‘व्हॅलेंटाईन डे’लाच तरुणीवर जीवघेणा हल्ला

0
17

>> गोसावीवाडा-उसगाव येथील घटना; एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या डोक्यात फोडली बाटली; संशयित तरुणाला अटक

तरुणी सतत प्रेमाला नकार देत असल्याने एकतर्फी प्रेमातून वैफल्यग्रस्त बनलेल्या एका तरुणाने ‘व्हॅलेंटाईन डे’लाच काल सकाळी एका तरुणीच्या डोक्यात बियरची बाटली फोडून जीवघेणा हल्ला केला. काल सकाळी 7 च्या सुमारास गोसावीवाडा-उसगाव येथील एका पायवाटेवर ही घटना घडली. या घटनेत मूळ पाळी-साखळी येथील आणि सध्या तिराळ-उसगाव येथे वास्तव्यास असणारी 22 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मंथन मंगेश गावडे (24, रा. पालवाडा-उसगाव) या तरुणाला फोंडा पोलिसांनी काल अटक केली. तरुणीवर हल्ला केल्यानंतर मंथन याने उसगाव पुलावरून म्हादई नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; पण पोहता येत असल्याने त्याचा जीव वाचला.

तिराळ येथे भाड्याच्या खोलीत राहणारी सदर 22 वर्षीय तरुणी उसगावातील मशरूम कारखान्यात काम करते. कारखान्यात जाण्यासाठी पायवाटेचा मार्ग जवळचा असल्याने सदर तरुणी दररोज चालत जाते. या पायवाटेवर लोकांची वर्दळ देखील कमी असते. सदर तरुणी याच मार्गाने जात असल्याची मंथन गावडे याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे ‘व्हॅलेंटाईन डे’ची संधी त्याने साधत सदर तरुणीला भेटण्याचा प्रयत्न केला.

वाट अडवली अन्‌‍…
बुधवारी सकाळी सदर तरुणी चालत जात असताना पायवाटेलगतच्या लपून बसलेल्या मंथनने तिला रोखले. यावेळी त्याने सर्वप्रथम तिच्याकडे आपल्या सोबत फिरायला येण्याचा आग्रह धरला; पण तरुणीने विरोध केल्याने मंथनने बियरची बाटली तिच्या डोक्यात फोडली. त्यानंतर तिचा गळा आवळून तिला बेशुद्ध केले. हा प्रकार सकाळी 7 ते 7.15 वाजण्याच्या दरम्यान घडला.

रक्तबंबाळ अवस्थेत तरुणीने गाठला मुख्य रस्ता
गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळलेल्या तरुणीला अंदाजे 9 वाजण्याच्या सुमारास शुद्ध आली. निर्जनस्थळ असल्याने तिने हळूहळू चालत मुख्य रस्ता गाठला. रस्त्याच्या बाजूला रक्तबंबाळ अवस्थेत तरुणी दिसून आल्यानंतर स्थानिकांनी 108 रुग्णवाहिकेतून तिला पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले.

मंथन आधी बसला लपून;
नंतर नदीत घेतली उडी
सदर तरुणीवर हल्ला केल्यानंतर मंथनने घटनास्थळावरून पळ काढला होता. फोंडा पोलीस त्याचा शोध घेत असल्याने तो लपून बसला; पण गावातील लोक सुद्धा त्याचा शोध घेत असल्याची माहिती मिळाल्यावर दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास त्याने उसगाव पूल गाठले आणि आत्महत्या करण्यासाठी पुलावरून म्हादई नदीच्या पाण्यात उडी मारली.

जीव गमावण्याच्या भीतीने नदीचा काठ गाठला
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली आणि तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यावेळी मंथन नदीच्या काठावर येऊन लपून बसल्याचे आढळून आले. आत्महत्या करण्याच्या हेतूने त्याने नदीत उडी घेतली खरी; पण पोहण्यात तरबेज असलेल्या मंथनने नंतर जीव जाण्याच्या भीतीमुळे नदीचा काठ गाठला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी फोंडा पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक अर्शी आदिल व निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य वेळीप अधिक तपास करीत आहेत.

तक्रारीनंतर पोलिसांकडून समज; पण…

पाळी येथील सदर तरुणी आपल्या कुटुंबासमवेत तिराळ येथे भाड्याच्या खोलीत राहते. मंथन हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. दीड महिन्यापूर्वी तरुणीने फोंडा पोलीस स्थानकात मंथन गावडे याच्याविरुद्ध सतावणूक करीत असल्याची तक्रार दिली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी मंथनला पोलीस स्थानकात आणून समज दिली होती. तसेच तिला फोनवर संपर्क करून त्रास देऊ नये अशी ताकीद दिली होती. यानंतरही मंथन गावडे हा तिला आपल्या मित्राच्या फोनवरून संपर्क साधून त्रास देत होता. तसेच तरुणी राहत असलेल्या भाड्याच्या खोलीजवळ येऊन शिवीगाळ करीत होता, असे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले आहे.