व्याघ्रक्षेत्र अधिसूचित झाल्यास ‘तमनार’ वीज प्रकल्प अडचणीत

0
21

>> खुद्द वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची विधानसभेत कबुली; प्रकल्प रद्द करण्याची आमदार विजय सरदेसाई यांची मागणी

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोव्यात व्याघ्रक्षेत्र अधिसूचित करण्यात आले, तर तमनार वीज प्रकल्पाचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, अशी कबुली वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल विधानसभेत दिली. गोव्याच्या वनक्षेत्रात जर व्याघ्रक्षेत्राची घोषणा झाली, तर तमनार प्रकल्प होऊ शकेल काय, अशा प्रश्न आमदार कार्लुस फेरेरा यांनी काल विचारला होता. त्या प्रश्नाचे उत्तर देताना ढवळीकर यांनी वरील स्पष्टीकरण दिले. राज्यात व्याघ्रक्षेत्राची घोषणा झाली, तर तमनार प्रकल्पासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात, असेही ढवळीकर यांनी नमूद केले.

कर्नाटक सरकारला हा प्रकल्प सुरू करण्यासाठी अजूनही आवश्यक ते परवाने मिळालेले नाहीत. त्यामुळे कर्नाटकमधील काम अजून सुरू झालेले नाही. असे असताना गोवा सरकार धारबांदोडा ते म्हापसा या दरम्यानचे हे काम करण्यास घाई का करीत आहे, असा प्रश्न आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

कर्नाटकला परवानगी मिळाली नाही आणि त्यामुळे त्यांचे काम होऊ शकले नाही तर मग गोवा सरकारने हे काम करून फायदा काय, असा प्रश्न करतानाच ह्या प्रकल्पासाठी गोवा सरकारला हजारो झाडे कापावी लागणार असून, हा विद्ध्वंस करून सरकार काय साध्य करू पाहत आहे, असा सवाल सरदेसाई यांनी केला. या प्रकल्पासाठी 45 हजार एवढी झाडे कापावी लागणार असल्याचे सरदेसाई म्हणाले. मात्र, सरदेसाई यांचा हा दावा खोडून काढताना एवढी झाडे कापावी लागणार नसून, 17 हजार एवढी झाडे कापावी लागणार असल्याचे ढवळीकर यांनी यावेळी स्पष्ट केले. तमनार प्रकल्प झाला नाही तरीही या प्रकल्पासाठी उभारलेली साधनसुविधा गोव्याला वापरता येईल, असे ढवळीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

तमनार प्रकल्पामुळे राज्यातील हजारो झाडांची कत्तल करावी लागणार असून ही बाब लक्षात घेऊन सरकारने हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी यावेळी विजय सरदेसाई यांनी केली. राज्य सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येणार असल्याचे सांगत असतात. त्यामुुळे आता तमनारसारख्या प्रकल्पांची गरजच काय, असा प्रश्नही सरदेसाई यांनी केला.

गोव्यात वृक्षतोड; मग मध्यप्रदेशात वनीकरण कशाला?
वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी झाडे कापल्यानंतर जे वनीकरण करावे लागणार आहे, ते मध्यप्रदेश राज्यात करण्याचा प्रस्ताव गोवा सरकारने दिला आहे, हा काय प्रकार आहे, असा प्रश्न विजय सरदेसाई यांनी केला. यावेळी हस्तक्षेप करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, तो प्रस्ताव आम्ही मागे घेतला असून, आम्ही वनीकरण गोव्यातच करणार आहोत. राज्यातील वनक्षेत्रात जेथे जेथे मोकळी जागा मिळणार आहे, तेथे तेथे हे वनीकरण करण्यात येणार असल्याचा खुलासा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.

1200 मेगावॅट वीज मिळणार : ढवळीकर
तमनार वीज प्रकल्पाचे धारबांदोडा ते म्हापसापर्यंतचे काम चालू वर्षी पूर्ण होणार आहे, तर कर्नाटक ते धारबांदोडापर्यंतचे काम 2025 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती सुदिन ढवळीकर यांनी दिली. हा केंद्र सरकारचा प्रकल्प असून यासाठी लागणारा सगळा निधी हा केंद्राकडून येणार आहे. या प्रकल्पावर आमचे नियंत्रण नाही. मात्र, ह्या प्रकल्पाद्वारे आम्हाला 1200 मेगावॅट एवढी वीज मिळणार आहे.