकूर, दिनकर द. पाटील, अनंत माने, राजदत्त या दिग्गज दिग्दर्शकांनी १९८० च्या दशकापर्यंत मराठी चित्रपटांचा झेंडा फडकवीत ठेवला तर त्यानंतर जब्बार पटेल, महेश कोठारे, सचिन, अमोल पालेकर अशा लोकांनी बाजी मारली. अलीकडे गजेंद्र अहिरे, उमेश कुलकर्णी, रवी जाधवसारखे दिग्दर्शक मराठीची पताका घेऊन या सिनेसृष्टीत पुढे जात आहेत. ‘श्वास’नंतर आलेले ‘डोंबिवली फास्ट’, ‘उत्तरायण’, ‘विहीर’ अशा चित्रपटांपासून ते थेट ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘देऊळ’, ‘शाळा’पर्यंत प्रदर्शित झालेले चित्रपट उत्तम दर्जा राखून आहेत. पुण्यामध्ये सलग १०० आठवडे चालणारा ‘सांगत्ये ऐका’ हा चित्रपट असो वा ओळीने रौप्यमहोत्सव साजरे करणारे दादा कोंडके यांचे चित्रपट असो, मराठी सिनेसृष्टीने गेल्या शंभर वर्षांत वेळोवेळी मैलाचे दगड प्रस्थापित केलेले आहेत.
आज भारतीय चित्रपटांची जगभरात लोकप्रियता पाहून ट्वेंटीयथ सेंचुरी फॉक्स, सोनी पिक्चर्स आणि वॉर्नर ब्रदर्स यांसारख्या जगमान्य स्टुडिओंनी भारतात पैसे गुंतविण्यास सुरुवात केलेली आहे. आजतागायत ‘मदर इंडिया’ (१९५७), ‘सलाम बॉम्बे’ (१९८८) आणि ‘लगान’ (२००१) या चित्रपटांना मिळालेले ‘ऑस्कर‘ नामांकन वगळता एकाही भारतीय चित्रपटाला उत्कृष्ट विदेशी चित्रपटाच्या विभागात ऑस्कर पुरस्कार लाभलेला नाही. मात्र असे असले तरी त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीला कोणताही फरक पडलेला नाही. याउलट ‘ऑस्कर’वाल्यांनाच जगातील सर्वात भव्य चित्रपटसृष्टीची योग्य दखल घेण्यात अपयश आलेले आहे, असे त्यामुळे सिद्ध होते. आज आपल्या अस्तित्वाच्या दुसर्या शतकात प्रवेश करणारी भारतीय चित्रपटसृष्टी भारतीय आणि जागतिक प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नवी दालने उघडण्यास सज्ज आहे. शेवटी ‘पिक्चर तो अभी शुरू हुई है’ असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.